पर्यावरण वर मराठी निबंध | Environment essay in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पर्यावरण मराठी निबंध बघणार आहोत. जळगाव जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षकदिनी (५ सप्टेंबर) मुख्यमंत्री विलासराव देशमुख शिक्षकांना पुरस्कार वितरण करीत होते. आदर्श शिक्षकांना त्याचवेळी ना. अरुणभाई गुजराथी एकेक रोप वृक्षारोपणासाठी देत होते.
कार्यक्रम जेव्हा संपला, तेव्हा जवळजवळ ९९ टक्के सत्कारितांच्या खुर्त्यांखाली रोपे तशीच पडलेली राहिली... हे चित्र बघून मन हळहळले. ज्या कार्याबद्दल शिक्षकांचे आदर्शत्व मोजले गेले, त्यापैकी 'वृक्षारोपण' हे एक होते आणि याचेच वैषम्य त्यावेळी वाटले. फक्त मी ते रोप घरी आणून लावले आणि इतरांच्या मते, मी 'आदर्श' नव्हे; पण 'बावळट' (?) ठरलो.
आजही त्या रोपाचे मोठे झालेले 'सोनमोहरा'चे झाड माझ्या दारी या गोष्टीची आठवण देते. जनहिताभिमुख बाबींसाठी शिक्षकांचा पुढाकार अपेक्षितच आहे...असावा. म्हणून मीही आधी एक शिक्षक म्हणून शाळेत, नागरिक व एका गृहनिर्माण संस्थेचा अध्यक्ष म्हणून सोसायटीच्या आवारात वृक्षारोपणात नेहमी सक्रिय असतो.
त्याचवेळी जागरूकही असतो, जेणेकरून लावलेली रोपे कशी सुरक्षितपणे वाढतील. बकऱ्या व इतर उपद्व्यापी घटक दूर राहतील, त्याचवेळी नियमितपणे पाणी दिले जाते की नाही, हे सगळे बघतो. कारण रोपाला लहान मुलासारखे जपावे लागते. रोप लावणारा हा खरेतर एका अर्थाने त्याचा पालकच असतो..
खरेतर वृक्षारोपण' ही व्यक्तिगत बाब नसून सामूहिक जबाबदारी आहे. 'थेबे थेंबे तळे साचे' म्हणीप्रमाणे प्रत्येकाने ही जबाबदारी स्वीकारली, तर परिसर हिरवागार होऊन डोळ्यांना आनंददायी निसर्ग लपल्याचा प्रत्यय येईल.
सुमारे २३ शतकांपूर्वी सम्राट अशोकानेही आपल्या राजाज्ञेत वृक्षसंरक्षणाला महत्त्व दिल्याचे आढळते. सर्वच द्रष्ट्या पुरुषांनी पर्यावरणशिक्षण आधीच देऊन ठेवले आहे, त्याची आठवण करून तशा वर्तनाची वेळ येऊन ठेपली आहे खरी !माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून मी मूल्यशिक्षणाच्या तासिकेला एक आगळीवेगळी प्रतिज्ञा रोज म्हणवून घेतो. ती अशी आहे.
“आपल्याला आपल्या योगक्षेमाची सामग्री - साधने भूमातेकडून मिळतात, तेव्हा येणाऱ्या पिढीसाठी तिचे रक्षण करूपाने, फुले, फळे, खोड, औषधी, इंधने, पाऊस, सुगंध छाया, आधार, चारा, निवारा या आणि अनेक गोष्टी वृक्ष आपणास देतात, म्हणून 'चिपको आंदोलन, वृक्षमित्र मंडळे, वनशेती, जलसंधारण, सामाजिक वनीकरण, पर्यावरण बचाव इत्यादी बाबींना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होत आहे. आम्ही प्रत्येकाने स्वयंनिर्धाराने वृक्षवल्लीला अभय द्यायला हवे आहे.
मात्र कधी कधी ही बाब खेदाची वाटते की, दर पासवाळ्यात मान्यवरांच्या हस्ते आम्ही वृक्षारोपण करतो. त्यावेळी गतवर्षीचाच खड्डा नव्याने वापरतो. 'गतवर्षी तेथे लावलेल्या रोपाचे काय झाले?' याचा तपास कुणीच करीत नाही. त्यासाठी जर लावलेले रोप ‘एक मूल... एक रोप' याप्रमाणे पूर्ण अधिकार देऊन वाढवले, तर पूर्ण जबाबदारीने; पण निश्चित जगू शकेल.
मुलाच्या नावाची पाटीच आम्ही त्या झाडाजवळ लावण्याचा प्रयोग करावा. त्याने बराच फायदा होईल. काहीच न करण्यापेक्षा प्रयोगशील असणे केव्हाही (मानसिक) समाधानाचेच ठरते. उपलब्धीचा आनंद स्वर्गतुल्यच!
‘रक्षावया पर्यावरण, उपाय एकच : वृक्षारोपण', I AM A TREE LOVER' असे बिल्ले छातीवर मिरवीत जेव्हा विद्यार्थी समाजात बागडतात, तेव्हा परस्परच वृक्षारोपणाचा प्रसार/प्रचार व प्रेरणा होते.
गुढीपाडव्याला कडुनिंब, रामनवमीला दवणा, वटपौर्णिमेला वड, तर आषाढी एकादशीला तुळशीची पूजा केली जाते. नारळी पौर्णिमेला नारळ, हरतालिकेला रुई, गणेशचतुर्थीला दूर्वा, दसऱ्याला आपटा, महाशिवरात्रीला बेलाखेरीज सण साजरा होत नाही.
कडुनिंबावर शीतलादेवीचा वास असतो, तर पिंपळ विष्णूचे प्रतीक असते. वडाखाली भगवान बुद्धांनी तप केले, तर आवळ्याच्या खोडात ब्रह्मदेव, मूळात विष्णू व फांदीत शिव आहे, असे मानले जाते. कदंब हे कृष्णाचे प्रतीक, तर शाल्मली इंद्राचे प्रतीक,
आम्रवृक्ष हे प्रजापतीचे रूप व प्रजोत्पत्तीचे प्रतीक, तर निवडुंग मानसादेवीचे प्रतीक, रुईला सूर्याची प्रतिनिधी मानली जाते. नारळ लक्ष्मीचे व सद्भावनेचे प्रतीक, तर दूर्वांचे त्रिदळ म्हणजे पावित्र्य-आत्मिक बल व उत्साहाचे प्रतीक. तांदूळ मांगल्याची खूण... भारतीय संस्कृतीत वृक्ष - वनस्पती ह्या जीवनाचा असा अविभाज्य अंग बनल्या आहेत.
मुलांचा चांदोबासुद्धा निंबोणीच्या झाडा'मागेच लपतो ना? मंगलप्रसंगी केळीचा खांब स्नेह्यागत उभा राहतो. आंब्याच्या पानाच्या तोरणातून मुंडावळ्यांची आठवण येत नाही? झाडे तुम्हांआम्हाला आयुष्यभर अशी पूर्ण साथ देतात. बदल्यात आम्ही काय देतो त्यांना? हा प्रश्न ज्याचा त्याने आपापल्या मनाला करावा आणि पर्यावरण वाचविण्यासाठी झाडे लावण्यास कटिबद्ध व्हावे... हाच या सर्व गोष्टींचा सारांश ! निष्कर्ष !!!
शेवटी, बालकवींच्याच शब्दांत सांगायचे, तर 'हरित तृणांच्या मखमालिचे हिरवेहिरवे गार गालिचे' आपल्या डोळ्यांचे पारणे त्यामुळे फिटणार आहेत आणि काँक्रीटच्या जंगलाचे विषण्णपण ते घटवणार आहेत !मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद