गुरुदेव रवींद्रनाथ टागोर मराठी निबंध | rabindranath tagore essay in marathi

 गुरुदेव रवींद्रनाथ टागोर मराठी निबंध | rabindranath tagore essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  गुरुदेव रवींद्रनाथ टागोर मराठी निबंध बघणार आहोत. विल्फ्रेड ओवेन हा एक फ्रेंच वीर, पराक्रमी तरुण. युद्धावर जाण्यापूर्वी त्याने मातृभूमीचा निरोप घेतला, तो एका भारतीय महान कवीच्या 'काव्य' वाचनाने, त्याच्या डायरीतही काही काव्यपंक्ती होत्या. त्याही त्याच थोर कवीच्या महान काव्यसंपदेतील. तो महान कवी होता 'रवींद्रनाथ टागोर' अन् ते महान काव्य होते. जगप्रसिद्ध 'गीतांजली'. 


रवींद्रनाथांनाच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटावा अशी ही घटना. 'गीतांजली'तील ओळी वाचून जगातील अनेक भाषा बोलणारे लोक अगदी आनंदाने मुग्ध होऊन जातात. आमचेही त्यात असे दुर्दैव की, भारताबाहेरच्या लोकांनी जेव्हा या महान कवींच्या काव्यांवर पुष्पांजली वाहिली... स्तुतिसुमने उधळली, तेव्हा आमचे लोक जागे झाले. 'अरेच्या हा तर आपलाच माणूस.' असे त्यांना वाटू लागले. 'हा तर थोर कवी आपल्याच देशातला आहे' असे समजल्यानंतर सारे जण त्यांच्या सत्कारासाठी धावले.


रवींद्रनाथांचे कार्य ही तर ईश्वरी देणगी होती. त्यांनी ते कधी मानाच्या मोठेपणाच्या हेतूने केलेले नव्हते. तो तर उत्स्फूर्तपणे वाहणारा - खळाळणारा झरा होता. त्यांना पहिल्यापासूनच शांत एकाकी, रानावनांतून-फुलां-पानांतून दयाखोऱ्यांतूननिसर्गाच्या सान्निध्यातच राहणे पसंत होते. कोलकात्यात राहणारे हे टागोर कुटुंब जमीनदारीच्या कामामध्ये गुंतलेले होते. परतु लहानपणापासून रवींद्रनाथ मात्र वडिलांच्या समवेत हिमालयातील एकांत स्थळी तर कधी जमीनदारीच्या गावी जाऊन राहत असत. 


जमीनदारांसारख्या गर्भश्रीमंत घराण्यात जन्मलेला हा रवींद्र, श्रीमंत मुलांच्या वाट्याला न येणारे मर्दानी अन् साहसी जीवन बालपणीच जगत होता. कुस्त्या खेळणे, पोहणे, शिकारीला जाणे, अशा खैर जीवनाचा आनंद त्यांनी बालवयात लुटला होता. म्हणूनच की काय शाळेतले बंदिस्त जीवन त्यांना आवडले नाही.


परंतु दैवाचे खेळ कुणाला चुकलेत. वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी हा स्वप्नाळू कवी आदर्श जमीनदार ठरला. कारण त्यांच्या देवेंद्रनाथांनी त्यांच्याकडे सर्व जमीनदारीचे काम सोपवले. जमिनी, कुळे, शेतकरी अशी त्यांची कामे संपली की उरलेला वेळ रवींद्रबाबू आपल्या आवडत्या 'पद्मा' नावाच्या होडीवर काढीत. 


नौकाविहार मनसोक्त करीत. हे पाहून त्यांच्या आजोबांनी म्हणजेच द्वारकानाथांनी रवींद्रसाठी खास होडीघर बांधून दिले. आणि रवींद्रनाथांची अनेक साहित्यिक अपत्ये नाटके, कथा, काव्यरचना यांचा जन्म या 'पद्मा' होडीवरच झाला. 'सर्वांत अनमोल अशी कामगिरी 'पद्मा'ने बजावली अन् आपल्या पिताजींना त्यांच्या आयुष्यात भरपूर मानसिक आनंद-समाधान मिळवून दिले.' असे उद्गार खुद्द त्यांच्या चिरंजीवांचेच आहेत.



सृष्टीतील सौंदर्याचा वेडा असणारा हा कवी, तितकाच प्राचीन वाङ्मयात, अध्यात्मामध्येही रमायचा. बालवयातच कुटुंबात असताना उपनिषमंत्राच्या माध्यमातून त्यांची ईश्वरोपासना चालायची. बालपणीचे उपनिषद पाठांतर पठण, तरुण वयातील ‘पद्मा' नदीकाठचा तो विजनवास खेडेगावातील ते निसर्गदत्त झाडे-पाने-फुले, पाणी-पशू-पक्षी इ.मधील मुक्तसंचार - या सर्वांमधूनच 'गीतांजली' सारखी भावस्पर्शीसारखी अमर रचना निर्माण झाली. 


आपला मुलगा नृत्य, गायन इत्यादी कलांमध्ये रंगलेला असतो. प्रेमगीते-काव्य यांची रचना करतो, अशी कुणकुण देवेंद्रनाथाच्या कानावर गेली होती. परंतु एकदा त्यांनी ती गीते जेव्हा रवींद्रनाथाच्याच तोंडून गाताना ऐकली तेव्हा ती प्रेमगीते नसून भक्तिगीते आहेत, हे पाहून त्या प्रेमळ पित्याचा आनंद गगनात मावेना. ती गीते ऐकून ते म्हणाले, "तुझ्या गीतांबद्दल दिले जाणारे ते पुरस्कार, ती पारितोषिके अपुरी आहेत. मी जर एखादा राजा असतो तर तुला 'राजकवी'च्या सन्मानाने यथायोग्य असा गौरव केला असता."


रवींद्रनाथांच्या गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळून त्यांची दिगंत कीर्ती झाली. परंतु ते ब्रिटिश साम्राज्यशाहीचे मिंधे कधीच झाले नाहीत. "नियतीचे कठोर कालचक्र हिंदुस्थानचा रक्तशोषण करणाऱ्या या ब्रिटिश साम्राज्यशाहीला निश्चित प्रभाव दाखवील." अशी जणू शापवाणीच, रवींद्रनाथांच्या मृत्यूपूर्वी तीन महिने त्यांनी उद्गारली होती. धनाढ्य टागोरांच्या कुटुंबात मुळातच राष्ट्रीय बाणा जोपासला जात होता. 


स्वदेशी, वंगभंग अशा चळवळीतूनही रवींद्रनाथांनी भाग घेतला. इतकेच नव्हे तर 'जालियनवाला बागेमधील हत्याकांडाचा अमानुषपणा पाहून रवींद्रांनी आपल्याला मिळालेली 'सर' ही पदवी सोडून दिली. म. गांधीजींबद्दल तर त्यांना नितांत आदर होता. १९३२ मधील गांधीजींनी 'प्राणांतिक उपोषण केलेले समजल्यावर ते येरवड्याला धावले, गांधीजींना त्यांनी उपवास सोडण्यास भाग पाडले. रवींद्रनाथांचे 'जनगणमन' हे राष्ट्रगीत तर प्रत्येक भारतीयांच्या हृदयाचा ठेवाच बनला आहे.' 


भारताच्या या थोर राष्ट्रीय कवींनी नवीन पिढीतही राष्ट्रीयवृत्ती जोपासली जावी, देशप्रेमाचे-भक्तीचे बाळकडू हे शिक्षणातून भारतीयांच्या नसानसांपर्यंत पोहोचावे म्हणून त्यांनी 'विश्वभारती सारखी संस्था स्थापन केली. आपले सर्व तन-मन-धन अर्पण करून 'शांतिनिकेतन'सारखी जगप्रसिद्ध शिक्षणाचे अजरामर असे विद्यापीठ उभे केले. 



ग्रामीण भागातील आपल्या बांधवांसाठी जीवन ग्रामोद्योगांच्या माध्यमातून सुसंघटित होण्यासाठी 'श्रीनिकेतन' नावाची संस्था आजही दिमाखात उभी आहे. विविध कला-बाळांचे अध्ययन-अध्यापन-संगोपन इ. त्यांच्यावरील संस्थांतून कार्य अविरतपणे चालू आहे. विश्वभारती'चा उद्देश तर 'हे विश्वचि माझे घर' असेच आहे.


अशा आपले सर्व जीवन काव्य-साहित्य-देशप्रेम-भक्ती-शिक्षण-संस्कृतीची जोपासना यासाठी समर्पित करणाऱ्या या अर्वाचीन महर्षीचे देहावसान ७ ऑगस्ट १९४१ साली झाले. परंतु आपल्या कार्यातून... कृतीतून-साहित्यातून ते अमर झाले आहेत... अशा महान गुरुदेवांना आमचे त्रिवार वंदन. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद