आंतरजातीय विवाह मराठी निबंध | Antarjatiy Vivah Essay In Marathi

   आंतरजातीय विवाह मराठी निबंध | Antarjatiy Vivah Essay In Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आंतरजातीय विवाह मराठी निबंध बघणार आहोत. समाजाची एक विशिष्ट रचना असते. त्या रचनेनुसार समाजव्यवस्था आपले कार्य करीत असते. समाजस्वास्थ्यासाठी काही घटना समाजाने मान्य केलेल्या असतात. शिवाय स्थल, कालपरत्वे यात बदल होत असतो.


आता संपूर्ण भारतात पूर्वीपासूनच एक वर्णव्यवस्था आहे. पूर्वी चातुर्वर्ण्य होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णात समाजातील माणसांची व्यवसायानुसार विभागणी झाली होती. पण त्यातला मूळ हेतू समाज विसरला आणि समाजात वर्णानुसार बंदिस्त रचना आली.


प्रत्येक वर्णाची जीवनव्यवस्था वेगळी झाली. रीतीरिवाज, रूढी, पद्धती यातही पर्यायाने भेद होता. ही व्यवस्था समाजात खोलवर जाऊन रुजली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समाजाने विवाहसंस्था मानली. धार्मिक पद्धतीने दोन माणसे आणि दोन माणसांची दोन घरे विवाह या घटनेने एकत्र आली. पूर्वी समाजात बालविवाह होत. 


मुलामुलीला लग्न म्हणजे काय हे समजायच्या आतच त्यांना विवाहबंधनाने एकत्र आणले जाई. शिवाय पूर्वी बालमृत्यूचे प्रमाण जास्तच होते. पर्यायाने बालविधवांचे आणि सतीचे प्रश्न समाजात निर्माण झाले. शिवाय अगदी पूर्वी एकपत्नित्वाचा कायदा नव्हता. 


घटनेत दुरुस्ती करण्यात आली आणि प्रत्येक पुरुषाला एकाच स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करता येईल असे निश्चित झाले. हा कायदा मुसलमानांना लागू नाही.या सर्वांत एक गोष्ट घडत गेली आणि ती म्हणजे समाजात होणारे विवाह हे जातिनिहाय होऊ लागले. 


म्हणजे त्याच जातीतील मुलगा-मुलगी हवी. या जातीत पुन्हा उपजाती होत्या आणि आजही आहेत. पुन्हा त्यांच्या पोटजाती आहेत. त्यांच्याबाहेर विवाह होत नसत. आज कमीत कमी पोटजातीय विवाह तरी होत आहेत. 


उदाहरण घेऊन सांगायचे झाले तर ब्राह्मण या जातीच्या देशस्थ, कोकणस्थ, क-हाडे या उपजाती; त्यांच्या पुन्हा यजुर्वेदी, ऋग्वेदी, चित्पावन, आपस्तंभ अशा पोटजाती. तसेच सर्व जातीत अनेक जाती-उपजाती आहेत. यातून समाजात जातीयतेची अधिकच गुंतागुंत होत गेली.


हा गुंता पक्का झाला. तो गुंता सोडवावा असे कुणालाही वाटत नव्हते. मग मात्र समाजाच्या प्रगतीच्या आड या जाती येऊ लागल्या तेव्हा समाज खडबडून जागा झाला. जे काही प्रश्न सामाजिक समस्येत येऊ लागले त्यांपैकी आंतरजातीय विवाह हा एक न होता, आहे आणि यापुढेही असेल.


आता यापुढचा प्रश्न म्हणजे हे आंतरजातीय विवाह करणे योग्य की अयोग्य ? समाजाच्या दृष्टीने ते हितकारक आहे की अहितकारक आहे ? या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी लग्न-विवाह या गोष्टीपाठीमागची भूमिका थोडक्यात पाहणे अत्यंत आवश्यक आहे.


लग्न म्हणजे केवळ दोन शरीरे एकत्र येणे असा अर्थ नाही. तर दोन माणसे - एक स्त्री - एक पुरुष जीवनाचे सोबती, सहचर म्हणून आयुष्यभरासाठी एकत्र येणे होय. अनेक वेळा लग्नासंबंधी असे घडते की ज्या दोघांना लग्न करायचे असते त्यांची विवाहाला संमती आहे की नाही याचा विचार केला जात नाही. 


जणू काही लग्ने घरातील मोठी माणसे आपल्यासाठीच करीत आहेत ! तेव्हा मुला-मुलींचे स्थान हे बाहुला-बाहुलीसारखे असते. अनेक वेळा परस्परांची पसती नसते. मनातून लग्नात ते राजी नसतात. आकाशस्थ ग्रह पत्रिकेत जुळले तरी प्रत्यक्ष जगण्यात जुळत नाहीत. त्यांचा ससार सुखी होत नाही.


पर्यायाने त्यांचे कुटुंबीयही सुखी-समाधानी राहत नाहीत. मग एका दृष्टीने विचार करता जातीय विवाह हेही समाजाला मारक आहेत. आंतरजातीय विवाह आजतरी बरेच वेळा प्रेमविवाह असतो. परिस्थिती अगदीच निराशाजनक नाही. 


निवडणुकीच्या वेळी जातीपातींच्या राजकारणात लढत येत असली तरी सहशिक्षणपूर्व नव्या पिढीच्या विचारात गेल्या तीस-चाळीस वर्षांत खूपच फरक पडला आहे. आज आंतरजातीय विवाहांना विरोध राहो, कौतुकच होत आहे. पूर्वी जातीबाहेर रोटीबेटी व्यवहार होत नसत. 


आजही खेडोपाडी ते होत नाहीत. पण जेव्हा समाजात विवाहेच्छू तरुण व तरुणी परस्परांची जात-गोत्र न पाहता प्रेमबंधनाने एकत्र येतात तेव्हा ते सुखासमाधानाने संसार करतात. सुखाशी जातीचा संबंध नसतो. कारण विचार - आचार - मन या सर्वांत दोघांच्या बाबतीत एकसूत्रीपणा असतो.


हा एकसूत्रीपणा त्यांच्या जीवनाचा पाया असतो. मग आपण कोणत्या आधारावर म्हणावयाचे की आंतरजातीय विवाह हे समाजाला मारक आहेत म्हणून? अनेक प्रेमविवाह करणाऱ्यांची पुढची पिढी मोकळ्या मनाने वावरते. कारण जातीची बंधने तोडण्याचे धैर्य दाखविणारी ही जोडपी आता पालक आहेत आणि नवी पिढी अधिक परिपक्व झाली आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद