एका क्रांतिकारकाचे कहाणी मराठी निबंध | eka krantikarkache kahani marathi essay
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण एका क्रांतिकारकाचे कहाणी मराठी निबंध बघणार आहोत. 'भारत माता की जय', 'वंदे मारतम्' अशा घोषणा देणे ज्या काळात अपराध होता, त्या काळात भारतमातेच्या अनेक सुपुत्रांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.
देशाची गुलामगिरी नाहीशी करून देशाला स्वतंत्र करणाऱ्यांपैकी एक क्रांतिकारक म्हणून माझे नाव अभिमानाने घेतले जाते. खरे तर मला प्रसिद्धी मिळावी, मोठेपणा मिळावा, म्हणून मी हे केलेले नाही. आपल्या मातेचा आदर करणे, तिचा सांभाळ करणे, तिच्यावरील संकट दूर करणे, हे प्रत्येक सुपुत्राचे कर्तव्य आहे. मी माझे कर्तव्य केले.
क्रांती याचा अर्थ बदल. कोणताही बदल कोणीही एका दिवसात अथवा एकटा करू शकत नाही. पण क्रांती करणे वाटते, तेवढे सोपे नाही. त्यासाठी हवी दुर्दम्य इच्छाशक्ती. प्रवाहाबरोबर पोहणे वेगळे आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहणे वेगळे.
मळवाटेने न जाता नवीन वाट शोधणे आणि त्या वाटेवरून चालताना बोचणारे काटे सहन करणे वाटते तितके सोपे नाही. पण मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास कधी ना कधी संपणार असतोच. मग त्याचा मोह कशासाठी ठेवायचा? देशासाठी लढताना मरण येणे फार भाग्याचे.
मी अनेक क्रांतिकारकांपैकी एक. माझे वर्णन 'धगधगती चिता' असे केले जात असे. शिरढोण येथे १८४५ साली माझा जन्म झाला. बळवंत फडके माझे वडील. अनंतराव माझे आजोबा. ते माझे सर्व लाड पुरवत असत. त्यांनी माझ्यासाठी छोटीशी गाडी तयार केली होती नि तिला एक बोकड जुंपला होता.
त्या गाडीत बसून मी ऐटीत आजूबाजूच्या गावांत फिरत असे. बालवयातच मी घोड्यावर बसायला शिकलो; पोहण्यात तरबेज झालो. लाठी फिरवणे, बोथाटी फिरवणे, हेही शिकलो. माझ्यातील धाडस मला स्वस्थ बसू देत नसे.
१८५७ साली मी बारा वर्षांचा होतो, तेव्हा उत्तर भारतात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला. तात्या टोपे, झाशीची राणी, नानासाहेब पेशवे, कुंवरसिंग यांच्याबद्दलची, त्यांच्या पराक्रमाची माहिती माझ्या कानांवर पडू लागली. ती ऐकून माझे रक्त सळसळू लागले;
मन देशप्रेमाने भारले जाऊ लागले. पुण्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांची स्वेदशावरील व्याख्याने मी ऐकली. त्यांतून मला प्रेरणा मिळाली. त्यामुळे मी 'ऐक्यवर्धिनी' नावाची संस्था स्थापन केली. स्वदेशीचे व्रत घेतले. सार्वजनिक काकांबरोबर लहानमोठी कामे करू लागलो.
माझ्याकडून प्रेरणा घेऊन अनेक उत्साही, हिंमत असणारे तरुण माझ्याबरोबर काम करू लागले. माझे मित्रमंडळ वाढू लागले. मी शनिवारवाड्यासमोर अनेक व्याख्याने दिली. स्वातंत्र्याचे काम वाढू लागले. त्यासाठी पैशांची गरज भासू लागली.
आम्ही गावोगाव जायचो आणि तेथील सावकरांकडून पैसे मिळवायचे. जमलेल्या पैशातून सेनेतील बंदुकवाले, तलवारवाले, भालाईत, पटाईत, गोफणवाले, निरोपे, गुप्तचर, जखमा बांधणारे, डोल्या उचलणारे, स्वयंपाकी, लोहार, बैलगाडीवाले अशा नाना लोकांना पगार द्यावा लागायचा. सर्वच जण आपापले काम चोख बजावत असत.
गोऱ्या अधिकाऱ्यांचा जुलूम वाढत चालला होता. त्यांनी अत्याचाराची सीमा ओलांडली होती. माझा संताप वाढत होता. एक दिवस बसून आम्ही एक घोषणापत्र तयार केले आणि सर्व गोऱ्या अधिकाऱ्यांना पाठवले. इंग्रज संतापले. त्यांनी मला पकडून देण्यासाठी चार हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. त्यामुळे मला अनेक संकटांना सामोरे अखेर मला अज्ञातवास पत्करावा लागला.
मित्रांनो, मला वाईट एका गोष्टीचे वाटते. ती गोष्ट म्हणजे फितुरी. छोट्याशा स्वार्थासाठी इंग्रजांना फितूर झालेल्या याच मातेच्या कुपुत्रांना मी कधीच माफ करणार नाही. या मातीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, या मातीशी इमान राखणे. असे न करता थोड्याशा फायद्यासाठी ते इमान विकतात,
याचा रागही येतो नि त्यांची कीवही वाटते. अशाच कोण्या करंट्याने मला पकडून दिले. मी इंग्रजांच्या तावडीत सापडलो. त्यामुळे माझ्या देशकार्याला खीळ पडली. माझ्यावर खटला भरण्यात आला. एवढा धट्टाकट्टा असलेल्या मला क्षयरोगाने घेरले आणि त्यातच शेवटी १८८३ मध्ये मला या मातृभूमीचा निरोप घ्यावा लागला.
पण मित्रांनो, मी पेटवलेली धगधगती चिता स्वातंत्र्य मिळेपर्यंत विझली नाही. यातच माझ्या जीवनाची सार्थकता होती. माझे आजही हेच सांगणे आहे की, आता स्वराज्य मिळाले आहे, त्याचे सुराज्य करा. व्यसनांपासून दूर रहा. 'उद्याचा समर्थ भारत' हेस्वप्न साकारण्याचा प्रयत्न करा. गरुडाकडून भरारी घ्या.
सूर्याकडून तेजघ्या.
पर्वताकडून निश्चय घ्या,
फुलांकडून सुवास घ्या,
काट्यांकडून धार घ्या,
आभाळाकडून विशालता घ्या,
वाऱ्याकडून वेग घ्या,
भारतमातेचे सशक्त सुपुत्र व्हा
आणि तिचे प्राणपणाने रक्षण करा. जयहिंद, भारत-माता की जय! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद