विज्ञानचे फायदे आणि तोटे निबंध | vidnyanache fayde ani tote in marathi
निबंध 1
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण विज्ञानचे फायदे आणि तोटे मराठी निबंध बघणार आहोत. आजचे युग विज्ञानाचे युग आहे. सर्व साधनांचा जन्मदाता विज्ञान आहे. विज्ञानामुळेच सर्वत्र सुखसमृद्धी आली. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विज्ञान आहेच. विज्ञानाने मानवाला अत्यंत शक्तिशाली बनविले आहे. ज्यामुळे मानव निसर्गावरही विजय मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. नव्हे विजय मिळविला आहे. आजचे युग विज्ञानापुढे नतमस्तक झाले आहे.
विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विज्ञान ही ज्ञानाची सुसंबद्ध, क्रमबद्ध व वैशिष्टपूर्ण शाखा आहे. विज्ञानाने मनुष्य जीवनासाठी उपयुक्त प्रत्येक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत आपण ज्या वस्तूंचा उपयोग करतो, ज्या सुविधांचा उपभोग घेतो ती सर्व विज्ञानाचीच देणगी आहे.
विज्ञानाला आपण कल्पतरू, कामधेनू किंवा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवाही म्हणू शकतो. कारण विज्ञानामुळे मानवाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. भौतिक जगाशी विज्ञानाचा प्रत्यक्ष संबंध आहे. विज्ञानाने भौतिक अभावांना दूर करून मानवी जीवनाला सुखमय बनविले. विज्ञानाने मानवाला विजेवर चालणारी घरगुती उपकरणे दिली. मनोरंजनासाठी रेडिओ,
टी. व्ही., व्ही. सी. आर. सिनेमा इत्यादी साधने विज्ञानाचीच देणगी आहे. टपाल, तार, दूरध्वनी, फॅक्स व इलेक्ट्रॉनिक-मेलसारखी संपर्क माध्यमे असल्यामुळे सगळे जग एकमेकांशी जोडले गेले, जग जवळ आले. रेल्वे, विमान, जहाजे यासारख्या प्रवासाच्या साधनांमुळे राष्ट्रांमधील भौगोलिक दुरावा कमी केला आहे.
विज्ञानाची शक्ती भूगर्भातून पाणी वर ओढून काढते, मरुस्थळे मरुद्यानात परिवर्तीत होतात. रासायनिक खतांच्या वापरामुळे अन्नधान्याचे उत्पादन वाढले. औषधांमुळे मनुष्य दीर्घायुषी बनला व रोगांपासून त्याचे रक्षण झाले. देवी, प्लेगसारखे साथीचे रोग नियंत्रित झाले. या सर्वाचे श्रेय विज्ञानालाच आहे.
शल्यचिकित्सेने तर इतकी प्रगती केली आहे की मोडलेली हातापायाची हाडेच जोडली जातात असे नाही तर किडनी आणि हृदयाचे प्रत्यारोपणसुद्धा करता येते. प्लॅस्टिक सर्जरीमुळे कुरुप व्यक्ती सुंदर होते. स्त्रियांची वांझपणाची समस्या टेस्ट ट्यूब बेबीने दूर केली आहे व त्यांच्या जीवनात माधुर्य आणले आहे.
विज्ञानाने आंधळ्यांना डोळे, बहिऱ्यांना कान, आणि लंगड्यांना चालण्याची शक्ती दिली. विज्ञानाच्या मदतीने मानव चंद्रावर जाऊन पोहोचला. त्याने अवकाशात भ्रमण केले. पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्या. मानवाने अवकाशात सोडलेले कृत्रिम उपग्रह अवकाशातून आपल्या सेवा देत आहेत. मानव ब्रह्मांडाची रहस्ये उलगडण्याचा प्रयत्न करीत आहे. संगणक आपल्या जीवनाचे एक अंगच बनला आहे.
सृष्टीतील सर्वश्रेष्ठ प्राणी मनुष्यच आहे. हा आत्मक्विास विज्ञानाने मनुष्याला दिला. विज्ञानाच्या मदतीमुळेच मानव निर्भयपणे पृथ्वीवर भ्रमण करीत आहे. पूर, वादळ, भूकंप अशा नैसर्गिक संकटांशी लढण्याची शक्ती आज मानवाजवळ आहे. इतिहासात प्रथमच कोणत्याही देशाला गुलाम न करता जातीय शोषण न करता आजचा मानव आपले राहणीमान उंचावण्यात यशस्वी ठरला आहे.
विज्ञानाने मानवाची चिंतनप्रवृत्तीसुद्धा बदलली, आपल्या समाजाचे स्वरूप बदलले. शहरीकरणाची प्रवृत्ती वाढली आणि राज्ये अधिक शक्तिशाली बनली व मोठी झाली. आजचा मानव जीवनाचा पूर्ण आनंद लुटीत आहे. ज्याप्रमाणे फुलाबरोबर कांटे असतात त्याचप्रमाणे विज्ञानाची एक दुसरीही बाजू आहे. विज्ञानाचे जसे फायदे आहे तसे तोटे हि आहेत .
विज्ञान एक चांगला दास आणि वाईट मालक आहे. नवनिर्माणाबरोबर ते विनाशही करते. विज्ञानाने पृथ्वीला स्वर्ग बनविण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही त्याच विज्ञानाने मानवासाठी नरकाची दारे पण उघडली.
जेव्हा १७ व्या शतकात विशुद्ध विज्ञानाच्या विकासातून औद्योगिक क्रांति झाली. तेव्हां, तिचे युरोपात जंगी स्वागत झाले. या क्रांतीमुळेच कित्येक कुटुंबे विखुरली कित्येकांचे शोषण झाले. औद्योगिकीकरणामुळे पाचात्य राष्ट्रीच्या व्यापाराच्या स्पर्धा वाढल्या, हुकूमशाहीचा जन्म झाला व शेवटी विश्वयुद्ध झाले.
विज्ञानाच्या विकासाने अनेक नव्या विचारांना, प्रवृत्तींना जन्म दिला त्याआधारे गट पडू लागले. विज्ञानाच्या शोधांमुळे लागलेला अणुशक्तीचा शोध ही एक महत्त्वाची घटना होती. तिचा विधायक उपयोग झाला तर आपल्या संस्कृतीला नवीन उच्च मापदंड मिळू शकले असते परंतु तसे काही घडले नाही. हिरोशिमा आणि नागासाकीवर टाकण्यात आलेले अणुबाँब ही एक हृदयविदारक घटना होती. तिने विज्ञानाचे भीतीदायक घातक दृश्य आपल्यासमोर उभे केले.
आज मानवाने उच्च कोटीची आण्विक शस्त्रे, क्षेपणास्त्रे रासायनिक स्फोटके इत्यादी तयार केली. असा अंदाज करणे चूक ठरणार नाही की, जर तिसरे महायुद्ध झाले आणि उपरोक्त शस्त्रांचा त्या युद्धात उपयोग करण्यात आला तर संपूर्ण जीवसृष्टीच नष्ट होईल.
विज्ञानाने मानवाला पूर्णपणे भोगवादी बनविले आहे. आज मानव स्वयंचलित यंत्रांवर इतका अवलंबून आहे की त्यामुळे त्याची हाताने काम करण्याची क्षमताच संपली आहे. तो मद्यपान करतो, क्लबात जातो, किंबहुना दुर्व्यसनात तो पूर्णपणे बुडालेला आहे. वेळेचा सदुपयोग कसा करावा हे विज्ञान आपणास सांगत नाही. विज्ञानाने मानवाला कुशाग्र बनविले. परंतु नैतिकता शिकविली नाही. विज्ञानाने मानवाला साधने दिली पण त्यांचा सदुपयोग शिकविला नाही.
परिणामी सर्वत्र बेकारी, अशांती, कटुतेचे साम्राज्य दिसू लागले. विज्ञानाने ज्या तीव्र गतीने समस्या सोडविल्या त्यापेक्षा जास्त तीव्रगतीने आपल्यासाठी समस्या निर्माण केल्या. परिवहन जलदगतीने वाढले तितकेच अपघातही वाढले. उद्योगधंदे खूप विकसित झाले तसेच कारखान्यांतील अपघात वाढले. उदा. भोपाळ गॅस दुर्घटना. अनेक रोगांवर उपचार सापडले त्याबरोबरच एड्ससारखे घातक जीवघेणे आजारही उत्पन्न झाले. पर्यावरणाची संरक्षक साधने दिली त्याबरोबरच पर्यावरणाला दूषितही केले.
सारांश, विज्ञान न शाप आहे न वरदान ते एक निर्भेळ ज्ञान आहे. ज्याचा उपयोग मानवाच्या विवेक बुद्धीवर आधारित आहे. आणि त्याचा सदुपयोग करून त्याला वरदान करण्यात मानवाचाच हात आहे. एकीकडे मानव जहाजाने प्रवास करून वेळेची बचत करतो तर दुसरीकडे विमानातून बाँब वर्षाव करून क्षणात गावेच्या गावे उद्ध्वस्त करतो. कसायाच्या हातातील सुरा प्राण्यांना मृत्यू देतो तर तोच सुरा डॉक्टरच्या हातात असेल तर मनुष्याला जीवदान देतो.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
विज्ञानचे फायदे आणि तोटे निबंध
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात ज्यामुळे प्रगती झाली ते ज्ञान म्हणजे विज्ञान. ज्या ज्ञानामुळे सर्वांचे आयुष्य सुखकर झाले ते ज्ञान म्हणजे विज्ञान. विज्ञानाचा सर्वात मोठा शोध म्हणजे वीज होय. विजेचा शोध लागला आणि मानवाच्या प्रगतीच्या सीमा संपल्या. यंत्रांचा शोध व विजेचा शोध यामुळे मानवाच्या हाती जणू अल्लाउद्दिनचा दिवा लागला.
सर्व कामे तो वीज व यंत्रांच्या साह्याने करु लागला. आता तर तो केवळ आज्ञा करतो सर्वे यंत्रे त्याची गुलाम आहेत. ती सदैव त्याच्या समोर हात जोडून उभी असतात व जणू काही विचारत असतात की, “मेरे आका, मेरे लिये क्या हुक्म है?" मनुष्य केवळ एका छोट्या रिमोटच्या बटणाने त्यांना आज्ञा देतो. कोणतीही कुरबुर न करता, क्षणाचाही विलंब न लावता, न चुकता, वेळ काळाची तमा न बाळगता, यंत्रे दिलेले काम संपवून टाकतात व पुन्हा “मेरे आका, मेरे लिये क्या हुक्म है?"अशी म्हणायला तयार असतात. त्यामुळे म्हणावेसे वाटते.
शोध सारे विज्ञानाचे, मानवाच्या कल्याणाला विकृतीने नका लावू, गालबोट विज्ञानाला. वीज; शोध विज्ञानाचा, यंत्र, शोध विज्ञानाचा शोधामुळे माणूस सुखी; चमत्कार विज्ञानाचा __ संगणकाच्या शोधामुळे तर प्रचंड क्रांती झाली आहे. सर्व किचकट कामे त्यामुळे अगदी सुकर झाली आणि इंटरनेट ने तर धमालच केली. जगातील ज्ञानाची सर्व दालने अगदी दहा बाय दहा च्या खोलीत आणून ठेवली.
अहो केवढं अथांग विश्व! परंतु संगणकाने केवळ काही चौरस इंचात बसविलं. जमिनीवर तसेच आकाश व पाताळावर त्याने आपली सत्ता प्रस्थापित केली ती विज्ञानामुळे, प्रचंड वेगवान मोटारी, रेल्वे, विमाने, रॉकेट्स निर्माण करुन तर त्याने आवाजाच्या वेगाशी स्पर्धा केली व मानवी आयुष्य वेगवान करुन सोडले. विज्ञान आज आमच्या अंगी एवढं भिनलं की प्रत्येक क्षण आम्ही विज्ञानाच्या साह्याने जगतो. रोज कुठलातरी नवीन शोध लागतो व विज्ञानाच्या मुकुटात एक नवीन मानाचा तुरा खोवला जातो.
विज्ञानाने,आंधळ्याला दिला डोळा आणि पाय लंगड्याला बहिऱ्याला दिला कान आणि वाचा मुक्याला चमत्कार वाटावे असे कित्येक शोध विज्ञानामुळे लागले व मनुष्य सर्वच बाबतीत समृद्ध होत गेला. पूर्वीची जीवन जगण्याची त्याची शैली पार बदलूनच गेली. सर्व प्राण्यात तो उठून दिसतो, शोभून दिसतो त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आणि हे सर्व शक्य झाले ते विज्ञानामुळे.
सृष्टीतील सर्व सजीव एकीकडे तर मनुष्य एकीकडे अशी उच्चतम अवस्था त्याने प्राप्त केली.किती सांगावी महती विज्ञानाची. संपवता संपेना परंतु कवींनी ती महती दोन ओळीत सांगण्याचा प्रयत्न केला तो असा अरे विज्ञान विज्ञान, काय सांगू त्याची महती कुबेराच्या संपत्तीची, किल्ली विज्ञानाच्या हाती कोणतेही ज्ञान योग्य तेव्हाच ठरते जेव्हा ते सर्वांसाठी हितकारक असते.
त्याचा उपयोग इतरांना हानी पोहोचविण्यासाठी केला तर.... तर ते विकृत ठरते. विज्ञानाने शोधून काढलेली विविध घातक शस्त्रे, अणुबॉम्ब जेव्हा विध्वंस करण्यासाठी वापरली जातात तेव्हा विज्ञानाच्या शोधाचा तो उपहास उडविला जातो. संपूर्ण मानवता संपुष्टात आणली जाते व मानव हा मानव न राहून तो काळराक्षस ठरतो आणि म्हणून जाता जाता सांगावेसे वाटते की,
शोध सारे विज्ञानाचे, मानवाच्या कल्याणाला विकृतीने नका लावू, गालबोट विज्ञानाला.