वाढती लोकसंख्या एक समस्या मराठी निबंध | Essay on Population in marathi

 वाढती लोकसंख्या एक समस्या मराठी निबंध | Essay on Population in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण वाढती लोकसंख्या एक समस्या मराठी निबंध बघणार आहोत. कोणत्याही देशाची प्रगती ही त्या प्रदेशात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती आणि लोकसंख्येच्या प्रमाण अवलंबून असते. लोकसंख्या ही एक महत्त्वाची साधनसंपत्तीच आहे कारण माणूस हा आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर सभोवतालच्या वातावरणातून त्याच्या गरजा भागविण्यासाठी प्रयत्नशील असतो. परंतु लोकसंख्येचे प्रमाण जर वाढतच राहिले तर लोकाच्या मूलभूत गरजाही सर्वार्थाने पूर्ण करणे अशक्य होऊन बसल्याने लोकसंख्या ही एक मोठी समस्या ठरते, ओझे होऊन बसत.



१ मार्च २००१ रोजी भारताची लोकसंख्या १०२ कोटी झाली आणि जगाच्या क्षेत्रफळाच्या २, ४२% असलेल्या भारताच्या क्षेत्रफळात गेल्या १० वर्षांत १८ कोटींची भर पडली. सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनलाही कुटुंब नियोजनाच्या प्रभावी योजनेमुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता आले. परंतु भारतात मात्र स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ५४ वर्षे होऊनही या समस्येवर यशस्वी तोडगा काढण्याचा परिणामकारक प्रयत्न झाला नाही हे दुर्दैवच होय.



२००० साली भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करून त्यातील उपक्रमाद्वारे लोकसंख्येच्या वाढीची कारणे, परिणाम आणि उपाययोजना याविषयी ठोस माहिती प्राप्त करून घेतली आहे. लोकसंख्या वाढीच्या कारणांमध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे - त्या देशाचे (भारताचे) हवामान, विवाहासंबंधीचा समाजाचा दृष्टिकोन, बालविवाह, मुलींची लग्ने लवकर करणे (कारण अर्थार्जनाची कुचंबणा), निरक्षरता, अज्ञानीपणा, घरातील दारिद्र्य, कमी प्रतीचे जीवनमान. या गोष्टींमुळे लोकसंख्या वाढतच राहते.


 कुटुंब नियोजनाचे महत्त्व न समजणे, त्यासंबंधी सेवांचा सुविधांचा तुटवडा, आरोग्य कार्यक्रमांचा प्रचार व प्रसार यातील कमतरता यामुळे देशाची प्रगती व विकास यांच्या मार्गात लोकसंख्या एक महत्त्वाचा अडसर बनून राहते. त्यामुळे पुढील अनेक समस्या देशासमोर उभ्या राहतात.



मानवाची मूलभूत गरज - अन्न, वस्त्र आणि निवारा यातून सर्वांना पुरेसे अन्न-पाणी न मिळणे, वस्त्रप्रावरण न मिळणे, राहण्यास जागा न मिळणे, रोजगार व उद्योग न मिळणे, शिक्षणाच्या सोयी उपलब्ध न होणे अशा अनेक अडचणी निर्माण झाल्यामुळे देश प्रगतीपासून दूरच राहतो. हवा, पाणी, आरोग्य, वाहतूक यांचे संतुलन बिघडते. अन्नधान्याचा मेळ आणि लोकसंख्या वाढीचा मेळ घालणे अशक्य होते.


कृषी उत्पात घट आणि भूमीचे दरडोई कमी प्रमाण, यातून अनारोग्याची वाढ होते. बेकारीचे प्रमाण वाढतच राहते. तेव्हा देशातील प्रत्येक माणूस सुखीसमाधानी होऊ शकला तरच देशाचा विकास होणार, म्हणून लोकसंख्येला मर्यादा घालण्यासाठी प्रत्येक सुज्ञ व्यक्तीने प्रयत्न करणे हे आद्यकर्तव्य ठरते.


शासनातर्फे ज्या योजना जे प्रयत्न केले जातात ते जर अतिशय प्रामाणिकपणे अगदी खेडेगावांपासून सातत्याने खरोखरीच जर राबविले गेले तर निश्चितपणे लोकसंख्येस आळा बसेल. प्रत्येक ग्रामीण भागातील व्यक्ती ही स्वावलंबी बनली, खेड्यातील कृषी क्षेत्रातील भौगोलिक सामाजिक, आर्थिक समस्या सोडवली गेली, तिथे रोजगार निर्मिती होऊन खेड्याकडे चला हा महात्मा गांधीजींचा मंत्र जर अमलात आणला गेला तर निश्चितपणे महानगरावरील ताण कमी होऊन ग्रामीण भाग हा विकसित होईल.


देशातील खेडी हा भारत देशाचा आत्मा आहे. तिथेच जर साक्षरता प्रसार, स्त्रीशिक्षणाचे महत्त्व, विवाहाचे वय वाढविणे, कुटुंबकल्याण योजना, समाजविकास योजना, आरोग्य केंद्र यांच्या आदर्श कल्पना जर पूर्णपणे प्रत्यक्षात आणल्या गेल्या तर निश्चितपणे लोकसंख्येची वाढ ही रोखली जाईल आणि भारताच्याच नव्हे तर कोणत्याही देशाच्या प्रगतीतील फार मोठी समस्या दूर होईल यात शंका नाही. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद