शिक्षणातील भ्रष्टाचार मराठी निबंध | corruption in education essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण शिक्षणातील भ्रष्टाचार मराठी निबंध बघणार आहोत.
आज प्रात:काली आम्हांला आयुर्वेदाचार्य चरकमुनी घनदाट अरण्यामध्ये घेऊन गेले आणि त्याठिकाणी आढळणाऱ्या विविध औषधी वनस्पतींची माहिती त्यांनी सप्रयोग सांगितली. आम्ही ती माहिती भुर्जपत्रांवर टिपून घेतली व विविध पक्ष्यांचे कूजन ऐकत ऐकत व भोजनासाठी सरपण वेचत केला व भोजन सिद्ध केले. तोपर्यंत मुनीजी त्यांचा ग्रंथ 'चरका संहिता' लिहीत बसले होते. आत्तापर्यंत तो ग्रंथ लिहून पूर्ण होत आला होता.
गुरुजी नेहमीच आम्हांला कोणत्याही गुरुदक्षिणेची अपेक्षा न करता त्यांच्या संहितारूपी ज्ञानसागराचे जल भरभरून देत असत. इतक्यात मी एकदम गजराच्या आवाजाने जागी झाले. पाहते तर काय ? मी स्वप्न पाहत होते. मी त्या स्वप्नावर खूप विचार केला आणि चटकन माझ्या डोळ्यांसमोर आजच्या शिक्षणसंस्था व त्यांचे विकाऊ शिक्षण आले. खरंच ज्ञानाचा, बुद्धीचा सागर असलेल्या भारताची आज काय अवस्था आहे ? पूर्वीसारखी उदार भावना आज राहिलीच नाही. 'ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते' ही संकल्पना कोणाला पटेनाशी झाली आहे. संकुचित वृत्ती वाढली आहे
त्यामुळेच आपल्या पूर्वजांनी लिहिलेल्या आद्यग्रंथांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि परदेशी विद्यापीठे मात्र तेच ग्रंथ पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करत आहेत. याचीच परिणीती त्यांनी अगदी गोमूत्र, कडुनिंब यांच्या पेटंट मिळविण्यासाठी अर्ज करण्यापर्यंत मजल मारली आहे व आपल्याच ज्ञानावरती हक्क गाजविण्याचा प्रयत्न करत आहेत.
हे चित्र आपल्याला का बरं पहायला मिळतं? तर आपल्या समाजाला आज भ्रष्टाचाररूपी कीटकाने पूर्णपणे पोखरून काढले आहे. सगळेजण पैशाच्या मागे लागले आहेत, फक्त पैशाच्या आधारावर सर्व काही मिळू शकते अशी भावना आज भारत वर्षामध्ये रुजत चालली आहे. याला अनुसरून मला म्हणावेसे वाटते.
डॉक्टरी साधा। वा विंजनेरी।।
पैशाला पासरी। पदव्या हो।।
ज्या देशामध्ये अशी स्थिती आहे त्या देशात ज्ञानाचे संवर्धन कसे काय होणार ? धनाढ्यांच्या मुलांनाच फयत वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षण मिळण्याची सोय आजच्या शिक्षणसंस्थांनी करून ठेवली आहे आणि गरीब पण हुशार विद्याथ्याना फक्त निराशा पदरी पडते आहे. कृष्ण आणि सुदामाने एकत्र कष्ट करून एकत्र शिक्षण घ्यावयाचे दिवस कधीच संपल आहेत. आजचा धनाढ्य कृष्ण सुदाम्याला कधीच आपला मित्र मानत नाही.
या परिस्थितीच्या परिणामांचे चित्रीकरण परवाच मुन्नाभाई एम.बी.बी.एस. या चित्रपटामध्ये अतिशय सुरेख केले आहे. जर पैशाच्या जोरावर पदवी मिळविली तर जेव्हा प्रत्यक्षामध्ये रोग्यांवर इलाज करण्याची वेळ येईल तेव्हा नक्कीच या 'पदवीसम्राटांची' वेधातिरपीट होणार आहे आणि अशा डॉक्टरांकडे जाणाऱ्या जनतेला पैसे देऊन प्राणास मुकावे लागणार आहे. हे आपल्या देशाच्या प्रगतीला परवडेल का? म्हणूनच जर शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार थांबवून भारताला प्रगती करावयाची असेल तर या शिक्षणसम्राटांच्या अरेरावीला सरकारने वेळीच प्रतिबंध घातला पाहिजे.
परवाच प्राप्तिकर खात्याने महाराष्ट्रातील काही शिक्षणसंस्थांची तपासणी केली आणि शिक्षणसम्राटांनी पायावर धारण बसविली. अशाच प्रकारे जर सरकारने सर्वच महाविद्यालयांना जरब बसवून त्यांचे टेबलाखालून पैसे घेण्याचे धोरण निकामी केले तर नक्कीच उद्या गरीब आणि होतकरू विद्यार्थी सुद्धा शिक्षणक्षेत्रामध्ये नावारूपास येतील आणि आपला भारत देश नक्कीच एक महासत्ता बनेल आणि तेव्हाच आपण अभिमानाने म्हणून शकू.
सुनो गौर से दुनियावालो । बुरी नजर ना हम पे डालो। चाहे जितना जोर लगालो। सबसे आगे होंगे हिंदुस्थानी।।