चला करूया महापुरावर मात मराठी निबंध | Chla Kruya Mhapuravr Mat Marathi Nibandh


चला करूया महापुरावर मात मराठी निबंध | Chla Kruya Mhapuravr Mat Marathi Nibandh


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण चला करूया महापुरावर मात  मराठी निबंध बघणार आहोत. माणूस माशाप्रमाणे पाण्यात पोहायला शिकला आहे, पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडायला शिकला पण तरीही तो निसर्गावर मात करू शकला नाही. असे म्हणण्याची वेळ येते, ती नैसर्गिक आपत्ती ओढवली की, भूकंप, दुष्काळ, ज्वालामुखी, वादळे आणि चक्रीवादळे व अतिवृष्टी इ. नैसर्गिक आपत्ती आहेत. 


त्या आपत्तींशी लढा देताना मानवाचे ज्ञान, विज्ञान व तंत्रज्ञान सर्व पणाला लागते आणि कुठेतरी अशी म्हणायची वेळ येते की, 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा.  २००५ मध्ये पावसाळा सुरू होऊन जुलै अर्ध्यावर आला, तरी मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात पाणी प्रश्न व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला होता.


२१ जुलैनंतर मात्र संपूर्ण हवामानच बदलले आणि संपूर्ण महाराष्ट्रात (पश्चिम महाराष्ट्रात) पावसाचे थैमान सुरू झाले. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई या जिल्ह्यात पावसाने जोर घेतला. २६ जुलै रोजी तर मुंबई व कोकण भागात धुवाधार पाऊस सुरू झाला. गेल्या १०० वर्षांत झाला नाही, इतका पाऊस म्हणजे २४ तासात ९४४ मि. मी. पाऊस एकट्या मुंबई शहरात पडला.


अशी वेधशाळेने नोंद घेतली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाने भीषण रूप धारण केले. कोल्हापूर, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, जालना, परभणी, नांदेड इ. जिल्हे व त्यातील भागात पुराने थैमान घातले. कुठे अतिवृष्टीमुळे तर कुठे धरणातून पाणी सोडल्यामुळे नद्यांना पूर आले व मोठ्या प्रमाणात हानी झाली. 


यात जीवित हानी, वित्त हानी, मोठ्या प्रमाणावर झाली. 'न भूतो न भविष्यति।' असे म्हणण्याची वेळ आली. या अतिवृष्टीचे सावट मुंबई शहराला मोठ्या प्रमाणावर पडले. पुरामुळे मुंबई शहरात पाणीच पाणी झाले. घरात, दारात, रस्त्यात सर्वत्र पाणीच पाणी. मुंबईला अशा नैसर्गिक व मानवनिर्मित समस्यांना सामोरे जाण्याची तशी सवयच आहे.


यापूर्वीची १९०३, १९४० व १९८३ची चक्रीवादळे ही मुंबईतील भीषण हानी करूनच परतली होती. बॉम्बस्फोट व दंगली जोडीला आहेतच. त्यातच हे अतिवृष्टीचे सावट, रेल्वे, बस, विमानसेवा विस्कळीत झाल्या, कार्यालये, शाळा, कॉलेजेस बंद पडली, बँकिंग सेवा विस्कळीत झाली. शेतीचे तर अतोनात नुकसान झाले. 


खरीप पिके जवळजवळ सर्वच पाण्यात गेली, काही जमिनी खारवट बनण्याच्या मार्गावर आहेत, गुरे-ढोरे यांच्याबद्दल बोलायलाच नको, हजारो गायी आणि म्हशी या पुराच्या पाण्याने गिळंकृत केल्या. एकट्या मुंबईत ही संख्या १५ हजाराच्या वर आहे. 


पुरामुळे माणसे किती मेली, याचे खरे उत्तर मिळू शकले नाही. कारण जे आकडे दिले जातात, एकंदर परिस्थितीचा विचार केल्यास त्यावर विश्वास ठेवणे शक्य नाही. हजारो मृत्यू झाले तर हजारो माणसे अद्याप बेपत्ता आहेत आणि कित्येक सरकारी छावण्यांमध्ये आपले जीवन व्यतीत करत आहेत. 


अशातच पावसाचे थैमान चालू असताना मुंबई येथे 'गुंड' व 'दादा' व राजकारणी अशा मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांनी 'त्सुनामी लाटा' येत असल्याची अफवा पसरवली, त्यासाठी अद्ययावत यंत्रणा टेलिफोन, मोबाईल, इ. चा वापर केला आणि ही अफवा वाऱ्यासारखी पसरून त्यात लोक मृत्युमुखी पडले. पूर ओसरल्यावर सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले.


'लेप्टोपायरोसिस'सारखे संसर्गजन्य आजाराने आपली उपस्थिती सिद्ध केली. पूरग्रस्तांना मदतीचा हात प्रशासन, स्वयंसेवी संस्था व समाजसेवी व्यक्ती यांच्याकडून देण्यात आला.मुंबई शहरात जे अतिवृष्टीचे सावट पसरले त्याची अनेक कारणे आपणास सापडतात. 


मुंबई नगररचना व कचऱ्याची विल्हेवाट याचे कायदे प्रशासनाने गुंडाळून कचऱ्याच्या टोपलीत टाकली. बेपर्वा व बेमुर्वतपणे बांधकामांना दिलेली परवानगी हे प्रमुख कारण. संपूर्ण जमीन मोठमोठ्या बिल्डर्सच्या हाती गेली व तेथे इमारतींचे सिमेंटचे जंगल उभे राहिले.


पोटापाण्याच्या प्रश्नाने ओसरीला आलेले लोक, मिळेल तिकडे निवारा बांधून राहू लागले. १९३५-३६ ला इंग्रज राजवटीत बांधलेली गटारे, अशा गटारांची आजही मुंबई व इतर ठिकाणी गरज आहे. मुंबईतील एम. एस. टी. स्थानक, तेथे आजही पाणी साठवणे किंवा वाहतूक कोलमडण्याची घटना घडत नाही. 


याचे कारण इंग्रजांनी वापरलेले नगररचना शास्त्र, गटारांची पुनर्रचना केली गेली नाही. प्लस्टिकच्या वापराचा अतिरेक, कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबद्दलची दुरवस्था इ. सर्व कारणे या भीषण सावटामागे आहेत. आपल्याला या महापुराच्या भयंकर संकटावर करायची आहे मात.


दूरदृष्टीने व पूर्वकल्पना लक्षात घेऊन केलेली उपाययोजना यात खऱ्या सत्तेचा कस असतो त्यात. त्यातूनच, महासत्ता निर्माण होते. खास याचे उत्तम उदा. ब्रिटिशांनी आपणास दिले आहेत. महाराष्ट्र कणखर आहे, राकट आहे, वादळ-वारे सोसण्याचीही त्याला सवय आहे, तो नक्की उभा राहील. पण त्यासाठी आवश्यकता आहे,


अत्यंत प्रामाणिक प्रयत्नांची, योग्य व शाश्वत पुनर्वसनाची, शुद्ध राजकारणी, विचारसरणीची आणि खंबीर नेतृत्वाची. मराठी माणूस आंध्र प्रदेशातील, तामिळनाडूतील पूरग्रस्तांना मदत करतो, कारगील येथील युद्धप्रसंगी सैनिकांच्या मदतीला धावतो. आता मात्र हा कणखर पण संवेदनशील मराठी माणूस स्वतःची मदत करण्यास धावणार आहे, याची खात्री आहे. जय महाराष्ट्र! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद