वसंत ऋतू मराठी निबंध | vasant rutu marathi nibandh

वसंत ऋतू  मराठी निबंध | vasant rutu marathi nibandh

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वसंत ऋतू  मराठी निबंध बघणार आहोत.  भारत नैसर्गिक सौंदर्याचे भांडार आहे. इथे वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर ऋतू क्रमाने येतात. प्रत्येकाचा कालावधी दोन महिने असतो. निसर्ग मनुष्याचा मित्र बनून त्याला आपल्या जादूंनी मंत्रमुग्ध करतो. प्रत्येक ऋतू आपणास काही तरी संदेश देतो ज्यामुळे जीवन उत्साहाने भरून जाते.


ऋतूंचा राजा वसंत आहे. त्याला 'ऋतुराज' म्हणतात. याचा काळ फाल्गुन ते चैत्र असतो. या ऋतूत थंडीही जास्त नसते व उष्णताही जास्त नसते. त्यामुळे वातावरण आल्हाददायक असते. निसर्ग एखाद्या नववधूप्रमाणे साजशृंगार करतो. वृक्षांना नवी पालवी फुटते. कोकिळा मधुर स्वरात गीत गाते. आम्रवृक्षाला मोहोर येतो. अनेक प्रकारची फुले फुलतात. त्यांचा मंद मंद सुगंध येतो. फुलपाखरे या फुलांवर भिरभिरतात. शेतात डोलणारे गव्हाचे पीक पाहून शेतकरी खुश होतो. वारा वाहत असतो. चंद्राचे शीतल चांदणे पडते.


वसंतपंचमीच्या दिवसाने लोक वसंत ऋतूचे स्वागत करतात. यादिवशी पिवळे वस्त्र धारण करतात. शाळेत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. सामूहिक नृत्य केले जाते. घरांत पक्वान्ने बनविली जातात. लहान थोर सगळेच आनंदात असतात.


वसंत ऋतूत संवत् वर्षाची (नव वर्ष) सुरवात होते. यादिवशी सरस्वतीची पूजा केली जाते. शिक्षण सुरू करण्यासाठी नववर्ष दिन सर्वोत्तम मानला जातो. रामनवमी आणि होळी हे सण याच ऋतूत येतात. गुढीपाडव्यापासून हिंदूंच्या नववर्षाची सुरवात होते.

निसर्गात उत्साही वातावरण असले की आपले मन पण प्रफुल्लित होते. मनाची प्रसन्नता चेहऱ्यावर दिसते. वसंत ऋतू हा संदेश देतो की, माझ्याकडून तुम्ही उत्साही राहण्यास शिका.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद