धान्य पिकले नाही तर मराठी निबंध | DHANYA PIKALE NAHI TAR ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण धान्य पिकले नाही तर मराठी निबंध बघणार आहोत. भारत हा कृषिप्रधान देश आहे. आम्हाला आमच्या काळ्या आईचा अभिमान वाटतो. या काळ्या मातीतून पिकणारे मोती म्हणजे आमची दौलतच ! असे असूनही शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ का यावी? शेतकऱ्यांमध्येदेखील दोन प्रकार आहेत.
काही शेतकरी भरपूर एकर जमिनी असलेले बडे शेतकरी आहेत. त्यांना सरकारकडून मिळणाऱ्या साऱ्या सवलती मिळतात. त्यामुळे ते स्वत:चा फायदा करून घेतात. पण त्याउलट काही छोटे शेतकरी आहेत. भाऊबंदकीत शेतीचे तुकडे होतात नि प्रत्येकाच्या वाट्याला थोडी जमीन येते.
वाढत्या प्रपंचामुळे येणाऱ्या धान्यात वर्षभर भागविणे त्यांना कठीण होते. जमिनीचा कस कमी होऊन ती नापीक बनते. पण तशीच ती पडीक ठेवूनही चालत नाही. त्यातून पैशाअभावी नवनवीन प्रयोग करणे, आधुनिक पद्धतीने शेती करणे, अज्ञान या कारणांमुळे त्यांच्या शेतातून म्हणावे तेवढे पीक निघत नाही.
त्यातून पावसाचा लहरीपणा, हे शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजलेले नैसर्गिक कारण आहेच.आता अशा परिस्थितीत माझ्या मनात कल्पना येते. धान्य पिकलेच नाही तर....?
कल्पनासुद्धा किती भयंकर आहे ना? घरात पैसे, सोने-नाणे आहे; पण धान्य नाही. पैसे देऊनही धान्य मिळालेच नाही, तर उपासमारीचीच वेळ येणार. पैसे किंवा सोने खाऊन पोटाची खळगी भरत नाही. बापरे, धान्यच पिकले नाही, तर रोजचे जेवण कसे बनणार?
भाकरी, पोळी, भात, वरण, उसळी हेच तर आपले नित्याचे जेवण. अहो, साधे घरातील धान्य संपले, की लगेच पिशवी व पैसे घेऊन बाजारात जावेच लागते. पण बाजारातही धान्य नाही; कारण धान्य पिकलेच नाही, तर काय करणार?
नुसती फळे, कंदमुळे खाऊन पोट भरण्याची वेळ येईल. पूर्वीचे ऋषि-मुनी कसे जीवन कंठत असत, तशीच वेळ सगळ्यांवर येईल. प्रत्येक शेतकरी आपल्या शेताचे छोटे तुकडे करून शेती करू लागला, तर तो कधीच भरपूर धान्य पिकवू शकणार नाही. पारंपारिक पद्धतीने शेती केली, तर उत्पादन घटत जाणार.
एक वेळ अशी येईल की, शेतकऱ्यांना धान्य पिकविणे शक्यच होणार नाही. अशा वेळी दुष्काळापेक्षादेखील भयंकर परिस्थिती ओढवेल. झाडाचा पाला शिजवून खाण्याची वेळ येईल. मग आपल्या खाण्यात आणि पशुंच्या खाण्यात काही फरकच नाही राहणार.
धान्यापासून बनणाऱ्या सर्व पदार्थांना आपल्याला मुकावेच लागणार. कसली दिवाळी आणि कसला फराळ ? बारा महिने शिमगा करण्याची वेळ येणार. आज मुलांना डब्यात पोळी-भाजी न्यावी लागते; म्हणून ती नाराज असतात.
पण उद्या धान्यच नाही पिकले, तर त्यांना त्या पोळी-भाजीची किंमत कळेल. मग पोळी-भाजीसाठी ती हट्ट करतील. नको रे बाबा! असा विचारसुद्धा नको. वर्षाराणी, तू नियमित ये आणि काळ्या मातीला अन्नब्रह्माचा आशीर्वाद दे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद