जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान मराठी निबंध | Jay jawan Jay kisan jay vidnyan essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान मराठी निबंध बघणार आहोत. बऱ्याच वर्षांपूर्वी दिल्लीच्या रामलीला मैदानावर विराट सभा भरली. मुंगीलाही शिरकाव करण्यास जागा नव्हती. या प्रचंड सभेसमोर बोलणारी व्यक्ती मात्र शरीराने छोटी होती. बोलणारी व्यक्ती अन् ऐकणारे श्रोते दोघेही चिंताग्रस्त दिसत होते. 'परकीय आक्रमणाची कृष्णछाया.' साऱ्या देशावर पसरलेली होती.
संकटे कधी एकेकटी येत नाहीत, असे म्हणतात. त्यावेळी चीन, पाकिस्तान या दोन राजकीय शत्रूसोबत निसर्गाचा कोप ही भारतावर झाला होता आणि याच घोर अशा चिंतेमध्ये आजची सभा भरली होती. आपल्या लाडक्या मंत्र्याचा 'मंत्र' ऐकण्यासाठी, दिलासा मिळविण्यासाठी आतूर झाली होती ही सभा.
आपली देशाची आजची परिस्थिती, देशाची पूर्ण तयारी, देशबांधवांचा सैनिकांचा सीमारेषेवरील फार मोठा आधार आणि प्रत्यक्ष उदरभरणासाठी सदैव तयार असलेला आपला अन्नदाता, बळीराजा याविषयीच्या योजना, नवीन उपक्रम, प्रत्यक्ष जातीने करीत असणारे त्याबद्दलचे प्रयत्न यांची माहिती आपल्या तळमळीच्या आणि निश्चयपूर्ण अशा भाषेत या वामन मूर्तीने म्हणजे त्यावेळच्या पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी दिली आणि अखेरीस त्रिवार घोषणा... साऱ्या जनतेला उद्देशून केली...
"जय जवान, जय किसान।' त्यावेळी या चार प्रभावी शब्दांच्या संदेशाने... हजारो नाही... लाखो प्रतिध्वनी उत्स्फूर्तपणे निघाले... 'जय जवान, जय किसान।' देशाचा प्रत्येक जवान म्हणजेच देशरक्षक-सैनिक आणि सर्वसामान्यांची मूलभूत गरज भागवणारा... क्षुधाशांती राखणारा 'किसान' या दोन्हींच्या अविरत चाललेल्या... कष्टांचा-श्रमांचा त्यागाचा हा महान गौरव केला जात होता. त्यांच्या कष्टांसाठी महान त्यागासाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होता. ज्या ज्या वेळी अशी अस्मानी किंवा सुलतानी संकटे देशावर येतात तेव्हा... लालबहादूर शास्त्रींसारखे जन्माला यावेच लागतात...
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्यानं अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।।
असे आपल्या प्राचीन ग्रंथात म्हणून ठेवलेलेच आहे. त्यापूर्वीही पारतंत्र्याच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सर्व जनतेला जागे करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.' असा आदेश दिला होता. नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आपल्या शूर सैनिकांना 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' असे आश्वासन देऊन 'चलो दिल्ली'ची आज्ञा दिली होती. महात्माजींनी 'चले जाव' असा इंग्रजांना हुकूमच दिला होता.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाच्या विकासासाठी-समृद्धीसाठी-सर्वांनी कामाला लागावे, सर्वांनी प्रयत्न करावेत म्हणून, 'आराम हराम है' अशी जाणीव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी करून दिलीच होती. आणि शास्त्रीजींनी ही सीमारक्षण आणि अन्नधान्य आघाडी दोन्हीही सांभाळण्याच्या हेतूने घोषणा केली होती...
'जय जवान आणि जय किसान' काळ बदलत जातो... सत्ता बदलते, सत्ताधीश बदलतात. विज्ञान-तंत्रज्ञानाने तर फार जोरात सर्व देशातून मुसंडी मारली. या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या जोरावर आता मोठे देश... दुसऱ्या देशावर आपली हुकूमत गाजविण्याचा प्रयत्न करू लागले. आपल्या स्वतंत्र भारतालाही त्याची जाणीव झाली आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी १८ मे १९७४ रोजी प्रथम अणुचाचणी राजस्थानातील पोखरण येथे केली.
ती ही भारताच्या संरक्षणाची बाजू भक्कम होण्यासाठी आणि त्याचबरोबर देशातील विकास घडविण्यासाठीही. त्यानंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द, 'कारगीलचे युद्ध' एक विजयी मोहीम. त्या सुमारास ११ मे आणि १३ मे १९९८ च्या रोजी दुसरी आणि तिसरी अणुचाचणी पार पाडली अन् भारताचा दबदबा साऱ्या विश्वात वाढला. त्यावेळी काळाची गरज ओळखून, अटलबिहारींनी घोषणा केली होती.
जय जवान, जय किसान, जय विज्ञान।
आज इतिहासाची पाने चाळली तर आपल्याला हेच आढळते की 'बळी तो कान पिळी'. देशाच्या अंतर्गत विकासाच्या बरोबरीने देशाचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी 'तटबंदी' ही भक्कम ठेवणे आवश्यक झाले आहे. आणि त्यानुसार आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सर्व आघाड्यांवर आपले लक्ष हवे. आजचा काळ, आजचे युग हे 'स्पर्धेचे युग' झाले आहे. क्षणाक्षणाला...या तंत्रज्ञानाच्या युगात बदल घडतो आहे. नवीन नवीन प्रसिद्धी माध्यमे, संपर्क साधने, प्रगतीसाठीची उपकरणे, नवीन नवीन शस्त्रास्त्रे - क्षणार्धात जागोजागी फुटणारे ते बॉम्ब, नवीन पिस्तुली, गन्स, रायफलस् किती म्हणून सांगावीत,
त्या सर्वांशी स्पर्धा करायची म्हणजे पूर्वीच्या 'धनुष्यबाण-ढाल, तलवारींचा उपयोग काहीच होणार नाही... तेव्हा त्या काळातील त्या साधनांचा अभिमान ठेवून काळाप्रमाणे बदलणेच आज आवश्यक ठरत आहे. त्यासाठी प्रथम देशात 'राष्ट्रीय वृत्तीची वाढ केली गेली पाहिजे. देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना सैनिकांना सर्व प्रकारचे विशेषतः त्यांच्या कुटुंबाना साहाय्य देऊन त्यांचे रक्षण समाजाकडून झाले पाहिजे. त्यांच्या पालनपोषणाची, पोटापाण्याची, शिक्षणाची, व्यवसायाची व्यवस्था केली पाहिजे.' या सर्वांसाठी हवी, ती सुरक्षिततेची हमी, तेव्हा विज्ञानाची कास धरली पाहिजे. तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे तर आपण या स्पर्धेच्या युगात उभे राहू शकू.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद