अतिवृष्टी मराठी निबंध | ativrushti essay in marathi

अतिवृष्टी मराठी निबंध | ativrushti essay in marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अतिवृष्टी मराठी निबंध बघणार आहोत. आजवर भारताने पर्यायाने महाराष्ट्राने अनेक नैसर्गिक आपत्ती झेलल्या. समर्थपणे पेलल्या परंतु २६ जुलै या दिवशीची आपत्ती तिची व्याप्ती इतकी मोठी होती की सुरुवातीचे दोन दिवस शासनाला तिचा अंदाज आला नाही. ज्या दिवशी उभा भारत कारगील विजय दिन, राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचा आणि सामाजिक न्याय दिन साजरा करिता होता त्या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनता आपला जीव मुठीत धरून मिळेल तिथे आसरा घेऊन उभी होती.


भारताची आर्थिक राजधानी (भावी शांघाय) म्हणून ओळखली जाणारी ७ बेटांची मुंबई पूर्णपणे जलमय झाली होती. तब्बल ३३ लाख लोक त्या दिवशी रस्त्यावर होते. सांताक्रुझ या ठिकाणी विक्रमी ९४४ मि.मी. पाऊस पडला होता. इकडे महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यांनी वार्षिक सरासरी केव्हाच ओलांडली होती. 


१० जिल्ह्यातील सुमारे दोन कोटी महाराष्ट्रीयांना पावासाची झळ पोचली होती. त्यात कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणातून सहा लाख क्यूसेक्सने पाणी सोडण्यात नकार दिल्याने धरणाचा बॅक वॉटरचा फुशारा सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पसरल्याने त्यांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते.



या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील सहा लाख हेक्टरवर शेती नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अतिवृष्टीचा महाराष्ट्रातील ८१६४ खेड्यांना फटका बसला. त्यात ६००० खेडी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. पन्नास लाख लोक एका क्षणार्धात बेघर झाले. 


हजारो संसार उघड्यावर आले एक लाख हेक्टर व्याप्ती असणारी फळबाग शेती उन्मळून पडली. २३ हजारावर मुकी जनावरे मृत्यूमुखी पडली. १००० वर माणसांचा बळी या काळरूपी अतिवृष्टीने घेतला. आर्थिकदृष्ट्या पंधरा हजार कोटी रुपयांचे नुकसान महाराष्ट्राचे झाले आहे. हजारो घरे वाहून गेली आहेत. राष्ट्रीय आपत्तीप्रमाणेच हे आस्मानी संकट महाराष्ट्रावर कोसळले.


अनेक ठिकाणी उल्लेख झाला की पहिल्या क्रमांकाचा पाऊस मुंबईमध्ये. कुणी चेरापुंजीशी तुलना केली परंतु ज्या हजारो लोकांचे संसार ज्याला अमृताची उपमा दिली जाते त्या विषरूपी पाण्याने वाहून नेले. त्यानंतर अर्थातच अनेक साथीच्या रोगांची लागण झपाट्याने महाराष्ट्रात पसरली. लेप्टोस्पायरोसिस, कॉलरा, पटकी अशा अनेक रोगांची बाधा पूग्रस्तांना होऊ लागली.


या संकटाला महाराष्ट्र शासन खंबीरपणे तोंड देत आहेत. युद्धपातळीवर मदत कार्य चालू आहे परंतु संकटाच्या व्याप्तीमुळे अद्यापही काहींना मदत पोहचलेली नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आदरणीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी तत्परतेने एक हजार कोटी रुपये महाराष्ट्राला मदत म्हणून पाठविले. लष्कराचीही मदत घेतली जात होती. या परिस्थितीला तमाम महाराष्ट्रीयांनी अत्यंत सहनशीलतेने, धीरोदत्तपणे हाताळले आहे. नुकतेच भारताचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी महाराष्ट्र शासनाचे कौतुक केले आहे.


असे असले तरी प्रगतीशील म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रातील विशेषत: मुंबईतील नागरी सुविधांचा पुरता बोजवारा उडालेला आहे. याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. नद्यांवरील वाढत जाणारी आक्रमणे (मिठी नदी = मिठी ओढा), प्लॅस्टिकचा अमर्यादित वापर, (चितळे समितीच्या निष्कर्षातील पूराला जबाबदार कारण) नागरीकरणाकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष, पुरेशी आपातकालीन सुविधांचा अभाव, पुराचे पाणी झिरण्यासाठई आवश्यक असलेल्या मोकळ्या जागा, मिठागरे, बंद गटारे, नाले या सर्व सुविधांकडे काळजीपूर्वक लक्ष देऊन त्यावर उपाययोजना आवश्यक आहे. 


नियोजनबद्ध नागरी शहरांची रचना आवश्यक आहे. नदीजोड प्रकल्पाची लवकरात लवकर पूर्तता हे एक पूरनियंत्रणावरील समस्येचे निराकरण ठरू शकते. या त्सनामी पद्धतीच्या आपत्तीने अखिल महाराष्ट्राचे सामाजिक जीवन ढवळून निघाले आहे. या संकटात मानवातील सप्तावस्थेत गेलेले त्याग, धैर्याने तोंड देण्याची वृत्ती, आपुलकी, माणूसकी इ. गुणांचा अविष्कार पुन:पुन्हा निर्दशनास आला.


 या सह्याद्रीच्या मर्द मावळ्याला आज गरज आहे ती मायेची, आधाररूपी शब्दांची तो हे संकटही पार पाडेल यात संदेह नाही. आणि हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा समर्थ रामदास स्वामींचा कणखर, बुलंद असा महाराष्ट्र आहे हे अखिल जगाला दाखवून देईल.मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद