माझी मायबोली मराठी भाषा मराठी निबंध | Mazi Mayboli Marathi Bhasha essay marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझी मायबोली मराठी भाषा मराठी निबंध बघणार आहोत.
"श्री चामुण्ड राजे करविलें ।। गंगराजे सुत्ताले करविले'
या श्रवणबेळगोळ येथील शिलालेखात कोरलेल्या शब्दांपासून मराठी भाषेच्या प्रवाहाचं चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. तो काळ म्हणजे इसवी सनाचे दहावे शतक त्याहीपूर्वी मराठी बोली जात होती, सातव्या शतकापासून. भाषा प्रवाही असते. ती समाजाची असते आणि संस्कृतीचा वारसा घेऊन समाजजीवनाबरोबरीने वाटचाल करीत असते. पुढे पुढे जात असते. काही जुन्या वाटा सोडून, काही नवीन वळणे घेत. काही शब्दांना मागे सोडत, काही शब्दांना नव्याने जोडत. भाषेचा प्रवाह चालत असतो.
आपल्या मराठीचा प्रवासही असा अनेक शतकांचा ! या शतकांच्या वाटचालीच्या खुणा आज आपल्याला दिसतात त्या क्वचित शिलालेखांतून आणि बव्हंशी साहित्यातून. खरे तर भाषातज्ज्ञांच्या मते भाषेचे लिखित रूप हे दुय्यम रूप. शब्दांतून उमटणारा अर्थपूर्ण ध्वनी महत्त्वाचा. बोलली जाते ती भाषा पण अनेक शतकांचा माग काढत भूतकाळात शिरायचे तर आज या लिखित भाषेशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणूनच, मराठीबद्दल बोलायचे ते साहित्यात उमटलेल्या खुणांची ओळख पटवते. म्हणून.
आजघडीपासून आठ शतके मागे गेल्यावर मराठी भाषेचे जे रूप दिसते ते महानुभवा संप्रदायाच्या साहित्यातून कथाकाव्यातून चोख, बावनकशी शुद्ध मराठी 'महाराष्ट्र देशी'चे 'लोकु' त्या वेळी बोलताना कशी छोटी-छोटी वाक्ये वापरत 'तेही पुसीलें', 'तेणें म्हणीतले', 'बैसों घातले' अशी सुटसुटीत वाक्य प्रश्न विचारला जाई- 'का गा' उत्तर येई - 'हां गा!' आश्चर्य वाटले तर उद्गार येई- 'व्हो कां जी' किंवा कधी नुसतं 'जी जी !' भाषेचा हा वापर मनाची हाक घालण्यासाठी, जवळीक व्यक्त करण्यासाठी, भावना उघड करण्यासाठी आत्मीयतेने होत होता.
पुढे ज्ञानेश्वरांनी स्वत:ची ओळख पटविताना 'बापरखुमादेवीवरू' म्हणून प्रत्यक्ष सावळ्या विठ्ठलाशीच मनाचे नाते जोडलं नामदेवांना 'बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ झाल्याचे अलोट दुःख झाले. संतमंडळींनी एकमेकांना ज्ञानोबा-तुकोबा असेच संबोधले. 'ये रे बा विठ्ठला' अशी जनाबाईची ममत्वाची हाक किंवा 'यादवांचा पोर' म्हणून कृष्णाचे केलेले कौतुक हे सारे लडिवाळ भाषेतून व्यक्त होत राहिले.
आज 'बाप' किंवा 'बा' शब्दाला येणारा उर्मटपणा, तुच्छतेचा किंवा हीनत्वाचा गंध तेव्हा या शब्दांभोवती नव्हताच. होती ती असीय आत्मीयता. त्याच काळात मराठी भाषेचा 'वेलु', 'नादु', 'संवादु', 'अळुमाक', 'गोपाळू' अशा उकारान्त शब्दांनी भाषेला गोडी दिली. 'येई वो', 'गे माये', 'अगा पांडुरंगा' अशी कोणतीही साद भाषेची हळुवारता स्पष्ट करत गेली आणि अर्थातच ती भाषा ओठी खेळवणाऱ्या 'इथे मराठीचिये नगरी' वसणाऱ्या 'जनांच्या प्रवाहाची' आंतरिक मृदुता उमटवीत गेली...
पुढे सोळाव्या-सतराव्या शतकात याच भाषेकडे एक जरब आली तो शिवकाळ. युद्धाचा आणि राज्यकारभाराचा फारसी भाषेचा संग घडलेला. 'राजे', 'स्वामी', 'राजश्री' अशी ललकारी घुमवणारा 'पंत', 'राव', 'आईसाहेब', 'माँसाहेब', 'अण्णाजी', 'जनकोजी' अशी अदबशीर संबोधने वापरणारा, 'फत्ते करावी', 'मुलूख मारावा', 'जेर करावे' अशा शब्दप्रयोगांतून 'मराठी मुलुखाची' जिगर दाखवून देणारा. पराक्रम घडले आणि या काळाची भाषाही पराक्रमांची ध्वनिचिन्हे उमटवू लागली.
याच काळात शाहिरांनी डफावर थाप मारीत भाषेचा एक 'महाठी' आविष्कार घडवायला सुरुवात केली. 'जी जी रंजी जी' हे पालुपद ज्याच्या त्याच्या ओठी खेळू लागले. भाषेत गावरान गोडवा आला. लावणीच्या पदन्यासाचा ठसकाही आला. तारुण्याची आणि प्रणयाची झिंग आजवरच्या हळुवार, कोवळ्या आणि अदबशीर शब्दांना मागे सारून पुढे आली.
नंतर अवतरला एक वेगळाच काळ. एकोणिसावे शतक प्रबोधनाचा कालखंड 'वाघिणीचे दूध प्यायलेले आमचे पगडबंद विचारवंत नव्या युगाचा मंत्र शब्दांच्या कुपीत बंद करून देऊ लागले. सारा महाराष्ट्र त्या मंत्राने भारला गेला. 'सांप्रतकाळी', 'एतद्देशीयांची', 'सद्य:स्थिती सुधारण्यासाठी 'विचार-मंथन' होऊ लागले. 'स्वातंत्र्य-समता-बंधुभाव', 'लोककल्याण', 'सत्यशोधन' हे केवळ शब्दच राहिले नाहीत. या संकल्पना ठरल्यापोटी अपार प्रागतिक सामर्थ्य असलेल्या संकल्पना.
'सावध ! ऐका पुढल्या हका ! म्हणून जागे करणारे हे शब्द होते मराठी भाषेचे विचार-वैभव पुनरिप एक लढ्याचा काळ, स्वातंत्र्य-लढा ! ठोक विचार व्यक्त करणारे, स्वातंत्र्य, स्वराज्य, जन्मसिद्ध हक्क, जन्मभूमी असे वजनदार शब्द - भाषेत आले. 'गोरासाहेब', 'आगीनगाडी', 'विलायत' असे कित्येक नव्या जगाचा परिचय करून देणारे शब्दही त्याआधी येऊन रुजले होते.
कथा-कादंबऱ्यांतून आणि विशेषत: कवितेतून 'हृदयाचे गाणे' गाणारे 'प्रेमाची व्यथा' सांगणारे हळुवार शब्दही भरभरून उमटू लागले. यंत्रयुग, शहरांची वाढ, पूर्णपणे बदलू लागले. यंत्रयुग, वैज्ञानिक प्रगती, संगणक, जागतिकीकरण, प्रसारमाध्यमे या साऱ्यांचा काळ म्हणजे २०व्या शतकाचा उत्तरार्ध. फक्त ५० वर्षांत किती झपाट्याने बदलली भाषा? म्हणजेच ती भाषा बोलणाऱ्या लोकांची -त्यांच्या समाजाची प्रवृत्तीच बदलली.
पूर्वीसारखी संथ प्रवाहीपणे नव्हे तर अचानक सागराला उधाण यावे तशी-एकाहून अधिक भाषांची विचित्र सरमिसळ, पूर्णपणे नव्याने रुजू झालेले, तंत्रज्ञान-विकासातून आलेले शब्द-इंग्रजी शब्द ते नाकारण्याचा अट्टहास करताना मुद्दाम रुजविलेले, कृत्रिम वाटावेत असे उदंचन, उद्वाहन, परिनिरीक्षणासारखे अनेक शब्द हिंदी भाषेशी नको तेवढी जवळीक साधत आलेले 'ग्रंथ-विमोचन', 'उद्यमशीलता'सारखे उपरे शब्द संगणकाची भाषा म्हणून सहज रूढ झालेले नेट, वेबसाइट, ई-मेल असे काहीतरी नवे शब्द शिवाय दोन शतकांपासून रुजलेले इंग्रजीचे टेबल, थिएटर, स्टेशन, बँक्यू, सॉरी,... किती किती आले त्याला आता मर्यादाच उरली नाही.
'बापरखुमादेविवरू ज्ञानेश्वरांचा ‘कवतिकाचा मराठाचि बोलू पार पार बदलला आहे. पण तो बदलणारच ! या बदलानेच ही मराठी आजवर तगली आहे, उद्याही... फुलेल... समृद्ध होईल... चिंतेचे कारण काय ? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद