आजोबांची भेट मराठी निबंध | AAJOBANCHI BHET MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आजोबांची भेट मराठी निबंध बघणार आहोत. लेखणी (पेन) माझ्या आजोबांनी माझ्या वाढदिवसानिमित्त मला एक पेन भेट म्हणून दिलं. मी आजोबांना म्हणालो, 'पेन कशाला आजोबा ? माझ्या जवळ अनेक पेनं आहेत.
आजोबा म्हणाले, तुझ्याजवळच्या पेनांपेक्षा हे पेन निराळे आहे. हातात धर आणि कानाजवळ ने, त्यातून तुला एक संदेश ऐकायला येईल. या पेनाने कधीही दुराक्षर काढू नकोस. दुराक्षराने ही लेखणी विटाळेल. क्षर म्हणजे नाहीसं होणार आहे ते या पेनाने 'अक्षर' कर. या पेनाने काढलेलं अक्षर अविनाशी असेल.
दीर्घकाळ टिकणारं असेल. मागे बोरूच्या लेखण्या अक्षर काढतांना कुरकुरायच्या; ही न कुरकुरणारी लेखणी आहे. आज विश्वात जे ज्ञानभांडार राहिलेलं आहे ना, ते केवळ लेखणीमुळे. लेखणी ही ज्ञानभांडाराची किल्ली आहे. मती गुंग करून टाकणारे विज्ञानातील शोध असोत,
महात्म्यांचे मंत्रतुल्य सुविचार असोत, किंवा प्रत्यक्ष चराचरातील आव्हान देणारी, एखाद्या प्रतिभावान कलावंताची चित्रसृष्टी असो, सारं सारं, या लेखणीतून झरलंय आणि म्हणूनच 'फौंटन पेन' या इंग्रजी शब्दाला स्वा. सावरकरांनी सुचविलेला प्रतिशब्द 'झरणी' हा मला मार्मिक वाटतो. म्हणून मला तो आवडतो. लेखणीतून झरत नाही अस काहीच नाही या जगात.
लेखणी सामर्थ्यशाली आहे. केशवसुत हिला 'तरफ' म्हणतात. ही तरफ आमुच्या करी निधीने दिली असे !' आणि तिच्या सान्निध्यामुळे प्रचंड आत्मविश्वास केशवसुतांच्या ठिकाणी निर्माण झालेला दिसतो. 'हिच्या जोरावर, जग उलथुनिया देऊ कसे ! असं ते म्हणतात. आणि ते शंभर टक्के सत्य आहे.
आजपर्यंत ज्या ज्या चळवळी झाल्या, ज्या ज्या क्रांत्या झाल्या, जे जे उत्पाद घडले, ते या इवल्याशा लेखणीमुळे. स्वा. सावरकरांच्या घरावर ब्रिटिशांच्या पोलिसांनी धाड घातली आणि भराभर त्यांच्या घरांतल्या वस्तूमागून वस्तू ते जप्त करायला लागले, स्वातंत्र्यवीर शांतपणे म्हणाले, 'तुम्ही घरातल्या सर्व वस्तू घेऊन जा; पण तुम्ही जप्त केलेली लेखणी आहे ना, तेवढी परत द्या. याचा मथितार्थ काय? घरातल्या मौल्यवान चीजवस्तूत सर्वांत मौल्यवान वस्तू लेखणी.
कित्येक उन्मत्त सिंहासने लेखणीमुळे धुळीला मिळाली आहेत आणि कित्येक साम्राज्ये लेखणीमुळेच नव्याने निर्माण झाली आहेत. दिव्य संस्कृतीची सुंदर कोरीव लेणी लेखणीनेच कोरली आहेत आणि कुबेराची भांडारं लेखणीनेच भरली आहेत.,लेखणी लावण्यवती आहे.
तुमच्या आमच्या जीवनात ठायी - ठायी गुलाबाच्या बागा या लेखणीनेच फुलवल्या आहेत. लेखणीमध्ये प्रचंड गुरुत्वाकर्षण आहे. एखादा बाका प्रसंग आला, की ही लेखणीच नागरिकांना युद्धभूमीवर खेचून नेते. ध्येयवादी वैज्ञानिकांना खऱ्या गुरुत्वाकर्षणाबाहेर झेप घ्यायला लावते.
ती ही लेखणीच. तीर्थगंगेत माणसाला न्हाऊ - माखू घालते ती लेखणीच आणि साता - समुद्रापलिकडे रहाणाऱ्या प्रियजनांशी रेशीम धाग्यांनी जवळीक साधते, ती लेखणीच. किती लिहावं लेखणीचं माहात्म्य ! पण एक ध्यानात घे, या लेखणीला कणखर कणा हवा.
ती अखेरपर्यंत ताठ राहिली पाहिजे, गलबताच्या डोलकाठीसारखी. मोडेल. पण वाकणार नाही आणि हे केव्हा घडेल, जेव्हा तिच्यातून केवळ निर्भीड, निर्भय सत्याक्षरं निघतील तेव्हाच. Zमागे आम्हाला असे सांगण्यात येई की एखाद्या कैद्याला न्यायाधीश फाशीची शिक्षा सुनावतो. 'याला मरेपर्यंत फाशी द्यावे' असे लिहून झालं की टाक मोडतो. पाहिलंत, लेखणी मोडली की सारं संपलं.
आपल्याला पुष्कळ वेळा लग्नाचं बोलावणं येतं. वाढदिवसाचं किंवा पंचाहत्तरीचं. त्यावेळी एक कठीण प्रश्न आपल्यापुढे उभा रहातो. तो म्हणजे 'भेटवस्तू काय द्यावी ?' काही-काही मंडळी हुशार व कल्पक असतात. योग्य अशा भेटीची ते निवड करतात. साठी साजरी करणाऱ्याला काठी, म्हाताऱ्याला आराम खुर्ची, विद्यार्थ्यांला चांगलं पुस्तक.
काही-काही भेटी मला मुळीच आवडत नाहीत. उदा. फुलांचा हार किंवा दुसऱ्या दिवशी कोमेजून जाणारा पुष्पगुच्छ. केव्हा केव्हा इतके महाग गुच्छ, की छाती दडपून जाते, किंमत ऐकल्यावर.
काही चहाटळ माणसं, अशा भेटी देतात; की त्यांच्या कल्पकतेचं कौतुक करावं, की त्यांना बोल लावावा, हेच कळत नाही. एका माणसाची पंचाहत्तरी होती. आहुतांपैकी एकाने त्याला चक्क एक कंगवा भेट म्हणून दिला. पंचाहत्तरी साजरी करणाऱ्या त्या माणसाला संपूर्ण टक्कल पडलेलं होतं. तुळतुळीत चमन गोटा.
एकाने आपल्या मित्राला एक मोठा आणि एक छोटा असे दोन दगड पाठवून दिले. बरोबर चिठ्ठी. “तुझ्या घरात ढेकूण खूप झालेत',असे तू परवा मला सांगितलंस. त्यावर उपाय म्हणून ही भेट. ढेकूण पकडावा, तो छोट्या दगडावर ठेवावा, आणि मोठ्या दगडाने तो मारावा. तुझं घर ढेकूणमुक्त होईल.
इंग्लंडला युद्ध जिंकून देणारा विन्स्टन चर्चिल हा जितका लोकप्रिय होता, तितकाच तो अप्रिय होता. तो वाटेल ते बोले; सारखे पक्ष बदलत राही. त्याची खिल्ली उडविण्यासाठी म्हणून, एका नाटकाच्या कंपनीने त्याला नाटक प्रयोगाची २ तिकिटे पाठवून दिली.
तिकिटाबरोबर पाठविलेल्या चिट्ठीत लिहिलं होतं, 'एक तिकीट तुमच्यासाठी आणि दुसरे तुम्हाला एखादा मित्र असलाच तर त्याच्यासाठी.' चर्चिलने दोन्ही तिकिटे परत पाठविली आणि सोबत एक चिट्ठी पाठविली.
चिट्ठीत लिहिले होते, 'तुमच्या नाटकाचा दुसरा प्रयोग झालाच, तर त्या प्रयोगांची तिकिटे पाठवावीत.' काही म्हणा, शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद हीच खरी भेट. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद