आमचे वर्ग शिक्षक मराठी निबंध | Aamche Vargshikshak Essay In Marathi

 आमचे वर्ग शिक्षक मराठी निबंध | Aamche Vargshikshak Essay In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमचे वर्ग शिक्षक मराठी निबंध बघणार आहोत. मी प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत आलो. प्रत्येक विषयाला वेगवेगळे शिक्षक. पण तरीही, त्यातले म्हणजे पहिल्या तासाला हातात हजेरीपुस्तक घेऊन येतात, ते आपले वर्गशिक्षक असतात, असे मला काही दिवसांनी समजले. 


आता माझे शाळेतले शेवटचे वर्ष. यंदा मला वर्गशिक्षक आहेत साठेसर! साठेसर म्हणजे आदर्श शिक्षक, नियमांचे पक्के, शिस्तीचे भोक्ते, वक्तशीर आणि अभ्यासू वृत्तीचे. त्यांचे त्यांच्या विषयावर प्रभुत्व आहे. कोणतीही गोष्ट वेळेवर केलीच पाहिजे, 


हे ते खूप छान समजावून सांगतात; त्यामुळे त्यांनी सांगितलेले कोणीही टाळत नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षक ह्यांच्यातील संबंध कसे असावेत, याचा उत्तम नमुना म्हणजे आमचा वर्ग आणि आमचे वर्गशिक्षक. सर्व काम चोख नि वेळेवर!


आमचे सर खूप साधे आहेत. स्वच्छ, नीटनेटके आणि आपल्या पेशाला शोभतील, असे कपडे; वापरतात. खूप नीटनेटके आणि व्यवस्थित. प्रसन्न असे व्यक्तिमत्त्व. मृदू बोलणे. विद्यार्थ्यांवर मनापासून प्रेम. त्यामुळे सरांना मुद्दाम त्रास देण्याचा विचारही कोणाच्या मनात येत नाही. 


ते कधीच कोणाच्या अध्यात-मध्यात नसतात. आपण भले नि आपले काम भले, अशी त्यांची वृत्ती असल्याने ते अजातशत्रू आहेत. ते आपल्या कर्तव्याचे पालन उत्तम रीतीने करतात.


आमचे सर माणूस म्हणून उत्तम आहेतच; पण एक शिक्षक म्हणून त्यांचे मूल्यमापन केले, तर त्यांना खूप गुण मिळतील. त्यांच्याजवळ ज्ञानभांडार विपुल आहे. इंग्रजी हा त्यांचा मुख्य विषय आहे. इंग्रजी व्याकरण ते खूप सोप्या पद्धतीने शिकवतात. काव्य शिकवावे, तर आमच्याच सरांनी ! 


कोणताही शब्द विचारा, शब्दासहीत त्याचा अर्थ सांगणार. चालते-बोलते शब्दकोष आहेत ते. इंग्रजी बोलतात; पण खूप सफाईदारपणे. गाईड हातात घेऊन त्यांनी कधीच शिकविलेले नाही. धडा, त्याचे लेखक, त्यातील आशय, त्यावरील संदर्भ, सगळे काही तोंडपाठ ! 



पाठ्यपुस्तकातील सर्व कविता त्यांच्या पाठ असतात. कोणत्याही शंकेचे निरसन ते अगदी आम्हाला समजेपर्यंत करतात. कोणतीही शंका केव्हाही विचारा, ते लगेच सांगणार. त्यात कसलीही चालढकल नसते. वर्गातील कच्च्या मुलांना ते वेगळा वेळ देऊन शिकवतात. 


कितीही प्रश्नपत्रिका सोडवून त्यांना तपासायला द्या, सर्व सूचनांसह योग्य मूल्यमापन करणार असे सर हरहुन्नरी आहेत. ते सतार उत्तम वाजवितात. मुलांची सहल असो की कोणताही कार्यक्रम असो, उत्तम नियोजन करतात. सहलीतही तेथील स्थळांची माहिती एखाद्या गाईडप्रमाणे देणार. 


कोठेही जाण्यापूर्वी त्यांचा अभ्यास तयार असतो. असे अभ्यासू वृत्तीचे, मनमिळावू, विद्यार्थ्यांवर प्रेम करणारे आमचे वर्गशिक्षक चिरस्मरणात राहतील, यात शंकाच नाही. केवळ पगार मिळतो; म्हणून पोटासाठी नोकरी करणारे हे सर नाहीत. 


तर मनापासून शिक्षकी पेशावर प्रेम करणारे, खऱ्या अर्थाने पिढी घडविणारे आमचे सर दीर्घायू होवोत आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच सदिच्छा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद