आजची बालके उद्याचे भविष्य मराठी निबंध | aajchi balke udyache bhavishya essay in marathi

  आजची बालके उद्याचे भविष्य  मराठी निबंध | aajchi balke udyache bhavishya essay in marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  आजची बालके उद्याचे भविष्य मराठी निबंध बघणार आहोत. 

'बच्चे मनके सच्चे, 

सबकी आँखके है ये तारे।

ये वो नन्हे फूल है, 

जो भगवान को लगते प्यारे।।' 

मनाने निर्मळ असणारी ही बालके, खरेच भारतमातेच्या भविष्यातील उज्ज्वल असे तारे आहेत. सृष्टीचा नियमच आहे, जुनी पाने पडून-गळून जातात, त्याजागी नवीन पालवी फुटते, ती झाडाला फुलवते. बहरते, सर्वांना फळे-फुले देते.


अगदी तशीच कथा या आपल्या छोट्या-छोट्या बालकांची आहे. मानवी जात, समाजाचे अस्तित्व, गाव, देश आणि सारे. जग हे याच जीवनचक्रातून फिरत असते.परंतु आजच्या बदलत्या काळानुसार आई-वडील दोघेही नोकरीसाठी बाहेर पडतात. घरात आता आजी-आजोबाही मिळणे अशक्य असते. 


वाढत्या महागाईने अर्थार्जनासाठी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी आई-वडील नोकरी करतात. बालकांना मात्र उजाडल्यापासून पाळणाघरात भरती व्हावे लागते. वाढती लोकसंख्या आणि विभक्त कुटुंबपद्धती यामुळे 'हम दो हमारा एक' या संकल्पनेकडे आता कुटुंबे झुकत चालली आहेत.


पाळणाघरातही चांगल्याप्रकारे बालकाचे सामाजीकरण होईलच असे नाही. जसजसा बाळ मोठा होतो. तसतसे त्याचे सोबती-दोस्त वाढतात. 'शाळा-शिक्षण-अभ्यास-विविध प्रकारचे क्लास' यामुळे ती मुलेही पूर्णपणे व्यस्त राहतात. आपल्या भावना, आपले विचार कोणापुढे व्यक्त करण्याची ना सोय असते,


ना सवड. भीतीमुळे त्यांचे विचार दबले जातात. आई-बाबांशी बोलण्यासाठीही फोनचा आधार घ्यावा लागतो. अर्थातच हे अल्लड वय आणि लहान कोवळ्या वयात समोर असणारी असंख्य प्रलोभने - टीव्ही, जाहिराती, संगीत, गाणी,


खेळ, व्हिडिओ आणि आतातर इंटरनेटवरील चिटचॅटींग. नकळत ही मुले वाहवत जातात. आईच्या अंगाई गीताच्या जागी, • कसली-बसली गाणी-कर्कश आवाज त्यांना ऐकावे लागतात. समोर जेवण-खाण तर ते काढून ठेवलेले किंवा कधी कधी बेकरीतील पदार्थ यावर भागवावे लागते. 


ना प्रेमाचा हात, ना नात्यागोत्यांची ओळख, ना कुटुंब, ना घर, ना दार, ना गाव आणि ना देश. कशाचाच परिचय त्यांना झालेला नसतो... कशाबद्दलचे प्रेम त्यांच्यात निर्माण झालेले नसते.


तसे पाहता काळ हा नित्य परिवर्तनशील आहे. तसेच या मुलांना योग्य दिशा दाखविण्यासाठी ही आजकाल विविध संस्था कार्यरत आहेत. शाळाशाळांतून मौलिक शिक्षणाचे पाठ, व्यक्तिमत्त्व विकासाचे वर्ग, क्रीडांगणे, कला-छंद वर्ग. प्रयोगशाळा इत्यादी असतातच 


त्यांचा लाभ विद्यार्थ्यांना घेऊ देणे त्यासाठी आई-वडील अन् शिक्षक यांनी प्रयत्नशील राहणे आवश्यकच आहे. शालेय कार्यक्रमातून दिनविशेष, थोर नेत्यांच्या जयंत्या, राष्ट्रीय-धार्मिक सण, सहली, स्पर्धा, परीक्षा असेही नानाप्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यांचा परिचय, त्यांची ओढ या नवीन मुलांना लावून देणे अतिशय महत्त्वाचे आहे.


आजचे नागरिक तयार करण्यासाठी या बालकांना योग्य तो आकार देणे, त्यांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक वाढ व विकास हा उचित मार्गाने घडविणे हे आत्ताच्या मोठ्या लोकांचे महत्त्वाचे कर्तव्य आहे. ही निरागस, निष्पाप मुले खरोखरीच 'मातीचा गोळा' असतात. त्याला योग्य आकार आपण दिला पाहिजे.


अब्राहम लिंकन यांनीही बालकांवर योग्य संस्कार झाले पाहिजेत, यावर मार्गदर्शन केले आहे. संस्कारक्षम वयातच पालकांनी ही जबाबदारी पार पाडली पाहिजे. आपल्या मुलाच्या भवितव्यासाठीच नव्हे तर त्याचबरोबर देशाच्या भविष्याचा विचार करून आपल्या मुलांना आजी-आजोबांचा लळा, प्रेम हे दिले पाहिजे. त्यातूनच एकमेकांबद्दल स्नेह निर्माण होत असतो.


आजूबाजूची ही प्रलोभने नको ते संस्कार या कोवळ्या मनावर घडवीत राहतात, त्या जाहिराती... बातम्या-चित्रपट यांचा बरोबर उलट परिणाम या मुलांवर होतो आणि ही मुले आळशी-चैनी-चंगळवादी बनण्याची शक्यता वाढते.


तेव्हा त्यापासून पालक आणि शिक्षक, त्याचबरोबर समाजही मुलांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करेल तरच भविष्यकाळ आपला व त्यांचा उज्ज्वल राहील. काही वेळा मुले नाहक व्यसनात गुंतत जातात, निराश होतात... अशावेळी जर त्यांचे योग्य समुपदेशन झाले नाही, तर मुले हातची जातात. त्यांना सुधारणे अवघड होऊन बसते.


सुदृढ, सक्षम, निरोगी, व्यसनमुक्त, बुद्धिमान बालके ही त्या देशाची बलस्थाने असतात. प्रेम, श्रद्धा, कर्तव्य, चिकाटी,. कष्ट इ. अनेक गुणांचा संचय त्यांच्यात व्हावा म्हणून पालक, शिक्षक, समाज या सर्वांनी जागरूक राहिले पाहिजे. 


सर्वांत महत्त्वाचे 'पराभव' हसत हसत स्वीकारण्याची आणि 'विजय' संयमाने साजरा करण्याची जाण त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. त्यातूनच निश्चितपणे देशाचे भवितव्य हे उज्ज्वल होईल यात शंका नाही.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद