गुटखा बंदी समाजाची एक गरज मराठी निबंध | Gutkha Bandi Samajachi Ak Garg Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण गुटखा बंदी समाजाची एक गरज मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्येक समाजात विधायक कार्याबरोबर काही विघातक किंवा हानिकारक घटना घडत असतात. मग अशा वेळी त्या समाजातील विचारवंत, बुद्धिवंत, आरोग्य, तज्ज्ञ सामाजिक संघटना यांच्याकडून तेथील सरकारवर, शासनकत्यावर बऱ्याच गोष्टी बंद करा अशा मागण्या सातत्याने होत असतात.
याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रातही मागील काही वर्षात बऱ्याच गोष्टीवर बंदी घालण्यात आली होती त्यातलीच एक म्हणजे 'गुटखाबंदी' होय. आता मग गुटखा म्हणजे तरी काय ? त्यात असे काय असते की त्यामुळे त्यावर बंदी घालण्याची पाळी सरकारवर येते ?
गुटख्यामध्ये सुपारी, तंबाखू, विविध स्वादाचे वास, कात असे पदार्थ असतात. हे वरील सर्व पदार्थ आपल्या समाजात पूर्वापारपासून काही लोक खात आहेतच. त्यामुळे या गुटख्यांचा अशा लोकांमध्ये सुरुवातीला सहजगत्या प्रसार झाला किंवा ते लोक खाऊ लागले
मग इतर उत्पादनाप्रमाणेच याचे उत्पादकही या (पदार्थाचा) गुटख्याची मिडियाद्वारे जाहिरात करू लागले मग हा विषय पुढेपुढे मानाचा बनला जाऊ लागला. पुढे मग शाळेतील किशोरवयीन मुलेही त्याप्रमाणे बऱ्याच महिलाही याचे सेवन करू लागल्या यातील प्रत्येक पदार्थ शरीरास हानिकारक आहे हे माहीत असूनही प्रमाण वाढतच होते.
मग काही लोकांनी याचे प्रयोगशाळेत नमुने तपासले व त्यातून खूपच धक्कादायक माहिती बाहेर आली त्या परीक्षणांत त्यांना त्याच्यात पालीच्या शरीराचे विविध अवयव, धातूचे तुकडे असे अनेक हानिकारक पदार्थ सापडले.
पण तोपर्यंत समाजात गुटख्यांचा प्रभाव चांगलाच वाढला होता. धक्कादायक निष्कर्ष येऊनही खाणाऱ्याचे प्रमाण कमी होत नव्हते म्हणजे तो चांगलाच रुजला होता. याच वेळी त्याचे घातक परिणामही समोर येऊ लागले होते. अतिसेवनामुळे बऱ्याच जणांना तोंडांचे आजार सुरू झाले होते,
काहीचे दात निकामी झाले होते. काहींना तोंडातील मांसल भागाची झीज घडून आली होती. काहींना तोंडांच्या कर्करोगालाही सामोरे जावे लागले. तर काहींच्या पचनक्रियेतही दोष उत्पन्न होऊ लागले होते.
ज्याप्रमाणे घरातील एक व्यक्ती जरी आजारी असली तरीही कुटुंबाला त्याचा फटका बसत असतो. त्याचप्रमाणे या गुटखा खाणाऱ्याच्या बाबतीत घडत होते. त्यांच्या कुटुंबीयांना या ना त्या प्रकारे त्रास सहन करावाच लागत होता/ आहे. मग अशा वेळी
समाजातील विचारवंत, समाजसुधारक, सामाजिक संघटना यांचा शासनावर गुटखा बंद करा म्हणून दबाव वाढला होता. याचा समाजावरच (पूर्ण) घातक परिणाम होत होता म्हणून तो राजकीय लोकांसाठीही कळीचा मुद्दा बनत होता.
गुटखा हे सरकारच्या कराचे एक चांगले माध्यम होते त्यामुळे सरकार सुरुवातीला अस्वस्थ होते पण शेवटी समाजाचा वाढता रोष पाहून सरकारने अखेर गुटखाबंदी केलीच नंतर वृत्तपत्रातून, विविध वाहिन्यांवरून याची एक दुसरीच बाजू समोर येऊ लागली.
ती म्हणजे की परवानाधारक उत्पादकापेक्षा गैरमार्गाने गुटखा हा सरकारच्या बाबतीत (करांच्या) अनुत्पादकच होता म्हणून सरकारने ही बंदी केली. पण हा कायदा खूपच दुटप्पी आहे, म्हणजे कसा तो बघा, राज्यात उत्पादन करण्यावर बंदी घातली गेली नाही.
फक्त विक्रीवरच बंदी घातली गेली. खाण्यावरही बंदी घातली गेली नाहीच, पण त्यांना जवळ एक पुडी बाळगण्याची मुभासवलत मिळाली. यामागे सरकारचे धोरण असेही असू शकते की जर ग्राहकांना गुटखा मिळालाच नाही तर ते कुठून खाणार व कसा बाळगणार ?
पण इतके दिवसही कायदा होऊन म्हणावा इतका फायदा झाला नाही. कारण आपण बघतोच की रस्त्यावर फुटा-फुटाला या गुटख्याची पाकिटे पडलेली आढळतात. आजही जवळपास सर्वच टपऱ्यांवर पूर्वी इतकाच गुटखा सहज उपलब्ध होतो. तरीपण फरक पडलाच नाही असे म्हणता येणार नाही.
कारण या गदारोळात एक प्रकारे त्याबाबतीत समाजात नकळतपणे प्रबोधन झालेच आहे कसे ? वृत्तपत्रातून याविषयी येणारे लेख, वाहिन्यांवर आरोग्यतज्ज्ञांशी दाखवल्या गेलेल्या चर्चा यामुळे बऱ्याच जणात त्याचे घातक परिणाम लक्षात आहे. त्यामुळे आपण पाहतो की बऱ्याच जणांचे प्रमाण कमी झाले काहींनी तर सेवन पूर्णपणे बंदच केले आहे.
तरीपण गुटखा खाणाऱ्याचे प्रमाण पूर्णपणे बंद करण्यासाठी कायद्यात अजूनही बदल करावे लागतील. उत्पादन, विक्री करणे, खाणे या सर्वांवर पूर्णपणे बंदी आणावी लागते.कायद्याची अंमलबजावणी अधिक कडकपणे करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर सामाजिक प्रबोधनही चालूच ठेवावे लागणार आहे.
समाज हा व्यक्तीपासून झालेला असतो त्यामुळे प्रत्येकी व्यक्ती जर निरोगी, सुदृढ असेल तर आपला समाज पर्यायाने आपला देश निरोगी सुदृढ बनू शकेल. असाच समाज, देश आपली प्रगती उत्तरोत्तर वाढवत नेऊन अधिक सुखी समृद्धी बनू शकेल. मग रोखणार ना आपल्या मित्रांना, आप्तस्वकीयांना गुटखा खाण्यापासून परावृत्त कराल ना ? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद