एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध | Ekvisavya Shatkatil Bharat Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एकविसाव्या शतकातील भारत मराठी निबंध बघणार आहोत. सहज एकदा वर्तमानपत्र वाचत असताना कुठून तरी गाण्याचे सूर कानावर आले ते असे "ये दुनिया एक दुल्हन दुल्हन ....... ये माथे की बिंदीया ....... आय लव्ह माय इंडिया' .......... आणि मनात विचार आले आज आपला देश खरंच का कुणाच्या तरी माथ्यावरील बिंदीया बनण्याच्या लायकीचा आहे ? खरं तर आजही आपल्या देशात कुणा नववधूच्या माथ्यावरील बिंदी तिच्या एकनिष्ठतेचे, तिच्या मांगल्याचे प्रतिक मानले जाते. अशी एकनिष्ठता, महानता, त्याग आणि विश्वास आज आपल्यात आहे का ?
लाखो लोकांच्या प्राणार्पणातून जन्माला आलेल्या या स्वातंत्र्याचा आपण पुरेपूर उपभोग घेत आहोत का ? की या स्वातंत्र्याचा कुठे अतिरेक तर नाही ना होत ? या स्वातंत्र्याची जागा स्वैराचाराने घेतली नाही ना ? असे वादळ मनात उठणे साहजिकच आहे, कारण आपल्या पूर्वजांनी नुसती प्राणाची आहुती देऊन आम्हांला स्वातंत्र्यच मिळवून दिले नाही तर आपल्या सत्कृत्यातून कित्येक आदर्श तत्त्वज्ञान जीवनमूल्ये आमच्यापुढे ठेवून गेले आहेत, पण ही जीवनमूल्ये ठायीठायी पायदळी तुडवताना दिसतात.
ज्या गांधीजींनी आम्हांला सत्य, अहिंसा शिकविली, त्यांची शेवटी हत्या करण्यात आली. ज्या आंबेडकरांनी आम्हांला स्वाभिमान दिला तो आज आम्ही ठायीठायी लाचारीने गहाण टाकला आहे. केवळ पैशासाठी आज भारत देश भ्रष्टाचार, वासनाकांड अन् दहशतवाद यांच्या गुलामगिरीत अडकलाय.
"स्वार्थी नेत्याचा भ्रष्टाचार। देशात माजलाय स्वैराचार ।।
गांधी नेहरूंची पवित्र भूमी। वारस त्यांचे आम्ही दुर्गुणी ।।"
आज भारत राजकीय,सामाजिक आर्थिक समस्यांनी ग्रासला आहे. भ्रष्टाचार प्रत्येक क्षेत्राचा जावई बनला आहे. आमची बुद्धिमत्ता पैशाच्या तराजूत तोलली जाते. शिक्षणाच्या बाजारात "उषःकाल होता होता काळ रात झाली'' असे म्हणण्याची वेळ आली आहे बेकारी, गुंडगिरी, त्यातून उभी राहणारी सामाजिक अशांतता यामुळे आपली भूमी पोखरत चालली आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. ही प्रतिज्ञा उरलीय फक्त नावाला.
भारताभोवती आज या समस्या असल्या तरी गेल्या काही वर्षात भारताने प्रचंड प्रगती साधली आहे. वसाहतवादाचा वारसा लाभलेला भारत पूर्वी मागासलेपणाचे मूर्तिमंत प्रतिक होता. दोन तृतीयांश भारतीय दारिद्र्यरेषेखाली होते. साक्षरता १/४ होती. भारत दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता पण कणखर नेतृत्वामुळे भारत हा एकसंध व धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास आला. जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारत ताठ मानेने उभा राहिला. भारताने आज सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व संरक्षण क्षेत्रात आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे.
जरी अनेक भीषण प्रश्न भारतासमोर असले तरी भारतीय माणूस शून्यातून स्वर्ग निर्माण करणारा आहे. गेल्या शतकातील अपयश या शतकात नक्कीच धुऊन काढता येईल. श्रीमंत देशातील गरीब लोक व अविकसित जनता अशी भारताची प्रतिमा बदलून एक बलाढ्य महासत्ता म्हणून या भारत भूमीचा गौरव होईल आणि गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल.
साधनांची कमतरता असताना देखील भारताने प्रगती साधली आहे ती केवळ दुर्दम्य आशावादाच्या जोरावर आणि आमच्यापुढे असणाऱ्या म. गांधी, पं. नेहरू, डॉ. कलाम यांच्या आदर्शानी आम्हांला शिकवले.
"येणाऱ्या दिवसांसाठी तयारीत राहा। त्यांना सारखेच सामोरे जा ।।
जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस। अन् हातोडा होशील तेव्हा घाव घाल ॥"
आम्ही ऐरणीचे घाव सोसून अपयशाकडून यशाकडे वाटचाल करत आहोत. एक अब्ज लोकसंख्या ही भारताची शक्ती आहे. अशक्य ते आम्हां काय आता..........
"अनंत आमुची ध्येयाशक्ती अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला" असा विचार मनात ठेवनच आम्हांला येथील भक, भय, दारिद्रय मिटवायचे आहे. जातीयवाद, प्रादेशिकतावाद सपा आहे.२०२० पर्यंत आम्हांला एक जागतिक महासत्ता बनायचे आहे.
'मक्समुलर' हा एक श्रेष्ठ तत्त्वज्ञ म्हणतो मला जर कोणी विचारले की पृथ्वीतलावर स्वर्ग आहे का ? याचे उत्तर पूर्वी मी 'नाही', असे देत होतो पण आता मात्र मी स्वर्ग म्हणून भारताचे नाव घेईन. खरोखरच या भारतमातेला स्वर्गासारखी बनवायची असेल तर आम्हांला गरज आहे धडाडी, चिकाटी, परिश्रम या मूलमंत्राची.
आम्ही सर्वजण एकत्र आलो, एकत्र राहिलो देशाच्या कल्याणासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी, वसुधैव कुटुंबकम या न्यायाने वागलो तर नक्कीच आपण आपल्या भारताला जगाला शोभणारी एका वधूची 'बिंदी' बनविल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद