भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भ्रष्टाचार मराठी निबंध बघणार आहोत.या लेखामध्ये ऐकून २ निबंध दिलेले आहेत ते क्रमाने वाचू शकता. प्रार्थनेचा स्वर, आईचं दूध आणि पावसाचं पाणी... या तीनच गोष्टी भ्रष्टाचाराच्या तावडीतून सुटलेल्या असाव्यात. बाकी उरलेल्या सर्वच क्षेत्रांमध्ये कमी-अधिक प्रमाणात भ्रष्ट आचार आढळतो, भ्रष्ट विचार जाणवतो अन् भ्रष्ट संस्कारही अनुभवाला येतो.
भ्रष्टाचाराची कीड समाजाला सतत पोखरत असते. मग मन हादरते. विलक्षण चीडही येते. हे प्रदूषण कुठंतरी थांबावं, असं सतत वाटत राहतं; पण ते दुसऱ्या कुणीतरी थांबवावं, अशी धारणाच सर्वत्र निष्क्रियतेला पूरक ठरते. हा कुणीतरी' मग आर. के. लक्ष्मणादि सूक्ष्म निरीक्षकांच्या संवेदनशील कुंचल्यातून अवतरतो.
रामदास फुटाण्यांसारख्यांच्या वात्रटिकांतून जीवघेणे चिमटे काढतो किंवा पुरुषोत्तम पाटलांच्या हाती तुकारामाची काठी' होऊन 'लोकमत'सारख्या वृत्तपत्रामधून प्रहार करतो. मग ढासळणारा मूल्यांचा बुरुज काही काळ तग धरतो, ताठ (मानेनं) उभा राहतो.भ्रष्टाचारमुक्त.
महात्मा गांधीजी म्हणत, 'पावलोपावली ज्या ज्या गोष्टी समोर येतील, त्यांचे त्याज्य आणि ग्राह्य असे मी दोन वर्ग पाडतो आणि ग्राह्य मानलेल्या गोष्टीस अनुरूप असे स्वत:चे मी वर्तन निश्चित करतो.' यातल्या त्याज्य गोष्टी म्हणजे भ्रष्टाचाराचीच रूपे नव्हेत काय? साकल्याचा प्रदेश आखडण्याचं हे पतित कार्य,
उपनिषदातल्या सर्वेसुखिन:सन्तु। सर्वे सन्तु निरामया'सारख्या पवित्र तत्त्वज्ञानाची माती करणार, यात शंकाच नाही अन् हे सोसायचं तरी किती काळ? सोसत राहिलं, तर... ते तुम्हाला मान्य आहे. तुमचीही त्यास मूक संमती आहे, अशी शंका येते आणि आठवतात नारायण सुर्त्यांच्या या ओळी...
'हे मानले सारे आदर्शच आता, विकाऊ वस्तूंचे बाजार झालेत, अजून आपण एकमेकांचे हात, विश्वास तर सोडलेला नाही...'म्हणून ठरवलं, तर प्रत्येकजण चंगळवाद, अप्रामाणिकता, सांस्कृतिक दिवाळखोरी नी सामाजिक बधिरपणा या भ्रष्टाचाराच्या लेकरांपासून आपली सुटका आजही करू शकतो.
त्यासाठी थोडी मानवतावादी प्रबोधनपर चिकित्सा हवीय. म्हणजे मग विविध पातळ्यांवर आपला देश अनिश्चिततेच्या गर्तेत सापडणार नाही. 'उदारीकरणा'च्या नावाखाली देश विकला जाणार नाही. नैतिकता ढासळणार नाही. नोकरशाही अंदाधुंद होणार नाही.
लहानपणी केलेल्या छोट्या चोऱ्या थांबवण्याऐवजी प्रोत्साहन देणाऱ्या आईचा कान मोठे झाल्यावर सराईत गुन्हेगार झालेल्या व्यक्तीने न्यायाधीशांसमोरा चावून तोडल्याची गोष्ट सर्वांना ठाऊक आहे. संस्कारशून्य भ्रष्टाचाराची सुरुवात घरापासून झाल्याचं फलित हे असं असतं.
बाहेरगावी शिकणाऱ्या मुलाला गुरुजींसोबत डब्यातून लाडू पाठवणाऱ्या आईची गोष्ट अजून खूप जुनी झाली नाही. दरखेपेला घटत जाणाऱ्या लाडवांची संख्या प्रत्यक्ष शिक्षकाच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघड करते.
शिक्षणक्षेत्रात नोकऱ्या देताना संस्थाचालकांनी लिलावपद्धतीनं देणग्या घेणं देणाऱ्यांच्या गर्दीमुळे फारसं अपरिचित राहिलं नाही. बदल्यांचे दरही ठरलेले.
सर्वच शैक्षणिक पातळ्यांवर प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार सर्रास दरवर्षी ऐकायला येणंही अलीकडे सवयीचं झालंय. खासगी शिकवणीवर्ग, प्रश्नपत्रिका काढणारे शिक्षक, धनिक विद्यार्थीवर्गवा इतर कुठल्याही घटकाद्वारे हे (पुण्य?) कर्म केवळ धनलालसेकडेच अंगुलिनिर्देश करीत नाही काय?
कार्यालयातले कागद निर्जीव असतात. त्यावर चलनी कागद ठेवले की, ते पुढे सरकतात. मग ऑडिटरकडून 'अ' वर्ग मिळवण्यासाठी चक्क कोंबडीला स्वर्ग पाहावा लागतो. त्यापूर्वी सोमरसाचे प्राशन हे केव्हाही कार्यसिद्धीचे लक्षण मानणे हे 'पार्टी संस्कृतीचे गमक आहे.
म्हणे, नावात 'म.रा.वि.' असलेल्या मंडळाचे विजेसम चकाकणारे (सि) तारे कुणास ठाऊक नाहीत. 'डिमांड' (शब्दात ‘मागणी' अभिप्रेत आहेच) 'नोटे' (इथंही नोट' आहे) पासून संबंधित खात्या(?)च्या सर्वच कामांसाठी अर्थ' (?)पूर्ण वाटचाल करावी लागते. प्रसंगी ही मंडळी मंत्र्यासंत्र्यांच्या चिठ्यांना केराची टोपली दाखवतात.
'काम' करायला 'दाम' दिला की, तो ठेवायला खिसा खाली नको का? बिलं कमी करून मिळतात. हवं फक्त ग्राहकाचं दिल मोठं. ग्राहकही गुणाचा. मीटरमध्ये काड्या कोरेल. नव्या घराची टाइल घासायची, तर वीजतारांवर आकडे टाकेल वगैरे वगैरे. या गोष्टींमध्ये तात्पर्य काय? तर भ्रष्टाचाराची टाळी दोन हातांनी वाजते.
कधी कधी हा अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातही सापडतो; पण त्याही बातम्या कुठे नव्या नि आश्चर्य वाटणाऱ्या राहिल्यात? जणु नेमेचि येतो. कामे सुकर... विनाश्रम व्हावीत, म्हणून आम्ही गरज नसताना खिशात हात सहज घालतो नि भ्रष्टाचाराला रोजच्या जीवनाचा जगण्याचा एक भाग करतो.
मग भ्रष्टाचाराविरुद्ध आमचा आवाज कसा उठेल? त्याचं अंगवळणी पडणे इतकं नैसर्गिक झालंय की 'शिष्टाचार' म्हणून आम्ही त्याचा स्वीकार कधी करतो, हे आमचं आम्हालाच कळत नाही. सध्या आहे तिथंच हे प्रकरण थांबवणं गरजेचं आहे, असं प्रत्येक (सु) विचारी माणसाला वाटतं. कारण ही प्रवृत्ती' संस्कृतीचं रूप परिधान करील, तेव्हा खूप उशीर झालेला असेल.
अजून भ्रष्टाचाराची व्याधी शेवटच्या पायरीला पोहोचली नाही. तोवर उपचार केलेत, तर होणारी अधोगती टाळता येईल. त्यासाठी लहान बालकांना एखादं काम सांगताना चॉकलेट... चिरीमिरी देण्याची सवय मोठ्यांनी जाणीवपूर्वक बंद करायला नको का? लाचेचं हे प्राथमिक गोंडस रूपडं पुढे काही वसूल' केल्याशिवाय काम करायचं नसतं
असा संस्कार, भ्रष्टाचाराचं बाळकडू मिळून बाळाला मोठा झाल्यावर कडू वाटेनासं होतं. म्हणून थोरांनी हे दोषारोपण सहज टाळता येऊ शकेल, असं वागायला हवं.कुणा एकानं ठरवून ही कीड जाणारी नाही. सर्वांच्या निग्रही प्रयत्नांचा सामयिक फवारा मारूनच हे आर्थिक कुपोषण दूर होईल.
कायद्यानं भ्रष्टाचार रोखणं म्हणजे वाळूत... ओंजळीत बराच वेळ पाणी साठवण्याचा निष्फळ प्रयत्न ठरतो. त्यासाठी मूलभूत... दूरगामी बदल, वेळीच सुसंस्कार करण्याची वेळ येऊन ठेपलीय. मने निबर होण्यापूर्वी म्हणजे तरुण पिढीच्या लवचिक मनावर ह्या अर्थानं बौद्धिक संस्कार शिक्षक- समाज - पालक या सर्वांनीच करण्याची गरज आहे. मूल्यांच्या पडझडीची ही वेळ अवघ्यांनी समर्थपणे सांभाळून न्यायला हवीय् !
अनेक 'मी' एकत्र येऊनच ‘आम्ही' बनतो. म्हणून भ्रष्टाचारमुक्त जीवन जगण्याची शपथ प्रत्येकानं घेतली अन् प्रयत्नपूर्वक ती जपली - पाळली, तर 'हम बदलेंगे, युग सुधरेगा' असं नक्कीच याही बाबतीत आनंदानं म्हणता येणार नाही का? पिंडीवरील विंचू वेळीच वहाणेनं आहे तिथंच ठेचला, तर महादेवाला राग येण्याऐवजी विषाचा योग्यवेळी बंदोबस्त केल्याचं छान समाधान मिळेल.
भ्रष्टाचार, मग तो आमच्या खाण्या-पिण्यात, वाचण्या-लिहिण्यात, खेळण्या-बागडण्यात, वागण्या-बोलण्यात, कामात-विश्रांतीत... कुठंही असो, समूळ नष्ट होणं फार गरजेचं आहे. जगात भारताची प्रतिमा उजळ राहण्यासाठी ते अत्यावश्यक आहे.
यासाठी जो तो आपापल्या परीनं प्रयत्नशील आहे, असावा. ई-टीव्हीनं अलीकडेच 'मी मुख्यमंत्री झालो, तर...'अशी युवकांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यातही तरुण मनातली/मतांची नको असलेल्या गोष्टीचीच चाचपणी घेताना भ्रष्टाचाराच्या मूळालाच हात घातलाय, असं नाही वाटत?
भ्रष्टाचार करणाऱ्याहून तो सहन करणारे अधिक दोषी नाहीत काय? डोळ्यांसमोर होत असलेला भ्रष्टाचार न रोखता, मख्खपणे मला काय त्याचं?', 'माझा काय संबंध?' असं म्हणत डोळेझाक करणारी निष्क्रिय व्यक्तीही भ्रष्टाचारास तेवढीच जबाबदार असते.
कचेरीतली खरेदी-विक्री कायद्यानं होऊ द्या. रजिस्ट्रार किती लांबवतो, ते बघा. प्रसारमाध्यमांना त्याची खरी माहिती द्या. बदनामीला सारेच घाबरतात. दबक्या आवाजाला कुणी भीक घालत नाही, म्हणून सच्चा आवाज बुलंद करा.भ्रष्टाचाराची माती मातीमोल होईल तेलगी प्रकरणासारखी निषेधयोग्य प्रकरणे अलिप्तपणे बघण्याऐवजी सामाजिक उठावांची/बंडांची, याविरुद्ध कुस्ती खेळण्याची तयारी हवीय.
ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी भारतात उभारलेले काही नद्यांवरचे पूल त्यांचा हमिकाळ संपल्यावरही अद्याप दिमाखात भक्कम उभे आहेत. (त्यांच्या बांधकाम कंपन्यांची शासनाला पत्रे येतात... 'सदरहू पुलाच्या बांधकामास करारानुसार १०० वर्षे पूर्ण झालीत. यापुढील नुकसानीस आम्ही जबाबदार नाही.) प्रत्यक्षात त्या पुलाला सव्वाशे वर्षे झालेली असतात.
इकडे आमच्या इंजिनीअर अन् कंत्राटदार मंडळींनी केलेलं काम ('खा' अन् खाऊ द्या' तत्त्वामुळे?) सिमेंटऐवजी मातीसारखं ठिसूळ न झालं, तरच नवल! शेवटी, सश्रद्ध माणसंही देवापुढे नवस बोलतात, म्हणजे नेमकं काय करतात? 'भवानीआईला रोडगे वाहून सासूला मारण्याचं काम सोपवणारी सून' नेमकं काय साधते?
कार्पेटनं अनैसर्गिकरीत्या पिकवलेल्या फळांवर आम्ही आमचं आरोग्य कसं टिकवून ठेवू? 'भ्रष्टाचाराच्या संपण्या राशी, संकल्प करू मनाशी, प्रयत्नांचे दीप पेटवू, जागृती ठेवू उराशी !"मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद पुढील निबंध वाचण्यास विसरू नका धन्यवाद
निबंध 2
भ्रष्टाचार निबंध मराठी | Bhrashtachar Essay in Marathi
मनुष्य एक समाजशील प्राणी आहे. समाजात राहून जीवन जगत असताना तो स्वत:चा व राष्ट्राचा विकास करतो. अशा रीतीने समाजच राष्ट्राच्या विकासाची आधारशिला आहे. ज्या समाजात चांगल्या प्रवृत्ती असतात तो समाज चांगला समजला जातो.
असा समाज राष्ट्राच्या प्रगतीला मदत करतो. जर समाजात वाईट प्रवृत्ती असतील तर तो समाज भ्रष्टाचारी असतो. भ्रष्टाचार राष्ट्राला पतनाच्या गर्तेत घेऊन जातो. भ्रष्ट + आचार मिळून भ्रष्टाचार ही संधी होते. भ्रष्ट आचरण करणे म्हणजे भ्रष्टाचार करणे.
भ्रष्टाचार हा असा महारोग आहे जो राष्ट्राला अशांती, स्वार्थीपणा, अनैतिकतेचा बालेकिल्ला बनवितो. अंतर्मनाला खिळखिळे करून टाकतो. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताचा विकास दर कोणताही असला तरी लोकसंख्या आणि भ्रष्टाचार वाढीचा दर भरपूर आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. पहिला क्रमांक चीनचा लागतो. भ्रष्टाचाराबाबत आपला तिसरा क्रमांक आहे. पहिला व दुसरा क्रमांक अनुक्रमे इंडोनेशिया व चीनचा आहे. लोकसंख्येच्या वाढीमुळे बेरोजगारी, गरिबी, चलनवाढ, भूकबळी, अशिक्षितपणा इत्यादी प्रश्न निर्माण झाले.
भ्रष्टाचारामुळे या प्रश्नांनी विक्राळपणा धारण केला. लोकसंख्या वाढली की वस्तूंची मागणी वाढते. पण भ्रष्टाचारामुळे वस्तूंची लालसा वाढते. संपूर्ण भारतात भ्रष्टाचाराचा बोलबाला आहे. जीवनातील कोणतेही क्षेत्र भ्रष्टाचारापासून अलिप्त राहिलेले नाही.
लहानात लहान कर्मचाऱ्यापासून मोठ्यात मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत सगळे जण या रोगाने ग्रस्त आहेत. कोणी कोणत्या का पदावर असेना भ्रष्टाचाराच्या वाहत्या आहेत. लाच दिल्याखेरीज कार्यालयात फाईल पुढे सरकत नाही. भेट दिली तर फायदा होईल.
मूठ गरम केली तर नोकरी मिळेल. इतकेच नव्हे तर हुंडा दिल्याशिवाय मुलीला वर मिळत नाही. जणू ती कन्या नसून खरेदी-विक्रीची वस्तू आहे. कधी तरी वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्याला सर्वात जास्त गुण मिळतात. तर वर्षभर जिवापाड मेहनत करणारा विद्यार्थी मागे राहतो.
काळा बाजार, कराची चोरी होते. चपराशापासून मंत्र्यांपर्यंत विकले-खरीदले जातात. औषधे नकली तर खाण्या-पिण्याच्या पदार्थांत भेसळ असते. भ्रष्टाचारी दोन्ही हातांनी देशाला लुटत आहेत. जसजसा काळ जात आहे तसतसा भ्रष्टाचार वाढत आहे. लोक आपली प्राचीन संस्कृती विसरून गेले आहेत.
त्यागाची भावना नष्ट झाली आहे. राष्ट्र प्रेमाचा अभाव आहे. लोक म्हणत गांधीजी असोत नसोत गांधीवाद राहील, नथुराम गोडसेने गांधीजीचा खून करून टाकला. ज्या गांधीवादाकडे सारे जग आदराने पाहत होते त्याच गांधीवादाची आता रोज हत्या होते आहे.
हे युग ईहवादी आहे. धन त्याचे मुख्य अंग आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात धनाचेच महत्त्व दिसते. एखाद्या व्यक्तीजवळ किती धन आहे यावर तिच्याबद्दलचा आदर अवलंबून असतो. वाईट मार्गाने पैसा कमावण्याची वृत्ती वाढत आहे. धर्मकर्माला लोक तिलांजली देऊ लागले आहेत.
कारण धनाचा विजय व धर्मकर्माची हार होत आहे. पैशाने धर्म कर्म सगळे काही खरेदी करता येते. धनाची साधना करणारे लोक हे विसरले की त्यांच्याजवळ धन कोणत्या मार्गाने येते. ज्याप्रमाणे अर्जुनाला फक्त पक्ष्याचा डोळा दिसत होता.
त्याच आज लोकांना फक्त धन दिसते. पैशासाठी लोक वाटेल ते वाईट कर्म करण्यास तयार होतात. ते नैतिकता आणि मानवतेची मूल्ये विसरली आहेत व धनाच्या अधीन झाले आहेत.
प्रशासनाची शिथिलता हे पण भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण आहे. पुढारी नोटांच्या मोबदल्यात मते विकत घेऊन सत्तारुढ होतात. निवडणुकीत जिंकून येण्यासाठी अनेक वाईट मार्गांचा अवलंब करतात. भ्रष्ट पुढारी भ्रष्टाचार मिटविण्याच्या घोषणा करून भ्रष्टाचारानेच आपले घर भरतो व पुढील निवडणुकीसाठी पैसा जमा करतो.
आपल्या - प्रशासनातील प्रत्येक कार्य कासवाच्या गतीने होते. म्हणून सामान्य जनता लाच देण्यास प्रवृत्त होते. उपासमार, बेरोजगारी, महागाई, गरिबी, निरक्षरता इ. मुळे भ्रष्टाचाराचा जन्म होतो. माणूस भुकेला असला की त्याला काही सुचत नाही.
आपले पोट भरण्यासाठी तो वाईट काम करतो. म्हणतात ना? "भुकेल्या पोटी भजन सुचत नाही" आज बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे आहे. शिकलेले अनेक तरुण-तरुणी बेकार असल्यामुळे शेवटी वाईट मार्गाला लागतात. वाढती महागाईसुद्धा अप्रत्यक्षपणे माणसाला भ्रष्टाचारी बनविते.
गरीब माणूस घर चालविण्यासाठी अप्रामाणिक होतो. अशिक्षित माणसाला चांगल्या-वाईटाची ओळख नसते. तो कळत नकळत दुसऱ्याच्या हातातील खेळणे बनून भ्रष्टाचाराला गती देतो.. नैतिक मूल्यांचा-हास हे पण भ्रष्टाचाराचे एक प्रमुख कारण आहे.
शिक्षण हा व्यवसाय झाल्यामुळे नैतिक शिक्षण जनसामान्यांपासून दूर जात आहे. अशा वातावरणात माणूस भ्रष्ट होण्याची शक्यता वाढते. भ्रष्टाचाररूपी या महारोगाची लागण थांबून हा रोग समाजातून नष्ट झालाच पाहिजे. यासाठी त्याची कारणे शोधून ती नष्ट केली पाहिजेत.
शासन व्यवस्थेत काही परिवर्तने केली पाहिजेत. राजकारणी आणि गुन्हेगारांचे संबंध तुटले पाहिजेत. चांगले लोक राजकारणात यावेत यासाठी काही तरी उपाययोजना केली पाहिजे. शिस्तीचे आणि नियमांचे पालन कठोरपणे केले पाहिजे.
भ्रष्टाचाऱ्यास कठोर शासन झाले पाहिजे. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवले पाहिजे. चलनवाढ थांबवून देशाची अर्थव्यवस्था सुदृढ़ केल्यास त्यामुळे उपासमार, गरिबी, बेरोजगारी इ. नष्ट होईल. अन्य उपायांचाही अवलंब करावा. नैतिक शिक्षण अनिवार्य करण्यात यावे.
त्यासाठी प्रसार माध्यमांचा वापर करावा. शिक्षणामुळे चांगल्या-वाईटाचे ज्ञान होऊन मनुष्य भ्रष्टाचारापासून दूर पळतो. जो सदाचारी असतो त्याचा आदर करण्यात यावा. भ्रष्टाचाराची निंदा करण्यात यावी.
आपण जे बोलतो तेच आपण करावे स्वतः भ्रष्ट आचरण करू नये व दुसऱ्यांनाही करू देऊ नये. आदर्श मानवी मूल्यांची स्थापना करून भ्रष्टाचाराला बाहेरचा रस्ता दाखवावा. अन्यथा आपले राष्ट्र खडित होण्याचा धोका निर्माण होईल. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद