मी प्रशासकीय अधिकारी झालो तर मराठी निबंध | If I became a officer essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी प्रशासकीय अधिकारी झालो तर मराठी निबंध बघणार आहोत. रस्त्यावरून एकदा मी असाच निघालो होतो, त्यावेळी रस्त्याची दुरुस्तीची काही कामे चालू होती. अतिशय घाईगडबडीने व निकृष्ट प्रतीचा माल वापरून काम उरकले जात होते. जनतेचा पैसा अक्षरशः वाया जात असल्याचे भीषण चित्र डोळ्यासमोर दिसत होते. क्षणभर मनात आले जर आपण या महानगरपालिकेचा आयुक्त झालो तर आपण नक्कीच या परिस्थितीत बदल करू शकतो. या विचारचक्रात क्षणात मी स्वप्नाच्या जगात शिरलो व एक प्रशासकीय अधिकारी या नात्याने मी काय करणार याचे मनात आडाखे बांधू लागलो.
प्रशासकीय अधिकारी प्रशासनाचा मुख्य कणा असतो. मी ज्यावेळी माझा कार्यभार हातात घेईन त्यावेळी सर्वप्रथम माझ्या इतर सहकाऱ्यांना विश्वासात घेईन तसेच माझे अधिकारक्षेत्र माझी कर्तव्ये यांची सांगड घालून प्रथम माझ्या भागातील सर्व मूलभूत प्रश्नांचा मुळापासून अभ्यास करून त्यावर उपाय म्हणून आवश्यक तात्कालिक परिस्थितीनुरूप निर्णय घेईन. प्रथम प्रशासकीय कामातील दफ्तरदिरंगाई, कर्मचारी व इतर लोकांची कामचलाऊ वृत्ती यावर नियंत्रण आणून प्रशासन वेगवान बनविणे.
लोकांना अत्याधुनिक सोयीसुविधा व साधनांचा उपयोग करून सर्व आवश्यक ती माहिती, मदत, सल्ला, कागदपत्रे, शंकानिरसन करून लोकांच्या मनात प्रशासनाविषयी प्रथम सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून प्रशासकीय अधिकारी व जनता यांच्यातील अंतर कमी करून प्रशासन जनताभिमुख बनविण्याचा प्रयत्न करीन.
प्रशासकीय अधिकारी म्हणून मी माझ्या अधिकारांचा जास्तीत जास्त वापर प्रशासनातील जो भ्रष्टाचार चालतो. प्रशासनात ज्या अपप्रवृत्ती बोकाळल्या आहेत. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांना पायबंद घालण्यासाठी तसेच गरज पडल्यास कठोर कारवाई करण्यास मी कमी पडणार नाही. विविध शासकीय योजना, लोकोपयोगी कार्यक्रमांचे मी सरकारी धोरणानुसार आयोजन करून 'लोकसहभागातून विकास' अशी नवीन विकासाची संकल्पना प्रत्यक्षात आणीन.
मी माझ्या कार्यक्षेत्रात स्वच्छता, शांतता, सामाजिक सलोखा राखण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. सरकारी अनुदाने, सोयीसवलती जास्तीत जास्त गरजू व तळागाळातील लोकांपर्यंत पोचविण्याचा मी जातीने प्रयत्न करेन. सरकारी निर्णय, सरकार धोरणे यांची माहिती सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी लोकांना पोहोचविणे हा माझा धर्म असून त्यात मी दिरंगाई करणार नाही.
मी माझ्या प्रशासकीय कार्यक्षेत्रात सरकारच्या संमतीने काही खास लोकोपयोगी योजना राबवण्याचा प्रयत्न करीन. बालमजुरी, वेठबिगारी, कुपोषण, स्त्रियांचे शोषण, शिक्षणविषयक समस्या, पायाभूत सोयीसुविधा, सामाजिक, आर्थिक व राजकीय समस्या यांमधून जनतेला कसे बाहेर काढायचे तसेच या सुविधा सोडवण्यास लागणाऱ्या सर्व उपायांची परिणामकरित्या अंमलबजावणी करून मी एक समर्थ व कुशल प्रशासकीय अधिकारी बनण्याचा प्रयत्न करीन.'
सत्ता, मोह, संपत्ती, वैयक्तिक हेवेदावे यांना बाजूला सारून सध्या आवश्यक असा सर्वगुणसंपन्न व आदर्श असा प्रशासकीय अधिकारी बनण्याचा मी प्रयत्न करीन. भ्रष्टाचार, उद्धटपणा, कामचुकारपणा या वाईट गोष्टीपासन मी कटाक्षाने दूर राहीन. मी माझ्या परीने चांगली वर्तणूक ठेवून लोकप्रिय प्रशासकीय अधिकारी बनण्याचा प्रयत्न करीन. प्रशासनात मी कोणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही मग ते प्रतिष्ठित नागरीक असोत किंवा कोणी राजकारणी अथवा कोणी श्रीमंत व्यक्ती, मी कोणाच्याही दबावास, प्रलोभनास बळी पडणार नाही. तसेच घाबरणारही नाही.
वेळ पडल्यास मी माझ्या अधिकाराचा वापर करू अशा भ्रष्ट प्रवृत्तींना धडा शिकवीन. माझी वैयक्तिक अधिकारकक्षा व कर्तव्यांचेही मी पालन करीन.प्रशासनात असताना मी सरकारी संपत्तीचा, सरकारी दस्तऐवज व इतर गोष्टींचा आवश्यक व कायदेशीर असाच वापर करीन. सरकारी गाठी, बंगला, सरकारी सोयीसुविधा यांचा अनावश्यक वापर टाळून या सरकारी सुविधांचा गैरवापर, उधळपट्टी करणार नाही. सरकारी कर्मचारी व नोकरी यांचा वापर खाजगी कामे करण्यास किंवा अशासकीय गोष्टी करण्यास अजिबात करणार नाही. मी माझ्यातर्फे सर्व ती खबरदारी घेऊन काम करीन. मी माझ्या कामात प्रामाणिक राहून खऱ्या अनि सेवक म्हणून काम करीन.
'प्रशासकीय अधिकारी हा जनतेचा सेवक असतो' याचे भान ठेवून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून चांगला नावलौकिक मिळवून देशाच्या व राज्याच्या विकासास हातभार लावून मी माझे कर्तव्य पूर्ण करीन, एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी आदर्श सर्वांसमोर ठेवीन. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता. धन्यवाद