सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंध | autobiography of Lion in Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सिंहाचे आत्मवृत्त मराठी निबंध बघणार आहोत. मी सिंह. जंगलचा राजा. गीरच्या जंगलात माझा जन्म झाला. माझे बालपण आईच्या कुशीत सुरक्षित होते. पण... एक दिवस मी जखमी झालो.
जंगलचा अधिकारी जनावरांच्या डॉक्टरला घेऊन आल त्यांनी मलमपट्टी केली; पण मला एका प्राणिसंग्रहालयात ठेवण्याची योजना बनवली. एका बंदिस्त वाहनातून मला एक प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले. त्या प्राणिसंग्रहालयातील सिंहाचा मृत्यू झाल्याने पिंजऱ्यातली जागा रिकामी होती. शिवाय 'सिंह' म्हणून लिहिलेल्या पाटीच्या मागे सिंह दिसला पाहिजे ना!
प्राणिसंग्रहालयात आलो नि माझे बालपण हरवले. माझे स्वातंत्र्यही मला गमवावे लागले होते. घनदाट जंगलातील माझे वास्तव्य संपुष्टात आले होते. स्वच्छंदी वातावरणात मी खूप आनंदी होतो. ह्या माझ्या आनंदाला, स्वच्छंदी आणि स्वतंत्र वृत्तीला अक्षरश: दृष्ट लागली.
मला प्राणिसंग्रहालयातील त्या पिंजऱ्यात बंदिस्त करण्यात आले. मला अशा बंदिस्त वातावरणाची सवयच नव्हती. मी शिकार करायला शिकलो होतो. छोटी का होईना, स्वत: शिकार करून पोट भरायची सवय लागली होती. शिवाय आईचे संरक्षक छत्र होते.
माझे इतर बांधव माझ्यासोबत होते. त्या सगळ्यांपासून मला वेगळे करण्यात आले. एक पारतंत्र्याचे जीवन माझ्या वाट्याला आले. मी खूप दु:खी होतो. पिजऱ्यातून डरकाळ्या मारत मी येरझाऱ्या घालून माझा निषेध व्यक्त करत होतो; पण आता त्याचा काहीही उपयोग होणार नव्हता.
मला आठवतेय, त्या दिवशी माझा जीव भुकेने कासावीस झाला होता. मी ओरडू लागलो. पिंजऱ्याचे दार उघडून एक सफाई कामगार आत आला. त्याने माझा पिंजरा साफ केला आणि नंतर तो निघून गेला. थोड्या वेळाने दुसरा माणूस आला. त्याने मांसाचे काही तुकडे आणले होते.
जिवंत प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खाण्याची मला सवय होती. ते मांस खायला माझे मन तयार होईना. दोन दिवस मी त्या अन्नाला तोंडही नाही लावले. वाटले, माझा असहकार पाहून मला पुन्हा जंगलात सोडण्यात येईल. पण माझा हा अंदाज साफ खोटा ठरला. मला अखेर माघार घ्यावीच लागली.
हळूहळू मी स्वत:ला बदलण्याचा प्रयत्न केला. नाइलाजाने का होईना, मी तिथे रमण्याचा प्रयत्न करत होतो. पिंजऱ्याच्या समोरच काही झाडे होती. त्या झाडांवर चिवचिव करणाऱ्या चिमण्या, कावकाव करणारे कावळे बसत. काही खारूताई झाडांवरून सरसर धावायच्या.
त्यांच्याकडे पाहून मला त्यांच्या स्वच्छंदी जीवनाचा हेवा वाटू लागला. रोज संध्याकाळी बागेत गर्दी व्हायची. पिंजऱ्यासमोर लहान मुले, मोठी माणसे उभी राह्यची. मी आता प्रदर्शनीय प्राणी झालो होतो. अनेक जण माझ्याकडे बोट दाखवून कुतूहल व्यक्त करायचे. बऱ्याच वेळा मला या सगळ्याचा खूप राग यायचा.
मग मी पिंजऱ्याकडे पाठ करून बसायचो. गुलामगिरीची भावना बंड करून उठायची. पण हाय रे दैवा! आता या जन्मी तरी सुटका नाही. जीव व्याकुळ व्हायचा. मी जेव्हा या प्राणिसंग्रहालयात दाखल झालो, तेव्हाचा एक प्रसंग मला चांगला आठवतोय. त्या दिवशी माझा पिंजरा सजवण्यात आला होता.
मला काही समजेना, हा सारा काय प्रकार आहे? मग हळूहळू अनेक छोटी मुले जमू लागली. काहींनी तर माझे फोटोदेखील काढले. मग कळले की, हे सर्वजण माझ्या नामकरणासाठी जमले आहेत. मग त्यांनी माझे नाव मृगेंद्र' असे ठेवले. माझ्या मनात विचार आला, म्हणजे मी आता 'गुलाम मृगेंद्र सिंह' झालोय.
चला मित्रांनो, आलीया भोगासी असे म्हणून या पिंजऱ्यात राहून तुम्हाला दर्शन देण्यातच जीवनाची इतिकर्तव्यता मानायला शिकले पाहिजे. तुम्ही माणसे-सुद्धा ना, बुद्धीच्या आणि ताकदीच्या साहाय्याने आम्हा वनचरांचा छळ करता. आम्हाला जन्मठेपेची शिक्षा देता. पण खरं सांगा, आमचा गुन्हा काय?
आम्ही जंगलातले प्राणी आहोत. निसर्गात रमणे, हा आमचा स्थायीभाव. असे असताना प्राणिसंग्रहालये तुम्हाला हवीतच कशाला? काय मिळते तुम्हाला असा दुष्टपणा करून? आमचे मुक्तपणे बागडण्याचे वय तुमच्या लक्षातच येत नाही का? आमचा खरा विकास हा जंगलातच होतो,
हे तुम्ही बुद्धिमान असून विसरता कसे? आम्ही मुके जीव म्हणून आमच्यावर असा अन्याय का ? किती स्वार्थी आहेस रे तू माणसा! कृपा करून आमच्यावर आक्रमण करू नका. नाहीतर तोल ढासळून विनाश ओढवेल.
या सृष्टीच्या विनाशात तुझाही विनाश दडलेला आहे. हे मानवा, हे तू विसरू नकोस!हे विधात्या! या मानवाला भूतदया दाखविण्याची सद्बुद्धी दे! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद