सायकलची आत्मकथा मराठी निबंध । Cycle Chi Atmakatha Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण सायकलची आत्मकथा मराठी निबंध बघणार आहोत. वर्तमानपत्र उघडले. आज अर्थसंकल्प सादर झाला होता. पेट्रोलचे भाव वाढलेले. बापरे! म्हणजे आता पर्यायाने सगळ्याचेच भाव वाढणार. दिवसभर सगळीकडे तीच चर्चा. रोज नोकरीसाठी जावेच लागते.
मुलांना शाळेत पाठवायचे म्हणजे रिक्षा किंवा अन्य वाहनव्यवस्था आलीच. बाहेर जायचे, तर वाहन आलेच. महिन्याचा ताळमेळ कोलमडणार. या विचारात मग्न असतानाच अचानक सायकलीची आठवण झाली. तोच सायकल चक्क बोलू लागली.
काय पटले ना, 'जुने ते सोने.' नवीन नवीन शोध लागले आणि स्वत:ला धन्य समजायला लागतात ना! अहो, माझाही शोध कधीतरी नवीन होताच की! माझा जन्म शंभर वर्षांपूर्वी झाला. जेव्हा माझा जन्म झाला, तेव्हा माझे रूप आजच्यासारखे देखणे नव्हते. मी अगदी साधी होते.
दोन लाकडी चाके आणि त्यावर एक फळी, असे माझे रूप होते. पायडल नव्हतंच. मग मी चालत कशी होते? आली ना शंका? अहो, त्या फळीवर माणूस बसायचा नि पायाने रेटत रेटत मला पुढे न्यायचा. मी पुढे जायची; कारण चाकाला वेग यायचा वेग.
मग फळीवर बसणारा माणूस पाय वर उचलून घ्यायचा. वेग कमी झाला, की पुन्हा जमिनीला पाय लावून वेग द्यायचा. अशा वारंवार घडणाऱ्या क्रियेमुळे माणसाचे पाय दुखून यायचे. गरज शोधाची जननी म्हणतात ना, त्याची प्रचीती आली. मानवी मेंदूने पुन्हा विचार करून माझ्यात सुधारणा घडवली.
पायाने सायकल न ढकलता हाताने गती देऊन पुढे ढकलण्याची युक्ती शोधण्यात आली. प्रयोग करता-करता मला पायडल मिळाले. लाकडी चाकावर लोखंडी धावा आल्या. नळ्या भरीव होत्या, त्या पोकळ करण्यात आल्या. पुढचे चाक व मागचे चाक यांचा व्यास भिन्न होता.
पुढचे चाक खूप मोठे होते नि त्यावर बसण्याची सोय होती. लोखंडी धावा जाऊन त्या जागी रबरी धावा बसवण्यात आल्या. पुढे-पुढे अधिक सुधारणा झाल्या. रबरी भरीव धावांची जागा रबरी पोकळ धावांनी घेतली. त्यामुळे मी अगदी हलकी-फुलकी झाले.
मला अधिक वेग आला. माझे लाकडी शरीर पोलादी झाले. पायडल व साखळी यांच्यामुळे गती वाढली. वाटेल तिकडे वळता येण्यासाठी हँडल बसविण्यात आले. सुखासन आले. इशारा देण्यासाठी घंटा बसविण्यात आली. दिवादेखील आला. शरीराला चकचकीत रंग मिळून माझ्या रूपात बदल झाला. मी देखणी दिसू लागले.
मित्रांनो, ही झाली माझी जन्मकहाणी. मानवाच्या सुखासाठी, मानवानेच बनवलेली मी पूर्वी खूप खुश होते. गतिमान जगात मला मानाची जागा मिळाली. घरोघरी मी विराजमान झाले. अगदी पोस्टमनपासून दूधवाल्या भैय्यापर्यंत सगळेच जण माझ्यावर बेहद्द खूश होते.
सगळ्यांची मी अगदी लाडकी बनले. तेव्हा खरे तर रस्त्यावर फारशी गर्दीदेखील नसायची. तरी माझे चालक रुबाबात घंटी वाजवत पुढे जायचे. तेव्हाच्या तरुण मुलीदेखील अगदी नऊवारी साडी नेसून माझ्यावर विराजमान व्हायच्या,
तेव्हा त्यांचा आनंद काही औरच असायचा. कॉलेजमध्ये तरुणदेखील माझ्यावर स्वार होऊन ऐटीत यायचे. मला रेलून उभे राहून त्या मित्र-मैत्रीणींनी मारलेल्या गप्पांची मी साक्षीदार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात मी माझे एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. माझ्यासारखी मीच, अशी माझी धारणा होती. तोच काळाने माझा गर्व उतरवला.
काळाबरोबर गरजा बदलत होत्या. नव्याचे स्वागत होत होते. 'बजाज'मधून नव्या कोऱ्या दुचाकी मोठ्या दिमाखात बाजारात आल्या. माझ्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्यांनी आता त्या दुचाकीला पसंती दिली. माझी जागा त्या पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांनी घेतली. हळूहळू माझी पीछेहाट झाली.
माझा वापर कमी कमी होऊ लागला. ज्यांना परवडत नाही, अशांनी मला नाइलाजाने ठेवून घेतले. तेव्हा मला खूप वाईट वाटायचे. किती कृतघ्न आहेत ही माणसे ! 'गरज सरो नि वैद्य मरो' अशी माझ्या बाबतीत गत झाली.
नव्याचे स्वागत झाले, वापर वाढला; पण कधी प्रदूषणाने रंग दाखवायला सुरुवात केली, हेच लक्षात नाही आले. वेगाच्या हव्यासापायी अपघातांचे प्रमाण वाढले. रस्त्यातील सुरक्षित प्रवास धोक्याचा बनला. महागाईचा भस्मासुरही थैमान घालू लागला. मध्यमवर्गीय जेरीस येऊ लागले.
तेव्हा मनातून सगळ्यांना कळून चुकले होते की, सायकलच चांगली होती. पण कबूल करायचे मात्र जमत नाही. असो. शेवटी मानवी स्वभाव !
मित्रांनो, आज तुम्ही जरी मला धिक्कारलेले असेल, तरी भविष्यकाळात मला स्वीकारण्यावाचून गत्यंतर नसेल. प्रदूषणमुक्त सुखी जीवन जगायची इच्छा असेल, तर माझा पुन्हा स्वीकार करा. मी मोठ्या मनाने तुम्हाला क्षमा करून पुन्हा तुमच्या सेवेसाठी रुजू होईन, चला मी निघते. शांतपणे विचार करा.
'सायकल माझे नाव,
होता मला भाव मागे पडला गाव,
तरीही घेईन पुढे धाव!'
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद