आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार मराठी निबंध | AAPNCH AAPLYA JIVNACHE SHILPKAR NIBANDH MARATHI

 आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार मराठी निबंध | AAPNCH AAPLYA JIVNACHE SHILPKAR NIBANDH MARATHI


 नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार मराठी निबंध बघणार आहोत. 'आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार' ह्याचा अर्थ असा आहे की, आपला विकास आपण स्वत:च करायला हवा. कोणी दुसरा आपल्या विकासाच्या आड येतो, ही कल्पना चुकीची आहे. 


अग्नीची ज्वाला सतत वर उसळत असते, तसेच आपणही सतत वर झेपावले पाहिजे. आहे त्याच ठिकाणी राहणे म्हणजे काही प्रगतीचे लक्षण नाही. नोकरीत असू, तर वरच्या पदावर उन्नती होईल, असे प्रयत्न करावेत. गरिबी दूर करण्यासाठी उत्पन्न कसे वाढेल, याच्या वाढीच्या योजना आखल्या पाहिजेत. 


हळूहळू शिक्षणातील प्रगती करावी. पदवी संपादन करावी. ज्या क्षेत्रात वावरत असू, त्या क्षेत्राचे तर उत्कृष्ट ज्ञान प्राप्त करून घ्यावेच; परंतु आपल्या रोजच्या नोकरीधंद्याच्या व्यवसायाखेरीज अन्य कोणत्या तरी क्षेत्रातील ज्ञान व अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आपल्या स्वभावात हळूहळू बदल घडला पाहिजे. 


विचारपूर्वक एक-एक दुर्गुण दूर करण्याचा व सद्गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा. एखाद्या विषयाचा व्यासंग करावा. अनेक ग्रंथ वाचावेत. त्यांची पद्धतशीर टिपणे काढावीत. असे केले, तर आपल्या स्वत:च्या जीवनात तर परिवर्तन होईलच; परंतु समाजासही आपल्या सहवासाचा लाभ होईल. संत तुकाराम महाराज म्हणतात 


"तुका म्हणे मना पाहिजे अंकुश।

नित्य नवा दिस जागृतीचा॥”


वामनराव पै देखील सांगतात, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार !' शिल्पकार दगडातून शिल्प घडवतो. खरे तर दगडात शिल्प असतेच. फक्त छिन्नी, हातोड्याने दगडातील ते शिल्प बाहेर काढावे लागते. म्हणजेच प्रत्येकाने आपल्या स्वत:ला ओळखले पाहिजे. 


आपल्यातील गुण ओळखून त्याचा विकास घडविला पाहिजे. स्वत:च्या न्याय्य हक्कासाठी स्वत:च झगडले पाहिजे. दलित बांधवांचा उद्धार करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्या बांधवांना जागृत केले. त्यांना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढताना त्यांनी म्हटले, “आपणच आपला उद्धार केला पाहिजे. कोणीतरी महात्मा येईल आणि आमचा उद्धार करेल, ही समजूत चुकीची आहे. 


तुम्ही तुमची प्रगती केली, तरच देशाची प्रगती होईल. आपल्या हक्कांच्या आणि कर्तव्यांच्या बाबतीत प्रत्येकाने जागरूक असले पाहिजे. सूर्य उगवला आहे; पण आपण आपली घराची, दारे बंद करून घेतली तर प्रकाश आत येणार नाही. 


म्हणजे घरात अंधारच ना? त्याप्रमाणे प्रत्येकाने येणाऱ्या संधीचा फायदा करून घेतला पाहिजे. असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी' ही वृत्ती सोडून दिली पाहिजे. असे झाले, तर आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार बनू.थोरांनी दिलेली ही शिकवण आपण सगळ्यांनीच आचरणात आणली पाहिजे. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद