आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी | essay on school peon in marathi

आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी | essay on school peon in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी बघणार आहोत. शिपाई हा कोणत्याही संस्थेतील महत्त्वाचा कर्मचारी असतो. कार्यालयाच्या किंवा संस्थेच्या अधिकाऱ्यांचे आदेश कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे कार्य असते. इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत रामजी नावाचा शिपाई आहे. तो नेपाळचा राहणारा आहे. त्याची उंची पाच फूट आहे, पण शरीर सुदृढ आहे. तो एक गोरापान व उत्साही मनुष्य आहे. 


तो आठवीपर्यंत शिकलेला आहे. रामजी ३० वर्षांचा आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण पत्नी व मुले नेपाळमध्ये त्याच्या आई वडिलांसोबत राहतात. रामजीला शाळेतच एक खोली राहण्यासाठी मिळाली आहे. तो तिथेच राहतो व स्वत:चे जेवण स्वत:च बनवितो.


रामजीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शाळा बंद झाल्यावर चौकीदाराचे काम करावे लागते. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकाचे कार्यालय झाडून पुसून स्वच्छ करावे लागते. त्यानंतर तो शाळेच्या कार्यालयांची साफ-सफाई करतो. नंतर गणवेश घालून शाळेच्या मुख्य फाटकाशी उभा राहतो. खाकी पँट, शर्ट, काळ्या टोपीत तो गुरखा पलटणीचा जवानच वाटतो. 


मुख्याध्यापक येताच त्यांची बॅग त्यांच्या कार्यालयात नेऊन ठेवतो. भेटावयास येणाऱ्या पालकांना किंवा इतर व्यक्तिंना बाहेर बसवितो. मुख्याध्यापकांची परवानगी मिळाल्यानंतर क्रमाक्रमाने त्यांना आत पाठवितो. मुख्याध्यापकांचे आदेश तो इतर शिक्षकापर्यंत पोहोचवितो. तास पूर्ण झाल्याची घंटी वाजवितो. मुख्याध्यापकांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्याचे कामही त्यालाच करावे लागते.


रामजी अत्यंत नम्र व आज्ञाधारक आहे. तो प्रत्येक शिक्षकाशी व इतर कर्मचाऱ्यांशी आदराने बोलतो. तो मुलांचे लाड करतो. एकदा शाळेत माझी प्रकृती बिघडली तेव्हा त्यानेच मला रिक्षा करून घरी नेले. शाळेच्या आवारात क्वार्टरमध्ये राहणाऱ्या शिक्षकांची कामे करून तो ५०-१०० रु. आणखी कमावतो. पगाराचा मोठा हिस्सा तो आपले आई वडील बायको मुलांसाठी घरी पाठवितो. रामजी कर्तव्यतत्पर व प्रामाणिक आहे. जर त्याला कुणा विद्यार्थ्याची किंवा शिक्षकांची एखादी वस्तू सापडली तर ती तो कार्यालयात जमा करतो. 


एकदा एका विद्यार्थ्याच्या आईची पर्स शाळेतच विसरली. घरी गेल्यावर ही गोष्ट तिच्या लक्षात आली ती सरळ रामजीकडे गेली. परंतु त्याने पर्स लगेच मुख्याध्यापकांकडे जमा केली होती. रामजीच्या प्रानाणिकपणावर खुष होऊन ती रामजीला १० रु. बक्षीस देऊ इच्छित होती पण त्याने 'हे तर माझे कर्तव्यच होते' असे म्हणून बक्षीस घेण्यास नकार दिला.

आमचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांनाच रामजी आवडतो. खरंच तो अतिशय चांगला माणूस आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद