भारताचा अंतराळ युगात प्रवेश मराठी निबंध | BHARTACHA ANTARA L YUGAT PRAVESH ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भारताचा अंतराळ युगात प्रवेश मराठी निबंध बघणार आहोत. १९ एप्रिल १९७५ हा दिवस प्रत्येक विज्ञानप्रेमी भारतीय नागरिक एखाद्या सणाप्रमाणे महत्त्वाचा मानील. कारण याच दिवशी भारताने आपला 'आर्यभट्ट' नावाचा पहिला उपग्रह अंतराळात सोडला आणि अंतराळाचा वेध घेणाऱ्या जगातल्या इतर दहा देशांच्या मालिकेत स्वत:ला महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त करून घेतले.
विज्ञानाच्या दृष्टीने भारताने जगात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थान 'आर्यभट्ट' सोडण्याअगोदरच्याच वर्षी म्हणजे १९७४ मध्ये प्राप्त करून घेतलेले आहे. कारण १९७४ च्या मे महिन्यात भारताने राजस्थानमधील ओखा येथे आपला पहिला अणुस्फोट घडविला.
इतर अणुसंशोधक राष्ट्र आपापले स्फोट समुद्रावर घडवीत असताना भारताने त्यांच्यापुढे एक पाऊल जाऊन ओखा (पोखरण) येथील अणुस्फोट जमिनीखाली घडविला. हा अणुस्फोट अर्थातच अधिक सुरक्षित होता. त्यामुळे भारताच्या वैज्ञानिक प्रगतीकडे जगाने आश्चर्य नजरेने पाहिले.
या शास्त्रीय अणुस्फोटाच्या पाठोपाठच १९ एप्रिल १९७५ या दिवशी भारताच्या 'आर्यभट्ट'ने अवकाशात झेप घेतली आणि भारताची मान उंच झाली.अर्थातच भारताच्या या वैज्ञानिक प्रगतीचे सारे श्रेय भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना द्यायला हवे.
एक लोकशाही राष्ट्र म्हणून भारताला जर समर्थपणे आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर भारताने इतर प्रगत राष्ट्रांच्या खांद्याला खांदा लावून स्वत:ची वैज्ञानिक प्रगती घडवून आणली पाहिजे असे नेहरूंचे म्हणणे होते. देशातल्या दारिद्रयाइतकाच देशाच्या वैज्ञानिक प्रगतीचा प्रश्न ते महत्त्वाचा मानीत होते.
त्यामुळेच त्यांनी डॉ. होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली अणुशक्ती आयोगाची स्थापना करून भारताच्या वैज्ञानिक प्रगतीची मुहूर्तमेढ रोवली अर्थातच 'आर्यभट्ट' ज्या दिवशी सोडला, तो दिवस विज्ञाननिष्ठ भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवायला हवा.
हा उपग्रह रशियातील मॉस्कोजवळच्या अणुतळावरून सोडला होता. त्याचा आकार एखाद्या हियासारखा होता. त्याचे वजन ३५० कि.ग्रॅ. होते आणि १४७ सें.मी. व्यासाच्या या उपग्रहाची उंची १११ से.मी. इतकी होती. रंगाने तो निळा व जांभळा होता.
पाचव्या शतकात भारतात आर्यभट्ट या नावाचा एक विद्वान गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होऊन गेला. त्याच्या जन्मानंतर जवळजवळ १५०० वर्षांनी त्याचे नाव धारण करणारा हा उपग्रह अंतराळात झेपावला आणि 'पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काळ' या ओळीची आठवणच जणू त्याने भारतीयांना दिली.
'आर्यभट्ट' हा पहिला उपग्रह जरी रशियातल्या अणुतळावरून अंतराळात सोडण्यात आलेला असला तरी तो ९०% भारतीय बनावटीचा उपग्रह होता. बंगलोर येथील अंतराळ संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांनी खूप परिश्रमपूर्वक तो बनविला होता.
हा उपग्रह बनविण्यास त्यांना केवळ २ वर्षे ४ महिन्यांचाच कालावधी लागला. या उपग्रहाच्या निर्मितीचा खर्च ५ कोटीच्या घरातला आहे. या उपग्रहाखाली १०% सामग्री तेवढी रशियन बनावटीची आहे. या उपग्रहातल्या उपकरणांना ऊर्जा पुरविण्याचे काम करणारा सोलर सेल्स हा भाग रशियन बनावटीचा आहे.
मुळातल्या योजनेनुसार 'आर्यभट्ट'चे आयुष्यमान केवळ ६ महिन्यांचे होते. परंतु अपेक्षेप्रमाणे ते वाढून 'आर्यभट्ट' ने जवळजवळ १ वर्ष कार्य केले.पंडितजींनी म्हटल्याप्रमाणे स्वावलंबनासाठी भारताला विज्ञान आणि तंत्रविज्ञान यामध्ये गती मिळविणे आवश्यक होते आणि 'आर्यभट्ट'मुळे ही अपेक्षित गती मिळालीही.
जगाच्या राजकीय भविष्यपटावर भारत लगेच आशियाई उपखंडातील महत्त्वाचे राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. परंतु भारताने मात्र अणुसंशोधन आणि अंतराळ संशोधन हे मानवाच्या विकासासाठी शांतता प्रस्थापित करण्यासाठीच वापरले जाईल असे सांगून आपल्या शांतताप्रिय धोरणाचा पुनरुच्चार केला.
'आर्यभट्ट'चा उपयोग हवामान तपासणीसाठी केला गेला. 'आर्यभट्ट'कडून येणारे हवामानाबाबतचे संदेश भारतातील श्रीहरिकोट्टा, रशियातील मॉस्कोजवळील अणुतळ आणि फ्रान्समधील अणुतळ अशा तीन ठिकाणी स्वीकारण्याची व्यवस्था केली गेली होती.
मात्र 'आर्यभट्ट'ला दिल्या जाणाऱ्या सूचना फक्त श्रीहरिकोट्टावरूनच दिल्या जात होत्या. अशा रीतीने या उपग्रहावर भारतीय शास्त्रज्ञांचाच ताबा होता. आर्यभट्ट पृथ्वीपासून ६२० कि.मी. उंचीवरून पृथ्वीभोवती ९६.४१ मिनिटाला एक याप्रमाणे प्रदक्षिणा घालीत होता.
७ जून १९७९ रोजी भारताने आपला दुसरा उपग्रह अंतराळात सोडला. त्याला 'भास्कर' या प्राचीन भारतीय दारूगोळाशास्त्रज्ञाचे नाव दिले होते. हा 'इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन'नेच तयार केला होता. ४४ कि.ग्रॅ. वजनाचा
हा उपग्रह पृथ्वीचे निरीक्षण करण्यासाठी रशियातल्या अणुतळावरून अंतराळात सोडण्यात आला होता. तथापि यानंतर बनाव 'रोहिणी' (आर-एस-१) हा उपग्रह मात्र भारतीय बनावटीच्या एस्.ए.व्ही-३ यानाद्वारे भारतातूनच अंतराळात साडला.
१९ जून १९८१ रोजी भारताने आपली अंतराळ संशोधनातील प्रगती दाखवून जगाला पुन्हा एकवार थक्क केल. भारताचा 'अॅपल' त्या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ठीक ६.२० वाजता अंतराळात झेपावला आणि भारत अंतराळविज्ञानात झपाट्याने चमत्कार करणार याबद्दल जगाला संशय उरला नाही.
कारण 'अॅपल' हा भारताचा पहिला भूस्थिर असा संदेशवाहक उपग्रह होता. अॅपल सोडल्यापासून अर्ध्या तासाच्या आतच त्याच्याकडून श्रीहरिकोट्टा, अहमदाबाद, फिजी आणि फ्रेंच गियानातील कोरो या स्थानकांवरून हवामान व तापमान याबाबतचे संदेश यायला सुरुवात झाली.
२७ जून १९८१ रोजी 'अॅपल' आपल्या नियोजित दोन वर्षे कालावधीच्या संदेश वहनाच्या कामगिरीसाठी सिद्ध होणार होता. परंतु २६ जून रोजीच 'अॅपल'बाबतचा तिसरा टप्पा अयशस्वी ठरला. 'अॅपल' अंतराळ मोहिमेमुळे उपग्रह भूस्थिर करून अंतराळ व पृथ्वी याबाबतचेच संशोधन करणारा एक प्रगत वैज्ञानिक देश म्हणून भारताचे नाव जगाच्या इतिहासात नोंदविले गेले, हे महत्त्वाचे.
अॅपलनंतर अलीकडच्या काळात भारताने प्रथम 'इन्सॅट-१-ए' आणि 'इन्सॅट-१-बी' असे आणखी दोन उपग्रह अंतराळात सोडले. त्यांपैकी 'इन्सॅट-१-ए' हा उपग्रह त्याच्या सौरपंख्यात बिघाड झाल्याने निकामी ठरला. परंतु 'इन्सॅट१-बी' या उपग्रहाची मोहीम बरीच यशस्वी ठरली.
हा दुसरा उपग्रह अंतराळ-संशोधनाबरोबरच शैक्षणिक कार्यक्रमांच्या प्रसारणासाठीही वापरला जाणार आहे. यावरूनच पुन्हा एकवार हे सिद्ध होईल की भारताला अंतराळ संशोधन करायचे आहे ते मानवाच्या कल्याणासाठीच.
भारतासारखा एक विकसनशील देश विज्ञानात, अंतराळ संशोधनात अत्यंत अल्पावधीत एवढी मोठी प्रगती दाखवितो, हे पाहून जगातील सर्व राष्ट्र, विशेषत: अंतराळ-विज्ञान संशोधनात प्रगती गाठलेली राष्ट्र आश्चर्यचकित झालेली दिसतात. भारतीय शास्त्रज्ञांच्या बुद्धिमत्तेचे ती राष्ट्रे कौतुक करू लागली आहेत.
भारताला दारिद्र्यासारखे बेकारीसारखे ज्वलंत प्रश्न भेडसावत असताना भारतासारखा विकसनशील देश अंतराळ संशोधनासारखी खर्चाची मोहीम का स्वीकारतो असाही प्रश्न विदेशातून आणि खुद्द भारतातून काहीजण विचारत आहेत.
याचे इतकेच उत्तर देता येईल की, मानवी जीवनाच्या विकासासाठी निष्कांचन आणि कष्टप्रद अशा अवस्थेत राहूनही ज्ञानोपासना करणाऱ्या ऋषिमुनींचा भारत हा देश आहे.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद