अंध भिकाऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध | Andh Bhikaryache Atmavrutt Marathi Essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण अंध भिकाऱ्याचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. होय, मी भिकारी आहे. मी तुमच्याच दयेवर, दिलेल्या भिकेवर जगतो. पण मला खरी सहानुभूती फार थोड्या लोकांकडून मिळते. कारण भीक मागणे ही काही प्रतिष्ठित गोष्ट नाही. मान्य आहे मला.
पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात. 'पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!' मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलो. माझे वडील मोलमजुरी करायचे आणि आई धुण्या-भांड्यांची कामे. कष्ट करून मिळालेल्या पैशातून आम्हाला भाकरी मिळत होती. त्यांच्या परीने ते माझे लाड करायचे. आहे त्यात मी खुश होतो.
पण नंतर वाईट दिवस आले. माझे आई-बाबा दोघेही एकाच अपघातात गेले. तेव्हा मी सात-आठ वर्षांचा होतो. मी पोरका झालो. एक दिवस घराबाहेर बसलो असताना दोन माणसांनी मला बळजबरीने गाडीत कोंबले. मी आरडाओरडा केला, तर त्यांनी सुऱ्याने धाक दाखवून मला गप्प केले.
मला एका पहाडावर नेले. तिथे माझ्यासारखी अजूनही काही मुले होती. नंतर मला समजले की, ही गुंड माणसे आहेत; आणि यांची एक मुलांना पळविण्याची टोळी आहे.
दोन-चार दिवसांनंतर आम्हाला डोळे बांधून चालण्याचा सराव करायला सांगितले. माझा आवाज चांगला होता; म्हणून मला गाणी म्हणायला शिकवली. मला त्याचा अर्थ समजत नव्हता; पण का म्हणून विचारायची सोयच नव्हती. काही दिवसांतच मला समजले की, हे लोक भिकारी म्हणून आम्हाला भीक मागायला पाठवणार आहेत.
हे समजल्यावर मी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण तेव्हापासून माझ्यावरचा पहारा कडक झाला. आमच्यापैकी चलाख मुलांचे डोळे काढण्यात आले. आता तर माझ्या आयुष्याचे रंगच संपले. सगळीकडे अंधारच अंधार.
आता फक्त त्या अंधारातच चाचपडत राहणे पुढे आले. झाले ! माझ्यावर अंध भिकारी' हा शिक्का बसला. हातात कटोरा आला नि घसेफोड करत गाणी म्हणणे आले. अनेक वेळा वाटायचे, संपवून टाकावे हे आयुष्य. खूप खूप वाईट वाटायचे. पण होतेच कोण आमचे दु:ख विचारणारे?
ज्यांनी आमच्या आयुष्यात दु:ख आणले, त्यांना सांगून काय फायदा? आई-बाबांची खूप आठवण यायची. त्यांची इच्छा होती, मी शिकून मोठा व्हावे. आता तर सगळी आशा मावळली 'अश्रू ढाळणे एवढेच या नयनांचे उपकार' अशी स्थिती आहे माझी ! दैव देते नि कर्म नेते. अगदी लाचार झालोय मी.
लोकांना वाटते, की भिकाऱ्यांना कष्ट करायला नकोत; आयते खायला हवे. काहींना तर वाटते, मी आंधळा असल्याचे नाटकच करतो. पण कोणाकोणाला सांगू माझी ही कहाणी? थंडी, वारा, पाऊस, ऊन, काहीही असो, भीक मागायला जावेच लागते.
आम्हाला प्रत्येकाला शहरातला भाग वाटून दिला आहे. त्या त्या ठिकाणी जाऊन भीक मागायची. संध्याकाळी परत यायचे नि ते जे काय देतील, ते खायचे. कमी भीक मिळाली, तर मार खायचा आणि उपाशी झोपायचे. रात्रंदिवस अंधारातच चाचपडायचे.
अशा या आयुष्याचा खूप कंटाळा आलाय. कळसूत्री बाहुलीप्रमाणे आम्हाला नाचवले जाते. इच्छा असो अथवा नसो, नाचायचे. सगळेच यांत्रिक-त्या रोबोटसारखे. फरक एवढाच की, आम्हाला भावना आहेत; रोबोटला नसतात. ह्या भावना आहेत, जीव आहे, हाच आता शाप बनत चाललाय.
समाजात असे नीच कृत्य करायला लावणारे आणि दुसऱ्याच्या अगतिकतेचा फायदा घेणारे नराधम शोधून त्यांना जबरदस्त शिक्षा करावी आणि आमच्या सारख्या दुर्दैवी मुलांची त्यातून सुटका व्हावी, अशीच त्या ईश्वरचरणी प्रार्थना.दाटलेला अंधार पुसून प्रकाश कोणी दाखवेल का?
व्यथा मनीची कुणी जाणेल का? मुक्ती यातून कुणी देईल का?प्रश्न अनेक आहेत; पण उत्तर मात्र एकच आहे. यातून सुटका! कोण करेल यातून आमची सुटका? .मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद