जलसंधारण मराठी निबंध | Jalsandharan Essay in Marathi

 जलसंधारण मराठी निबंध |  Jalsandharan Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  जलसंधारण  मराठी निबंध बघणार आहोत. वृक्षवल्ली आम्हां सोयरी- वनचरें' म्हणणाऱ्यांबरोबरच जीवनदायिनी सुंदर वसुंधरेवरील वृक्षलताही लोप पावत चालल्या आहेत. हे नंदनवनाचे वाळवंटीकरण होत चाललेय, ते औद्योगिक प्रगती, यांत्रिकीकरण, रासायनिक खतांचा विपुल वापर, 


नैसर्गिक साधनसंपत्तीचा बेजबाबदारीने उपभोग, लोकसंख्यावाढ या आणि अशा अनेक कारणांनी ! त्यामुळे पर्यावरण प्रदूषित होणारच. फार पूर्वीच सम्राट अशोक आणि छत्रपती शिवाजीमहाराजांनी जैविक व अजैविक सृष्टीच्या संतुलनाचा ध्यास व्यक्त केला होता; पण आज शकुंतलेने कण्वमुनींच्या आश्रमाचा निरोप घेताना वृक्षवेलींची जी काळजी घेतली होती, तिची आठवण येण्याचे दिवस आले आहेत...


पथ्वीचा हा बिघडत चाललेला चेहरामोहरा आणि धोकेदायक अस्त्वि आणखी क्षीण होऊ नये, म्हणून आम्ही सारेच उद्योगाला लागलो आहोत. पश्चातापाने चूक सुधरविण्यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करूलागलो आहोत. व्यक्तिगत, सामूहिक आणि शासकीय पातळीवर ही 'जाग' येऊ लागल्याने पुनश्च वनीकरणाकडे वळलो आहोत, 


पर्यावरणाची कास धरू लागलो आहोत. करडा-पिवळा पट्टा पृथ्वीवर दिसू नये, ती हिरव्या रंगाने नटावी, म्हणून प्रयत्नाला लागलोत. जंगलाबाहेरील क्षेत्रात वृक्षसंवर्धन करून त्याद्वारे आमच्या गरजा भागविण्यासाठी सामाजिक वनीकरण' करू लागलो आहोत, हेही नसे थोडके !


पर्यावरणाचे आपण केवळ वारसदार नसून, त्याचे रक्षण करून त्याला समृद्ध करणारे विश्वस्तही आहोत. म्हणून त्याचा समतोल राखण्यासाठी प्रतिज्ञा करू,'असे उद्गार माजी मुख्यमंत्री श्री. शंकरराव चव्हाण यांनी चौदाव्या जागतिक पर्यावरणदिनी काढले होते.


इंधनासाठी आम्ही वृक्षाच्छादनाचा हास केला, त्यामुळे जमिनीची अफाट वेगाने धूप झाली. पावसाने महाराष्ट्राला वारंवार हुलकावणी दिली. जमिनीतल्या 'जीवनाची पातळी खाली गेली. 'पाण्यासाठी दाही दिशा'भटकंती आली. वारंवार असे घडले. कधी धो धो पाऊस आला. 


माती वाहून तिची धूप झाली. सुपीकता वेगाने नष्ट झाली. परिणामी, दुष्काळजनक आर्थिक प्रश्न निर्माण झाले. शेतकरी आणि सरकार यांचे विकासचक्र कुंठित झाले आणि समग्र शेतीच्या अर्थव्यवस्थेचा कायापालट करणारा क्रांतिकारक कार्यक्रम बनवणे ही काळाची गरज निर्माण झाली. 


त्यातून 'लघु-पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम' म्हणजेच पाणलोट क्षेत्रासाठी पंचवार्षिक कार्यक्रम 'जलसंधारण' जन्माला आला! जमिनीच्या वरच्या सहा ते सात इंच थरावरच पृथ्वीवरील सर्व जीवित व योगक्षेम अवलंबून आहे. शिवाय, एक मिलिमीटर मातीचा थर धूपला की, सुमारे सहा ते सात टन माती एका हेक्टरातून तान जाते, हे लक्षात घेता जलसंधारणाची आवश्यकता निकडीने जाणवते. 


परमेश्वरदत्त देणगी असलेल्या पाण्यावर जरी प्रत्येकाचा हक्क असला, तरी पाणीवापराचे नियमनही तेवढेच महत्त्वाचे नाही काय? शेती व ग्रामीण विकास घडविणाऱ्या या कार्यक्रमास रोजगार हमी योजना, जवाहर योजना व अन्य योजनांचे आर्थिक पाठबळ आहेच. तसेच स्वयंसेवी संघटनांना या कार्यात सहभागी केल्यामुळे तिच्या यशस्वितेत भरच पडली आहे. 


मात्र जमिनीची धूप होण्याचा दर बघता फार जलदगतीने जलसंधारण राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे ही योजना एक आव्हानसुद्धा आहेच. सुमारे २० लक्ष हेक्टर लागवडीच्या आणि तेवढेच क्षेत्र पडित वा वनजमिनीवर मृद व जलसंवर्धनाचे कार्य एका वर्षात पार पाडणे आवश्यक आहे. कृषीमदतनीस, मृदसंधारण (जलसंवर्धनात वर्गीकृत) व बेनॉर योजनेतील सुमारे १० हजार कर्मचारी आहेत.


कर्तव्यतत्पर शासकीय कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांच्या सामूहिक व सकारात्मक प्रतिसादाची जोड मिळाल्याने ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्र विकास योजनेस चांगले यश मिळाले आहे. जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, पंचायत समित्या या लोकचळवळीसारख्या अभियानात आल्याखेरीज जनमानसात जलसंधारणाची जाणीवजागृती व गती कशी येणार? लोकशिक्षण-प्रबोधन हे तर 'सलाइन'सारखे या प्रश्नावर उपयुक्त आहे. 


लोकांना भू-जलसंवर्धनाच्या काही पारंपरिक पद्धती ठाऊक असतात. यामुळे त्यांनाही उजाळा मिळेल. 'स्थानिक पातळीवरील जमीन, पाणी, वने, पशुसंवर्धन, पीक आणि मानवी साधनसंपत्ती यांचा कृषी हवामानाच्या वैशिष्ट्यांनुरूप सुयोग्य वापर करणे हाच खरा विकास' 


हे लोकांमध्ये ठसवलं गेलं पाहिजे; म्हणजे पाणलोट क्षेत्र विकासाशी ग्रामीण जनतेची नाळ चांगली जुळेल आणि पाणी अडवलं, जिरवलं-मुरवलं जाईल. धूप शून्यावर येईल, असे वाटते! जमिनीची धूप थांबवली की, पाणी साठवणे शक्य होते. कुरणेही (गवत) धूप थांबविण्यात महत्त्वपूर्ण वाटेकरी आहेत. 


झाडांमुळे वाऱ्याने होणारी धूप कमी होते. म्हणून सामाजिक वनीकरणातून जलसंधारणा'चे महत्त्व लक्षात येते. हंगामी पिके, कायमस्वरूपी पिके, फळबाग- वृक्ष लागवड, कुरणे आदि योग्य प्रकारात लावल्यास स्थैर्य व सातत्य लाभून जलचक्र अबाधित राहील, पाणीटंचाई टळेल.


ज्या क्षेत्राचे पाणी नैसर्गिकरीत्या (उतारावरून) वाहत येऊन एका नाल्याद्वारे एका ठिकाणाहून वाहते, त्या संपूर्ण क्षेत्रास पाणलोट क्षेत्र' म्हणतात. महाराष्ट्रात ते १० हजार १३६ एवढे आहे. विदर्भातला शेंदूरजना घाट त्यापैकीच एक. तिथे कास्तकारांनी परिसर जलसंवर्धन समिती स्थापून गावालागतच्या चुडामन नदीत ६००० चौरस फुटांचा पाच फूट उंचीचा लोखंडी जाळीचा दगडी बंधारा शासकीय अधिकाऱ्यांसह श्रमदानाने पूर्ण केला. 


'जलसंवर्धना'च्या महायज्ञाचे हे आगळेवेगळे दर्शन होते ! या बंधाऱ्याच्या शुभारंभप्रसंगी (२५ मे १९९२) राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विधानाची आठवण करून देताना तत्कालीन मुख्यमंत्री श्री.सुधाकरराव नाईक म्हणाले होते : देशातील गोरगरीबांचे जीवन जेव्हा सुखासमाधानाचे होईल, 


तेव्हा स्वराज्याला खरा अर्थ प्राप्त होईल!' तथापि, अनियंत्रित व अमर्याद पाणीवापरामुळे (उपसा) भूगर्भातील पाणीपातळी वेगाने खाली गेली. त्यामुळे दूरगामी नियोजनासाठी जलसंधारण कार्यक्रम आखावा लागला.


'जीवनाचा आधार पाणी। 

थेंबाथेबाने साठवा पाणी॥' 

असे आवर्जून सांगण्याची आम्हीच, आम्हाला वेळ दुर्दैवाने आम्हीच आणली आहे. महाराष्ट्राचे ८७ तालुके व सुमारे ३० हजार खेडी दुष्काळ अवर्षणप्रवण क्षेत्रात दर दोन-तीन वर्षांत येतात. 'पाणी... पाणी...'करायला लावतात. कारण पावसाचं १५ टक्के पाणी जमिनीत मुरते, ८५ टक्के वाहून जाते. बाकी आठ महिन्यांसाठी ही सोय (जलसंवर्धनाची) नियोजनवजा करणे क्रमप्राप्त आहे.


पाऊस पडणे आपल्या हाती नसले, म्हणून काय झाले? पावसाच्या पाण्याची अडवणूक, साठवणूक, जिरवणूक अन् त्याची जपणूक ऊर्फ वापर (जपून केलेला) तर आपल्या हाती आहे ! कारण पाण्याची उपलब्धता जिराइत जमिनीमध्ये सहा ते आठ पट उत्पन्न वाढवू शकते, हे विसरता येत नाही. 


अमेरिकेतील काही राज्ये व इस्रायलने पावसाच्या अत्यंत कमी येण्यापुढे हात न टेकता, प्रत्येक थेंबाचे नियोजन केल्याने कॅलिफोर्नियासारखे प्रदेश फलाफुलांच्या अलंकारांनी नटतात. म्हणून वृक्षतोडीने आम्ही उजाड केलेले भूपृष्ठ सामाजिक वनीकरणाने, वनशेतीनेही आच्छादू शकतो. त्यामुळे हिरव्या झाडाझुडुपांची मुळे पाणी तरी अडवतील मुरवतील!


बांधबंदिस्ती, जलरोधक खड्डे, उतारावरील खंदक, डोंगराळ जमिनीवर पायऱ्यांसारखे बांध, कंटूर बंडिंग (घायपात, निवडुंग शेती) या पद्धतींनी भूजल साठवता येते, तर त्याचा साठा बोअरब्लास्ट, जॅकेट् वेल्, फंक्चर सील इत्यादी पद्धतींनी वाढविता येतो. 


शिवाय, परंपरागत पद्धतीचे पाझरतलावसुद्धा आजुबाजूच्या विहिरींना बराच काळ पाणी पुरवितात. सोबतीला भूमिगत बंधारे आहेतच. तंत्र आणि तंत्रज्ञ आहेत; पण मुळात प्रश्नच निर्माण झाले नसते, तर...त्यावरील उपाययोजनांची, पर्यायांची गरजच नव्हती. असो!


पिण्याचं पाणी, जनावरांना पाणी किंवा शेतीसाठी पाणी यांची टंचाई प्रत्येक एप्रिल-मे मध्ये भासते. काहीवेळा ४०० फुटांपेक्षाही खाली जमिनीत पाणी आढळत नाही. मग 'नेमेचि येतो...'प्रमाणे शासनाचे महसूल, ग्रामविकास व जलसंधारण या विभागांचे फतवे निघतात. युद्धपातळीवर नव्याने (दरवर्षी) ग्रामीण भागात टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो.


दिवसेंदिवस घटत जाणारे पर्जन्यमान, शेती आणि औद्योगिकीकरणासाठी होणारा या अमृततुल्य' पाण्याचा प्रचंड उपसा... इत्यादींसारख्या अनिवार्य संकटांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने गुगुलडोह (जि. नागपूर) व चिंचोली (जि. जळगाव) अन् असे कितीतरी ठिकाणी युवकांचे, श्रमदान करणारे हजारो तरुण हात उभे झाले आहेत. शासन कटिबद्ध आहेच. गावकरीसुद्धा म्हणताहेत... नारेही देत आहेत...


'पाणी अडवा। पाणी जिरवा।' 

‘असे कसे अडत नाही, 


अडल्याशिवाय राहत नाही' मग कुठे 'टेमाक' बंधारा उभारला जातो, कुठे 'मुमताज' बंधारा बघता बघता उभा होतो...'उद्या'चा भारत असाच उभा राहील उभारला जाईल आत्मविश्वासाचे पाणी साठेल... तेजाची गाणी म्हणेल... 'जलसंवर्धनासारख्या कित्येक योजना फलद्रूप होतील, फुलतील, बहरतील, फळतील... शेवटी 'मेरा भारत महान ।' बनवतीलसुद्धा !मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद