अनाथ मुलाचे आत्मवृत्त मराठी निबंध | Aanath Mulache Aatmavrutta Marathi Essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अनाथ मुलाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. “जगी ज्याला कोणी मायचे, जवळचे नात्याचे कोण नसते, त्याला जग अनाथ पोरका म्हणते. मग मीपण अनाथ आहे का? होय, मी निराधार! अनाथ! या जगात माझे कोणी नाही; आणि मी कोणाचा नाही.
पण तरीही माझा चांगुलपणावर, श्रमावर विश्वास आहे. ज्याने चोच दिली, तो चाऱ्याची व्यवस्था करतो. दाने दाने पर नाम लिखा है खानेवाले का नाम। पण त्यासाठी श्रम करावे लागतात. प्रामाणिक रहावे लागते. ज्ञान ग्रहण करावे लागते. काहीतरी मिळविण्यासाठी काहीतरी द्यावे लागते.
ज्ञान, श्रम, संयम, निष्ठा, विनय हीच शिदोरी असते. _मी एका संपन्न अशा खेड्यात जन्माला आलो. चारी बाजूंनी डोंगर आणि मध्ये वसलेले गाव. अगदी एखाद्या द्रोणात ठेवल्यासारखे! वनश्रींनी नटलेले गाव, झुळुझुळु वाहणारे नदीचे पाणी आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर असलेले महादेवाचे मंदिर. याच
महादेवाचा गावावर वरदहस्त. गावात सुख-समाधान. कष्टाळू माणसे. मीदेखील याच गावाचा एक हिस्सा. माझे वडील गावाच्या मंदिराचे पुजारी. गावातील धार्मिक कृत्ये माझ्याच वडिलांकडून घडत. माझी आई म्हणजे साक्षात साध्वी. अशा चांगल्या आईवडिलांच्या पोटी जन्म घेण्याचे भाग्य लाभलेला मी. आयुष्यात सगळेच चांगले प्रत्येकाला मिळतेच, असे नाही.
मीही कसा अपवाद असेन त्याला? माझे मूळ उत्तम, सर्व उत्तम; त्यामुळे संस्कारसंपन्न. बुद्धीला धार. पाठांतर उत्तम. वाणीवर उत्तम संस्कार; त्यामुळे जिभेवर सरस्वतीचा वास. निरोगी, सुदृढ शरीर. ___ मी दहा वर्षांचा होतो. वडिलांबरोबर मी शेजारच्या गावात यज्ञासाठी गेलो होतो.
गावात मोठा याग संपन्न होत होता. मंत्रोच्चाराने गावातील वातावरण मंगलमय झाले होते. यज्ञात समिधा पडत होत्या. ज्वाळा अधिक तेजस्वी बनत होत्या. धूम्रवलये, मंत्रजागर सुरू असतानाच वडिलांची तब्येत अचानक ढासळली. मी त्यांची ती स्थिती पाहून खूपच घाबरलो. धावपळ करून डॉक्टरांना बोलाविले. त्यांनी तपासले आणि 'सॉरी' म्हणून जाऊ लागले. मी त्यांना अडवून विचारले,
"डॉक्टर, काय झालंय माझ्या बाबांना?" डॉक्टर म्हणाले, “बाळ तुझे बाबा हे जग सोडून गेलेत." हे शब्द माझ्या कानांत शिरत होते; पण मनापर्यंत पोहोचत नव्हते. मेंदू बधिर झाला. अचानक झालेला आघात मन विषण्ण करून गेला. आई हा धक्का सहन करू शकली नाही; त्यामुळे तीदेखील बाबांच्या पाठोपाठ देवाघरी गेली. तेव्हापासून माझ्या दुर्देवाचे दशावतार सुरू झाले.
मी पोरका झालो. एकाच वेळी माझ्यावरील मातृ-पितृ छत्र हरपले आणि अनाथ' हा शिक्का मारला गेला. आता माझे पुढे काय? हा प्रश्न गावकऱ्यांपुढे पडला. अनेक विचार पुढे आले. कोणीतरी ह्याला दत्तक घ्यावे, कुठल्यातरी अनाथाश्रमात ह्याला ठेवावे, मी मूकपणे सगळे काही ऐकत होतो.
पण एक क्षण असा आला की, मी सर्वांना निक्षून सांगितले, “मी हे गाव सोडून कोठेही जाणार नाही. मी देवळातील महादेवाची दररोज पूजा करीन. वेदपठन शिकलेलो आहे. तीच विद्या मी पुढे शिकेन. मी माझ्या वडिलांचाच वारसा पुढे चालवीन. मी कोणालाही दत्तक जाणार नाही.
सर्वांनी मला सहकार्याचा हात द्यावा. वडिलकीच्या नात्याने प्रेमाने आशीर्वाद द्यावा. मी गावातील सर्व धार्मिक कामे करत राहीन.” माझ्यातील आत्मविश्वास आणि धीटपणा पाहून गावातील लोकांना आश्चर्यच वाटले. गावातील सर्व स्त्रियांनी मला मुलासारखे प्रेम देण्याची तयारी दाखवली.
मी दररोज उठल्यावर माझ्या माता-पित्यांचे स्मरण करतो, त्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतो आणि माझी दिनचर्या सुरू होते. स्वावलंबनामुळे मला कोणतीही अडचण येत नाही. स्वत:चे सर्व काम मी स्वत: करतो. दररोज नित्यनेमाने देवाची पूजा करतो. नंतर
माझ्या नित्यकामाला सुरवात करतो. दिवसभरात माझ्या पोटापाण्याची व्यवस्था होईल एवढे तांदूळ आणि दक्षिणा जमते. मी पाठशाळेत नित्यनेमाने जातो. गुरूंची आज्ञा पाळतो. त्यांनी दिलेली विद्या ग्रहण करतो. मला दशग्रंथी बनायचे आहे. वेदाभ्यासात पारंगत होऊन धर्माचे रक्षण करावयाचे आहे.
मला लोक 'अनाथ' म्हणून संबोधतात. काही वेळा माझी कीवसुद्धा करतात. मला त्याचे काहीच वाटत नाही. आज माझे आई-वडील हयात नाहीत; पण त्यांच्याकडून मिळालेला वारसा मी पुढे चालवणार आहे. त्यांनी दिलेली अक्षय शिदोरी मला जन्मभर पुरणार आहे.
मग मी स्वत:ला हतभागी, दीन, कमजोर का समजू? जगात नेहमीच चांगले किंवा वाईट घडते. माणसावर संकटे येतात, तेव्हा त्याची शक्तीदेखील वाढत त्यामुळेच मनुष्य संकटांवर मात करू शकतो.
मीदेखील तेच करतो आहे. मग मी तुम्हा सगळ्यांना एकच प्रश्न विचारतो "मग मी अनाथ कसा? जगाच्या दृष्टीने मी अनाथ आहे; पण मी तसे मानत नाही. कारण माझा विश्वास आहे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो.मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद