विज्ञानातील प्रगती मराठी निबंध | vidnyanatil pragati marathi nibandh

विज्ञानातील प्रगती मराठी निबंध | vidnyanatil pragati marathi nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  विज्ञानातील प्रगती मराठी निबंध बघणार आहोत. या लेखामध्ये ऐकून 3  निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता ‘सतरा वर्षांनंतर पित्यापुत्राची भेट!' मथळा वाचला आणि विस्फारलेल्या डोळ्यांनी मी ती बातमी वाचू लागले. कथा आणि व्यथा होती कॅलिफोर्नियातील रॉबर्ट नामक पित्याची ! सुदैवाने (नव्हे, विज्ञानकृपेने) तिचे नाट्यपूर्ण सुखान्तात रूपान्तर झाले.


त्याचं असं झालं ! एकदा रॉबर्ट दूरदर्शनवरील बातम्या पाहात (आणि ऐकतही) होता. मुलाचे अपहरण करण्याच्या आरोपाखाली आपल्या पूर्वीच्या पत्नीला अटक झाल्याचे वृत्त त्याने ऐकले. अपहृत बालकाच्या छायाचित्रावरून तो आपलाच मुलगा आहे हे लक्षात येऊन त्याने तडक पोलीस स्टेशन गाठले. 


पूर्वीच्या पत्नीकडून मुलाचा पत्ता मिळविला आणि सतरा वर्षांच्या प्रदीर्घ ताटातुटीनंतरची ही ऐतिहासिक भेट संपन्न झाली. तो रोमांचकारी, भावस्पर्शी, हृदयंगम क्षण टिपण्यासाठी जे भाग्यवंत उपस्थित असतील त्यांच्या रंध्रारंध्रातून शब्द फुटले असतील  ‘बा, विज्ञाना, तुला लाख लाख शुक्रिया !


या विज्ञानाने आमच्या जीवनात नेमका कोणत्या क्षणी प्रवेश केला कुणास ठाऊक, आज मात्र ते आमच्या कंठीचा ताईत होऊन बसले आहे. मला वाटतं, विधात्याने मानव ही सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण केली. पण आपल्या लाडक्या अपत्याला जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष त्याला पाहवेना. 


'त्याने विज्ञान या खास दूताची पृथ्वीतलावर रवानगी केली. आणि हो ! त्याच्याबरोबर कल्पवृक्ष, चिंतामणी, कामधेनू, परीस, अल्लाउद्दिनचा दिवा पाठविण्यास तो विसरला नाही. धरतीवर स्वर्ग अवतरला. मानवाच्या भाग्याला पारावर राहिला नाही.



या देवदूताच्या आगमनानंतर वेळ आणि श्रमबचतीच्या साधनांची रेलचेल झाली. कुकर, गॅस, मिक्सर, ग्राइंडर, हिटर, गीझर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर एक ना दोन ! समस्त महिला वर्ग सुखावला.



शेतीच्या क्षेत्रातही जबरदस्त क्रांती घडून आली. यांत्रिक नांगर, सुधारित बी - बियाणे, कीटकनाशके, पाण्याचे पंप आले. फुलांची शेती, मत्स्यशेती या क्षेत्रातही आम्ही बाजी मारली. भूमिपुत्रांना दिलासा मिळाला. विजेच्या शोधामुळे घरांबरोबर आमचे भाग्यही उजळले.


सर्व निरामय, दीर्घायू व्हावेत या हेतूने विज्ञानाचे शोधकार्य जारी होते. असाध्य रोगांवर रामबाण उपाय निघाले. क्षयरोगाचा 'क्षय' झाला. कॅन्सर सारखा रोग ‘कॅन्सल' व्हायची शक्यता निर्माण झाली. हिवतापाला कापरे भरले. अपत्यहीन अपत्यमुख पाहण्याचे सुखस्वप्न रंगवू लागले. कृत्रिम अवयवांचे रोपण, नाजूक अवयवांची शस्त्रक्रिया यामळे रोग्यांना जीवनदान मिळाले. 


प्लॅस्टिक सर्जरीमळे कुरूपतेवर सौंदर्याचा साज चढला. वेदनाशामक गोळ्यांनी वेदनेची हकालपट्टी केली. अंधांना दृष्टी प्राप्त झाली. बहिरा ‘बहुश्रुत' झाला. 'मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिम्' हे चमत्कार विज्ञान कृपेने घडू लागले.


एकेकाळी निसर्गाशी झुंजताना मेटाकुटीला येणाऱ्या मानवाने निसर्गावर मात केली. कडाक्याच्या थंडीत रुमहीटर ऊब देऊ लागला. वातानुकूलित खोल्या सज्ज झाल्या.बाहेर ऊन रणरणत असताना, कूलरच्या वाऱ्याचा सुखद स्पर्श अनुभवण्यातली मजा काही औरच ! शीतपेये, आइसक्रीममुळे उन्हाळा सह्य झाला. शीतकपाटांमुळे खाद्यपदार्थांचा टिकाऊपणाही वाढला.


बटन दाबताच प्रकाश, हवा आमच्या दिमतीला हजर होऊ लागले. विजेच्या झगमगाटात वावरताना अमावस्येचा काळोख लुप्त झाला. कोणत्याही ऋतूत, कोणतीही फळे उपलब्ध होऊ लागली. वस्त्रांचा स्पर्श मुलायम बनला. 'अशक्य' शब्दाचे शब्दकोषातील स्थान डगमगले ‘असाध्य ते साध्य, करिता सायास, कारण अभ्यास, विज्ञानाचा' याचा प्रत्यय पावलोपावली सर्वांना येऊ लागला.



विज्ञानाने हे अफाट जग आपल्या कवेत घेतले. जग जवळ आले. रेडिओ, टेलिफोन, बिनतारी संदेश, फॅक्स, दूरदर्शन, इंटरनेट  इत्यादी प्रसारमाध्यमांमुळे जगात कुठेही संपर्क साधणे आमच्या हातचा मळ! घर बसल्या, विनातिकीट दुनियेची सफर आम्ही करू शकतो. सायकलीपासून विमानापर्यंतची कितीतरी वाहने आमच्या सेवेला अष्टोप्रहर हात जोडून उभी आहेत. त्यामुळे पायी रखडण्याचे कष्ट वाचले.


शैक्षणिक क्षेत्रातही विज्ञानाची मदत लाख मोलाची आहे. मुद्रणकला अस्तित्वात आली. सर्व शास्त्रांवरील ग्रंथांचा जणू काही जीर्णोद्धारच झाला. ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या. प्रोजेक्टर, लघुचित्रपट, इत्यादी शिक्षणाची प्रभावी माध्यमे बनली. दूरदर्शनमुळे जगाच्या पाठीवर होणाऱ्या घडामोडी समजणे सहज शक्य झाले. आपल्या कलागुणांचा विकास करायला मानवाला वेळ आणि वावही मिळाला.


१८३२ साली विज्ञानाने एका अद्भूत बालकाला जन्म दिला. ते बालक म्हणजे संगणक! त्याच्या 'पाय' गुणामुळे मानव चंद्रावर पाय ठेऊ शकला. राकेश शर्मा चे ‘सारे जहाँसे अच्छा' हे शब्द आमच्यापर्यंत पोचवले संगणकाने ! अनेक तहांची माहिती एकत्र करून सार काढणे, बिनचूक हिशोब ठेवणे, पेपर्स सेट करणे, तपासणे, प्रगतीची नोंद करणे इत्यादी कामे तो चुटकीसरखी करतो.  


'जे न करी मानव, ते करी यंत्रमानव' या यंत्रमानवाची कामगिरी पाहून स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या मानवानेही आश्चर्याने तोंडात बोटे घालावी ! बंगलोरच्या काही अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी एक रोबोट भुजा तयार केली आहे म्हणे ! ती मौखिक आदेशानुसार किंवा यांत्रिक संकेतावर काम करते. एवढेच नाही तर इंटरनेटद्वारा दिलेल्या आदेशाचे पालन करते.


हा रोबोट पूर्णपणे स्वदेशी साहित्याने बनविण्यात आला आहे. दैनिक स्वरूपाची तांत्रिक व औद्योगिक कामे तो सारख्याच क्षमतेने करू शकतो. मानवी स्वास्थाच्या दृष्टीने जी कामे जोखिमीची आहेत, तेथेही रोबोट काम करू शकतो.


मानवाच्या केसालाही धक्का न लागू देता हमखास यशस्वी होणारा रोबोट आम्हाला 'बॉडीगार्ड' वाटला तर नवल नाही.  तात्पर्य, आज आमची सारी मदार विज्ञानावर आहे. विज्ञान आमुच्या जीवाचे जीवन' झाले आहे. आमच्या जीवनाचा कण न् कण, क्षण अन् क्षण त्याने व्यापून टाकला आहे. माननीय अटलजींनी दिलेल्या नाऱ्यातून हेच सुचविले आहे नाही का?

'जय जवान, जय किसान, जय विज्ञान !'

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध 2

विज्ञानातील प्रगती मराठी निबंध | vidnyanatil pragati marathi nibandh


भगवान शंकराला तीन डोळे असतात असं समजलं जातं. अहो, शंकराला काय मानवालाही तीन डोळे आहेत. 'विज्ञान' हा मानवाचा तिसरा डोळाच आहे. मानवाला दोन डोळ्यांनी जे दिसत नाही ते मानव विज्ञानाच्या साहाय्याने पाहू शकतो.


गुहेत राहणाऱ्या रानटी माणसापासून एअरकंडिशन्ड रूममध्ये राहणाऱ्या मानवापर्यंत झालेली ही मानवाची वाटचाल विज्ञानानेच केली. विजेच्या पंख्याचा वारा न घेता, टी.व्ही. न बघता, विजेचे दिवे न लावता आज आपल्याला काम करता येणार नाही. दैनंदिन जीवनातील प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहेच. पहाटे लाईट लावून आपण कामाला सुरुवात करतो. 


चहासाठी पेटणारा गॅस. आंघोळीच्या पाण्यासाठी असणारा हीटर किंवा गीझर, स्वयंपाक लवकर करणारा प्रेशर कुकर, विशेषत: उन्हाळ्यात थंड हवा देणारा पंखा, किंवा कूलर, थंड पाणी देणारा किंवा पदार्थ टिकवून ठेवणारा फ्रीज, शाळेत किंवा ऑफिसात आपल्याला घेऊन जाणारे कोणतेही वाहन... सर्व विज्ञानाच्या देणग्या नव्हेत काय?


मृत्यूच्या दाढेतून खेचून आणण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. विविध रोगांवर निघालेली औषधे माणसाला जीवनदान देतात. गोवर, कांजिण्या, देवी, टायफॉइड, कॉलरा इत्यादी अनेक रोगांवर प्रतिबंधक लसी विज्ञानाने शोधून काढल्या आहेत. विज्ञानाच्या साहाय्याने कॅन्सर किंवा एडससारख्या प्राणघातक रोगांचाही आपण मुकाबला करू शकतो.


कुष्ठरोग किंवा क्षयासारखे रोग विज्ञान सहज बरे करू शकते. 'टेस्ट ट्यूब बेबी', 'एक्स-रे', 'स्कॅनिंग', 'प्लॅस्टिक सर्जरी' या विज्ञानाच्या करामतींचा फायदा अनेकांना मिळून आपले जीवन सुखदायी करता आले आहे. ___वैज्ञानिक सुधारणेमुळेच शेतीत प्रगती होऊ शकली आहे. 



निरनिराळी खते वापरून आपण पिकांचे संरक्षण करू शकतो किंवा भरघोस पीक घेऊ शकतो. मृदसंधारणामुळे शेतकरी डोळसपणे शेती करतो. ट्रॅक्टरसारख्या साधनामुळे शेतीची कामे थोडक्या श्रमात व कमी वेळात करू शकतो तर विहिरीवर पंप बसवून सर्व शेताला पाणी देऊ शकतो. केवढी कृपा विज्ञानाची!



प्राचीन काळी ज्या चंद्राला लोक देव मानत, त्या चंद्रावर मानव जाऊन आला. आता तर तो मंगळावर जाण्याच्या तयारीत आहे. सॅटेलाईट उपग्रहाद्वारे आपण अवकाशातील गोष्टी पाहू शकतो. हवामानासंबंधी अंदाज बांधू शकतो व डोंगराळ आणि दुर्गम भागातही आपण दूरदर्शनचे कार्यक्रम पाहू शकतो.



आजची सर्रास वापरली जाणारी टेरीन, टेरिलीन, टेरिकॉटची वस्त्रप्रावरणे हे विज्ञानाचेच 'देणे' आहे. ती धुण्यासाठी वॉशिंग मशिन्स, कसलेही डाग काढून टाकणारे डिटर्जंट साबण किंवा पावडरी विज्ञानाचेच चमत्कार आहेत. पण या विज्ञानाचा दुरुपयोगही मोठ्या प्रमाणावर केला जातो.



'मुंबईतल्या बॉम्ब स्फोटाची' घटना मानव किंवा आपण विसरू शकत नाही. १९४५ साली 'नागासाकी', 'हिरोशिमा' यांच्यावर पडलेले किंवा टाकलेले बॉम्ब अजूनही मन विषण्ण करतात. हायड्रोजन बॉम्ब तर त्यापेक्षाही संहारक आहेत. इराण-इराक युद्धात वापरलेल्या मिसाइल्सची करामतही आपण जाणतोच. 



पूर्वी शत्रूचा नाश करण्यासाठी तलवारी गाजवाव्या लागत. आज बसल्या जागेवरून कोणत्याही ठिकाणी अचूक बाँब फेकता येतो. पाकिस्तानने अणुबाँब बनवला आहे हे सर्वश्रुत आहेच. अग्निबाणाने एखादे यान अवकाशात सोडता येते, तसेच दुसऱ्या देशातील काही गोष्टींचा नाशही करता येतो.


प्लेगसारख्या रोगांवर रामबाण औषध शोधून तो रोग आपण पळवून लावला आहे, तर अनेक रोगांवर विजय मिळवले आहेत. त्याचा परिणाम म्हणून, की काय माणसाचे आयुर्मान, जीवनमान लांबले आहे व लोकसंख्यावाढीचा भस्मासूर निर्माण झाला आहे. यंत्राच्या वापरामुळे बेकारी वाढली आहे. अण्वस्त्र-स्पर्धा तर आहेच.


मग साहजिकच असा प्रश्न पडतो, की विज्ञान हे शाप की वरदान? कोणत्याही साधनाचा, हत्याराचा उपयोग जसा विधायक कामासाठी होतो. तसाच विघातक कामासाठीही. विज्ञान हे साधन आहे. साध्य नाही. साधनाचा उपयोग तुम्ही ज्या प्रकारे कराल त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. 


तो दोष त्या साधनाचा नाही. तुमचा आहे. तुमच्या मनोवृत्तीचा आहे. तेव्हा विज्ञानाला दोष देण्यात काय अर्थ आहे. अग्नी अन्नपण शिजवतो आणि शेजाऱ्याचे घरही पेटवतो. मग तो दोष अग्नीचा आहे का? 


दैनंदिन जीवनात सुख आणणाऱ्या, रोगांपासून आपला बचाव करणाऱ्या, जीवनमान उंचावणाऱ्या, ज्ञान व मनोरंजनाच्या सोयी निर्माण करणाऱ्या, अंधश्रद्धा दूर करून खरा ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या विज्ञानाला वरदानच म्हणावं लागेल. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता .  पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद



निबंध 3 

विज्ञानातील प्रगती मराठी निबंध | vidnyanatil pragati marathi nibandh


काही दिवसांपूर्वी भारतातील पहिली महिला आंतराळवीर कल्पना चावला अमेरिकेच्या यानातून मंगळावर गेली. तेथून तिने पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल यांच्याशी संपर्क स्थापित केला होता. गुजराल तिला इक्बालाचे उर्दू शेर ऐकवत होते. काही वर्षापूर्वी ही कविकल्पना वाटली असती; पण विज्ञानाने ते प्रत्यक्षात आणलं आहे. आपण स्वप्ननगरीत असल्यासारखे वाटते.


 'सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ताँ हमारा।' असं चंद्रावरून इंदिरा गांधींना सांगणाऱ्या राकेश शर्माना कोण विसरेल? राकेश शर्माच्या उत्तराने भारतीयांची मान जगात उंचावली. अंतराळातल्या तरंगत्या प्रयोगशाळेत माणूस आठ एक दिवस राहून परत येतो. ही विज्ञानाची प्रगती खरोखरच थक्क करणारी आहे. 



हवा, पाणी, ध्वनी, चुंबकत्व, विद्युत, अणुशक्ती या सर्व वैज्ञानिक संशोधनाने मानवी जीवनात क्रांती घडवली आहे. विज्ञानाचं एक सुंदर अपत्य म्हणजे 'संगणक' संगणकामुळे मनुष्याच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला आहे. निरनिराळ्य माहितींचा खजिना म्हणजे संगणक. 


संगणकामुळे आपल्याला हवी ती माहिती काही सेकंदात मिळू शकते. संगणकाबरोबर आपण खेळू शकतो. गाणे ऐकू शकतो. चित्र काढू शकतो. या क्षेत्रात विज्ञानाने इतकी उत्तुंग भरारी मारली आहे की जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या वाचनालयातील पुस्तक आपणास घरबसल्या वाचता येतं. 



डॉक्टरांना हजारो कि. मी. दूर असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करता येणं सहज शक्य झालं आहे. कृषी क्षेत्रात विज्ञानाचे मोलाचे योगदान आहे. पिकांच्या निरनिराळ्या जाती निर्माण करण्यात विज्ञानाने यश प्राप्त केले आहे. निरनिराळी कीटकनाशके, ओषधे, यंत्रसामुग्री यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले आहे. 



विज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे भारत अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनला आहे. विज्ञानाच्या या देणगीचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम झाला आहे. विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे आपण मोठ्या प्रमाणात पाणी साठवून ठेऊ शकतो. मोठ-मोठी धरणे ही विज्ञानाचीच कृपा म्हटली पाहिजे.


शिक्षणासारख्या क्षेत्रात विज्ञानाने कल्पवृक्षाची जागा घेतली आहे. आज विद्यार्थी घरी बसून दूरदर्शनद्वारे शिक्षण प्राप्त करू शकतो. अभ्यासाच्या विषयांच्या कॅसेट्स या अभ्यास परिपूर्ण करण्यास अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत. आता अभ्यास हा नीरस, कंटाळवाणा विषय न राहता. 


मनोरंजक विषय बनला आहे. ही किमया विज्ञानाचीच! विज्ञानामुळे करमणुकसाठी दूरदर्शन, आकाशवाणी यांचा शोध लागला. अगदी दुर्गम खेड्यापाड्यांतही दूरदर्शन संच दिसतात. विज्ञानामुळे संपर्काची मोठीच सोय झाली आहे. अगदी मैलोगणती दूर असणाऱ्या व्यक्तीबरोबर आपण दूरध्वनीद्वारे बोलू शकतो.


अंतराळक्षेत्रात भारताने विकसीत राष्टांच्या तोडीचा प्रगतीचा उच्च टप्पा गाठला आहे. याचे सारे श्रेय जाते ते विज्ञानाने केलेल्या प्रगतीला. अर्जुन रणगाडा, अग्नी, पृथ्वी अशी क्षेपणास्त्रे, विमानवेधी तोफा, रडार, महाकाय नौका, अनेकविध उत्पादनांनी भारत संरक्षणाच्या क्षेत्रात एक महाशक्ती म्हणून उदयास आला आहे. 


भारताने अण्विक क्षेत्रात अतुलनीय प्रगती केली आहे. १९७४ च्या पोखरणच्या अणुचाचणीपासून प्रारंभ झालेल्या या यशोगाथेने अणुबॉम्ब बनविण्यापर्यंत मजल मारली आहे. भारताची अण्विक क्षेत्रातील थक्क करणारी प्रगती विकसित राष्ट्रांनाही लाजवणारी आहे. 



भारताच्या या प्रगतीमुळे तो जगातल्या मोजक्या सात - आठ राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. विज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळे आपण संरक्षणदृष्ट्या इतके प्रबळ झालो आहोत की आता पाकिस्तानच काय पण अमेरिका आणि चीनसुद्धा आपले काहीच वाकडे करू शकणार नाहीत.



संपूर्ण जगाचे मालक असल्याच्या थाटात वावरणाऱ्या अमेरिकेला अलीकडेच भारतीय शास्त्रज्ञांनी झटका दिला तो केवळ विज्ञानाने झालेल्या प्रगतीमुळेच. भारताला Super Com- puter म्हणजे महासंगणकाचे तंत्रज्ञान देण्यास अमेरिकेने नकार दिला होता. 


पण त्यानंतर दोन वर्षांतच भारतीय शास्त्रज्ञांनी स्वतःच्या प्रतिभेच्या बळावर, परदेशी तंत्रज्ञानाचं साहाय्य न घेता 'महासंगणकाची' निर्मिती केली. आणि आता तर ते 'परमसंगणक' निर्माण करण्यातही यशस्वी झाले आहेत.
मूत्र, दैनंदिन जीवनातही विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्याचे जीवन किती सुसह्य झाले आहे. 


दळणवळणाच्या साधनांमुळे जग लहान बनत चालले आहे. वैश्विकरणाची प्रक्रिया वेग घेत आहे. तारायंत्रे, टेलिफोन, रेडिओ, ट्रान्झिस्टर्स, टेपरेकॉर्डस, टीव्ही, व्हिडीओ यांनी माणसाचे जीवनच बदलून टाकले आहे. एअर कंडिशन, पंखा, कुलर, फ्रिज, कुकर, मिक्सर यांनी स्वर्गसुखाची प्राप्ती झाल्यासारखी वाटते. 



वैद्यकशास्त्रात विज्ञानाने केलेली प्रगती कल्पनातीथ आहे. शौच, रक्त, अस्थि यांची तपासणी, क्ष-किरण-कार्डिओग्राम वगैरे गोष्टी विज्ञानानेच साध्य झाल्या आहेत. पण या सगळ्यांवर ताण म्हणजे स्कॅनिंग मशीन कोणतीही शस्त्रक्रिया न करता शरीराच्या आंतरिक भागांची सूक्ष्मातिसूक्ष्म अशी शेकडो छायाचित्रे एकाच वेळेस घेता येतात.



रक्तदान, नेत्रदान आता सर्रास चालू आहे. प्लास्टिक सर्जरीच्या साहाय्याने चेहऱ्याच्या विकृती नाहीशा करता येतात. या व्यतिरिक्त कृत्रिम पाऊस पाडणे, समुद्राचे खारे पाणी गोडे करून वापरणे, भूगर्भातील अथवा समुद्राच्या पोटातील तेलाचे साठे शोधणे यासारखे प्रयोग चालू आहेत. 



याहीपेक्षा थरारक प्रयोग अंतराळात चालू आहेत. पण विज्ञानाची ही प्रगती म्हणजे दुहेरी अस्त्र आहे. तिचा विधायक वापर केला तर जीवनाचे नंदनवन होईल पण विघातक वापर केला तर मात्र वाळवंट होईल. 



संजिवक प्रगती आणि संहारक दुर्गती या विज्ञानाच्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तेव्हा विज्ञानाने झालेल्या प्रगतीचा कसा वापर करावयाचा हे सर्वस्वी मानवावर अवलंबून आहे.  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद