दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध | Doordarshan Shap ki Vardan Essay in Marathi

 दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध | Doordarshan Shap ki Vardan Essay in Marathi |

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  दूरदर्शन शाप की वरदान मराठी निबंध बघणार आहोत. आपल्या भारतात शेकडा ७० टक्के लोक निरक्षर आहेत. ही फार मोठी चिंताजनक समस्या आहे. अनेक बाबतीतले आपले मागासलेपणा घालवून जगातील इतर राष्ट्रांच्या बरोबरीने सर्वांगीण सुधारणा करून प्रगती करत असताना भारताला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. 


देशातील बहुसंख्य लोकांचा अशिक्षितपणा हे असेच एक जबरदस्त आव्हान आहे. सरकारने त्यासाठी पावले उचलली आहेत. शालेय शिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. प्रौढ शिक्षणांचे वर्ग सुरू झाले आहेत. अनौपचारिक शिक्षणपद्धतीचे प्रयोग सुरू झालेले आहेत. 


लोकशिक्षणाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात प्रसारमाध्यमांचे महत्त्व डावलून चालणार नाही. ज्ञानाचे नवे वारे देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत दऱ्याखोऱ्यांपर्यंत पोचवायचे असतील तर प्रसारमाध्यमांसारखे उपयुक्त साधन दुसरे नाही.


लोकशिक्षणाच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. वर्तमानपत्रातील माहिती व विचार वाचण्यासाठी साक्षरतेची अपेक्षा असते. आवश्यक तेवढा शिक्षणविचार आणि प्रसार झाला नसल्यामुळे वर्तमानपत्रे अगदी तळागाळापर्यंत जाऊ शकत नाहीत.


त्यामानाने आकाशवाणी हे माध्यम जास्त परिणामकारक ठरते. निरनिराळे प्रगत ज्ञान व विचार भाषण, संवाद इ. विविध प्रकारांतून लोकांपर्यंत पोचवण्याचे ते एक महत्त्वाचे साधन आहे. पण या दोहोंनाही दूरदर्शनची सर येणार नाही.


दूरदर्शन हे दृक्श्राव्य पद्धतीचे साधन असल्याने त्यावरील कार्यक्रम पाहण्याची व ऐकण्याची दुहेरी सोय त्यामध्ये आहे. दूरदर्शनवरील चित्रे हालतीबोलती असल्याने वास्तवतेचा स्पर्शही या कार्यक्रमांना देता येतो. प्रत्यक्ष प्रसंग पाहत आहोत असे वातावरण दूरदर्शनच्या कार्यक्रमात निर्माण करता येते. 


चित्रपटात अगोदर कधीतरी चित्रित केलेले प्रसंग पाहायला मिळतात. दूरदर्शनवर ते प्रसंग प्रत्यक्ष घडत असताना पाहण्याची सोय आहे. जगाच्या पाठीवर कोठेही घडत असलेले प्रसंग अगदी त्यावेळेला जगाच्या कोणत्याही भागात घरबसल्या पाहण्याची सोय दूरदर्शनमुळे झालेली आहे. 


पंतप्रधानांचे राष्ट्रकुल परिषदेतील भाषण असो, की इंग्लंडमधील लॉर्डसच्या मैदानावर खेळला जाणारा क्रिकेटचा सामना असो. आपण घरात आरामात बसून बाहू शकतो. या दृष्टीने दूरदर्शन हे चित्रपटापेक्षाही प्रभावी साधन ठरते.


आपल्या देशात दूरदर्शनचा प्रवेश ही अगदी अलीकडच्या काळातील घटना आहे. आपल्या महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईच्या दूरदर्शन केंद्राच्या प्रारंभापासून त्याचा इतिहास सांगता येईल. सध्या मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांच्या भोवतालच्या १०० मैलांच्या टापूतील शहरात दूरदर्शनचा वापर होऊ शकतो.


पण नजीकच्या काळात आणखी अनेक ठिकाणी प्रक्षेपण केंद्रे उभारण्याची घोषणा शासनाने केली आहे. त्यामुळे लवकरच महाराष्ट्राच्या सर्व खेड्यापाड्यांतून दूरदर्शनचा प्रसार होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.


लोकशिक्षणाच्या कार्यक्रमात दूरदर्शनचा फार मोठा उपयोग होण्यासारखा आहे. त्याच्याद्वारे नागरिकांना जगातल्या घडामोडींची माहिती व त्यांचे आपल्या दृष्टीने कमी अधिक महत्त्व समजावून सांगता येईल. नागरिकत्वाचे नियम, देशापुढील विविध समस्या व त्या सोडविण्यासाठी उपाय योजना, विज्ञानातील नवीन नवीन शोध, सृष्टीतील विविधांगी चमत्कार, 


जगाच्या पाठीवरील निरनिराळ्या प्रकारचे मानवी जीवन अशा त-हेच्या नानाविध स्वरूपाची माहिती नागरिकांना देऊन त्यांना बहुश्रुत आणि जबाबदार नागरिक बनविण्यासाठी दूरदर्शनइतके अन्य प्रभावी साधन नाही.पण खेदाची गोष्ट अशी की, या साधनाचे यथार्थ महत्त्व आपल्या लोकांना अजून पटलेले नाही. 


दूरदर्शन म्हणजे मनोरंजन एवढेच एक समीकरण आपल्याकडे रूढ झालेले दिसते. सिनेमा, सिनेमा गीते, नाटके, गाण्याचे कार्यक्रम, मालिका, अनेकानेक चॅनेल्स् यापलीकडे दूरदर्शनवर काही पाहण्यासारखे असते हे आमच्या लोकांना अद्याप पटलेले नाही. त्यामुळे उद्बोधनपर असे कार्यक्रम सुरू झाले की दूरदर्शन संच बंद करण्यास आपण तत्परतेने पुढे होतो.


केवळ सवंग मनोरंजनासाठीच दूरदर्शनचा वापर होणार असेल तर त्याचे वर सांगितलेले फायदे दिसून येण्याऐवजी लोकजीवन दूषित होण्याचीच भीती आता वाटू लागली आहे. दूरदर्शन संचाच्या जोडीला व्ही.डी.ओ. सेट्स आता आले आहेत. दूरदर्शनवरील मनोरंजन अपुरे वाटून आता व्ही.डी.ओ. 


संचाच्या मदतीने वाटले ते कार्यक्रम वाटेल त्या वेळी पाहण्याची सोय झाली आहे. दूरदर्शनवर न आवडणारा कार्यक्रम सुरू झाला असला तरी व्ही.डी.ओ. संचाच्या मदतीने आपल्याला आवडेल तो कार्यक्रम आता लोक पाहू लागले आहेत.


अशा सवंग करमणुकीच्या लालसेने सर्व समाज ग्रासला गेला आहे. त्यामुळे लोकशिक्षणाचे उद्दिष्ट फार मागे पडले आहे. या समाजाला वेळीच जागे करून दूरदर्शनच्या या अतिरिक्त व्यसनातून परावृत्त करण्याची वेळ आता आली आहे. 


दूरदर्शनचे कार्यक्रम जवळून पाहत राहिल्यामुळे डोळ्यांना अपाय होतो. सतत दूरदर्शन संचापुढे बसून राहिल्यामुळे शरीराची हालचाल कमी होते. त्यामुळे व्यायामाअभावी येणाऱ्या शारीरिक तक्रारी सुरू होतात. यापेक्षा भयंकर म्हणजे लोकांचे सामाजिक जीवन संपुष्टात येऊ लागले आहे. 


पूर्वी सभासंमेलनांना गर्दी होत असे, आता क्वचितच तशी गर्दी दिसते. संध्याकाळच्या वेळी मुले क्रीडांगणावर जात असत. आज मात्र क्रीडांगणावरची वर्दळ खूप कमी झाली आहे. लोक संध्याकाळी घराबाहेर पडून एकमेकांना भेटत, गप्पागोष्टी करत. पण आज जो तो दूरदर्शनचे डोके धरून बसलेला असतो. 


त्यामुळे एकमेकांच्या घरी जाण्याचीही चोरी वाटू लागली आहे. सगळी माणसे स्वत:च्या चार भिंतीच्या घरात एका निर्जीव पेटीपुढे बंदिस्त होऊन पडलेली. त्यामुळे सामाजिक जीवनाला नुकसानच पोहोचले आहे.या सगळ्या अनर्थातून वेळीच मार्ग काढला पाहिजे. 


शासनानेही स्वत:चे कर्तव्य समजून लोकांना द्यावयाच्या कार्यक्रमांचे योग्य ते नियोजन केले पाहिजे. दूरदर्शनवरील खर्च आणि उद्दिष्ट यांचा मेळ घालून नवीन नवीन उद्बोधक कार्यक्रम जास्तीत जास्त चांगल्या त-हेने प्रसारित करण्याची यंत्रणा निर्माण केली पाहिजे.


कितीही झाले तरी दूरदर्शन हे साधन आहे. त्याचा यथायोग्य उपयोग केला तरच त्याचे इष्ट ते उपयोग दिसून येतील. त्याचा गैरउपयोग केला तर ते हानिकारकच ठरेल. दूरदर्शन हे शाप ठरविणे अथवा वरदान ठरविणे हे आपल्याच हातात आहे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद