पाषाणांचा भार फुलांना मराठी निबंध | PASHANACHA BHAR PHULANA ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाषाणांचा भार फुलांना मराठी निबंध बघणार आहोत.
"बचे मन के सच्चे,
सारे जग की आँख के तारे
वो नन्हें फुल हैं जो,
भगवान को लगते प्यारे ।"
वराल ओळीवरून आपणास लहान मुली/मलं म्हणजे किती निरागस असतात हे कळते. पण आजच्या ह्या काँक्रीटच्या जगात त्यांचा निरागसपणा टिकून आहे, असे तुम्हाला वाटते का
काल मी एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी किती तरी लहान मुलांना काम करताना पाहिले. ते सिमेंटची पाटी डाक्यावर घेऊन मजुरांना मदत करणारे बालक बघीतले की, मनात दुखायला लागतं, अस्वस्थ होतं. आज ह्या मुलांच्या हातात शाळेतील पाटी असायला हवी त्या जागी सिमेंटची पाटी आहे.
त्यांना शाळेत जाऊन शिकायला पाहिजे तर ते आपल्या आई-वडिलाना मदत करण्यासाठी अवघड ठिकाणी त्यांच्या वयाला न झेपेल असे काम करताना दिसतात. कधी-कधी तर हा मुले आपल्या लहान भावंडांना सुद्धा खेळवतात व कामही करतात.
मोठ्या मजुरांनाही थकवणारी कामे ही मुले करताना दिसतात. सध्या बालकामगारांची संख्या सतत वाढत आहे.प्रत्येक ठिकाणी ही मुले काम करताना दिसतात. उदा. हॉटेलमध्ये हातात चहाचे कप घेऊन, कधी टेबल पुसायला, भाडी घासायला, सर्व्ह करायला ह्या मुलांना ठेवले जाते.
बस स्टँडवरसुद्धा बिस्किटे, वेफर्स, पाण्याच्या बाटल्या, चॉकलेट्स इ. विकताना दिसतात. एखाद्या संस्थेमध्ये लादी पुसायला, पाणी द्यायला, एवढेच काय तर एखाद्या सरकारी कार्यालयातसुद्धा ही मुले दिसून येतात. काही मुले तर रस्त्याच्या कडेला बसून किंवा रेल्वे स्टेशनवर चप्पल, बूट पॉलिश करताना दिसतात. इ. अशा अनेक ठिकाणी बालके काम करताना दिसतात.
जणू मोठमोठ्या अवजड-अवघड पाषाणरुपी कष्टांचा भार या नाजूक नाजूक मुलेरुपी फुलांना सहन करावा लागत आहे. ह्या काम करण्याच्या मोबदल्यात त्यांना काय मिळते याचा विचार केला तर आश्चर्यच होईल. घाम गाळणारी, कष्ट करणारी,
उन्हात भटकणारी त्या मुलांना पूर्ण दिवसभर काम केल्यानंतर २, ३ किंवा जास्तीत जास्त १० रुपये मिळतात श्वसनाला घातक अशा ठिकाणी सुद्धा ह्या मुलांना काम करावे लागते.त्यांना घरातील हलाखीच्या परिस्थितीमुळे शाळेत जायला पैसे नसल्यामुळे,
ह्या मुलांना कधी आई-वडिलांसोबत तर कधी एकटेच काम करायला जावे लागते. परिस्थिती एवढी वाईट आहे की, आई-वडील हे घरात असतात परंतु त्यांना (बालकांना) एखाद्या हॉटेलवर, गॅरेजमध्ये त्यांच्या मालकांना सोपवून मोकळे होतात आणि ते मालक त्या लहान मुलांना फारच कमी मोबदल्यात काम करून घेतात.
अशा ह्या बालकामगारांच्या स्थितीला कोण जबाबदार आहेत याचा विचार केला तर प्रथम पालक नंतर समाज जबाबदार दिसतात. पालक हे आपली आर्थिक परिस्थिती लक्षात न घेता ४-५ किंवा ७ व त्यापेक्षा अधिकही मुलांना जन्म देतात.
तर काही ठरावीक समाजातील लोकांची समजूतच अशी झाली आहे की, मुले ही शिकून काय दिवा लावणार आहेत. त्यापेक्षा काम करून लवकर आपल्याला हातभार लावतील, असा त्यांचा विचार असतो. परंतु, या सर्वांचा परिणाम मुलांवर काय होतो याची दखल कोणीही घेत नाही आहे. मुले ही, अपरिपक्व (मनाने/ शरीराने) असतानाच घराबाहेर पडतात.
वाईट गोष्टींच्या मागे लागतात. तसेच लवकर पैसा मिळवण्यासाठी ते अधिक कामही करतात तर वाईट मार्गही पत्करायला तयार असतात. अशा परिणामामुळे देशातीलच काय तर जगातील नवीन पिढी ही बिघडत चालली आहे.
त्यामुळे बालकामगार हटवण्यासाठी व मूळ, निरागस कोवळ्या बालकांना कष्टापासून वाचवण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच लोक जसे आपल्या मुलांना सांभाळतात तसाच त्यांना दुसऱ्या मुलांबद्दलही आपुलकी असावी.
म्हणजे 'आपलं बाळ मदन व दुसऱ्याचं ते कारट' अशी लोकांची विचारधारा झाली आहे. त्यांना जबाबदारीची जाणीव तर यायला हवी पण त्यांना तेवढेच शिक्षणही दिले गेले पाहिजे.
खाजगी पातळीवर 'क्राय'सारखी संस्था ही मुलांसाठी कार्य करत आहे. तसेच WHO, UNO, UNICEF या संघटना जागतिक पातळीवर काम करत आहेत. तसेच सरकारने आपल्या राज्यघटनेतच अशी तरतूद केली आहे की, वयोगट ७ ते १४ पर्यंतच्या मुला-मुलींना किमान प्राथमिक शिक्षण तरी द्यायला हवे.
तसेच सर्व शिक्षा अभियान, मुलींसाठी मोफत शिक्षण, तसेच अनेक सवलती व योजना राबवत होते. पण त्यासाठी फक्त सरकारनेच प्रयत्न करून चालणार नाही तर
प्रत्येक घरा-घरातील लोकांमध्ये ही जाणीव निर्माण व्हायला हवी, त्या बालकांना आपल्या देशाचे सुजाण नागरिक धा जबाबदारी आपलीच आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तरच ह्या कोवळ्या मुलांच्या हातात पुस्तके येतील- पाटा येईल आणि तोंडात सुंदर सुंदर कविता गाणी येतील.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद