भूकंपावर निबंध मराठी | Essay On Earthquake In Marathi

 भूकंपावर निबंध मराठी | Essay On Earthquake In Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण भूकंपावर मराठी निबंध बघणार आहोत. मानवाने बुद्धीच्या सामर्थ्याने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न चालविला; पण निसर्गापुढे मानव थिटा आहे, हे निसर्गाने अनेक वेळा दाखवून दिले. निसर्ग कोपल्यावर तो कोणाचेच काही ऐकत नाही. 


वादळ, महापूर, त्सुनामी, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींपुढे मानवाला हात टेकावेच लागतात. भूकंप होणार, याची पूर्वकल्पना मिळत नाही. क्षणात जमीन हादरायला लागते. भूकंपाची तीव्रता, त्याचे क्षेत्र किती होते, यावरून विध्वंस किती झाला, हे समजते.


धरतीच्या पोटात असलेला ज्वालामुखी धगधगतो आणि शिलारस वेगाने बाहेर पडतो. जमीन वेगाने हादरते. जमिनीच्या पोटातील लाव्हा बाहेर उसळतो, तेव्हा त्याचा वेग एवढा प्रचंड असतो की, कित्येक किलोमीटरचा भू-प्रदेश उखडला जातो. प्रचंड मोठमोठ्या शिला प्रचंड वेगाने बाहेर फेकल्या जातात.


त्याचबरोबर भूगर्भातील पाणीदेखील बाहेर उसळते. जमिनीला मोठमोठे तडे जातात. जमिनीवरील घरे अगदी पत्त्यांची घरे कोसळावी, तशी कोसळतात. बऱ्याच वेळा घरे, इमारती पार जमिनीत गाडली जातात. कमकुवत कवच असलेला भू-पृष्ठ कायम भूकंपामुळे उद्ध्वस्त होत असतो. वारंवार भूकंपाचा धोका संभवतो.


१९९३ साली किल्लारी येथे भूकंप झाला. त्यापूर्वी कोयनानगर येथे भूकंप झाला. जपानमध्ये तर नेहमीच भूकंप होतो. असा भूकंप केव्हा होणार, हे सांगता येत नाही. त्याची पूर्वसूचना मिळत नाही. अचानक जमिनी हलू लागतात. नेमके काय होते, हे कळण्यापूर्वीच विध्वंस होतो. 


हा विध्वंस महाभयंकर स्वरूपाचा असतो. नेमके आपली माणसे, आपले घर, आपल्या घरातील वस्तू कोठे होत्या, हे देखील समजत नाही. सर्वत्र दगड-गोट्यांचा ढिगारा. पाणी इतके बाहेर उसळते, की पूर आलाय, असे वाटते.


भूकंप म्हणजे दुहेरी संकट. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते होते. विश्वासच बसत नाही, की या जागी सुंदर नगरी वसली होती आणि सुखी कुटुंबे त्यांत राहत होती. तेथे साचलेल्या मलब्यातून बाहेर निघतात, ते माणसांचे मृतदेहच. तेसुद्धा छिन्नविच्छिन्न ! नुसता सगळीकडे हाहा:कार माजतो. 


कुणाची आई, कुणाची बायको, कुणाची बहीण, कुणाची मामी, कुणाची काकू, कुणाची मैत्रीण अशा विविध नात्यांनी जोडली गेलेली स्त्री, अशा अनेक स्त्रिया, अनेक पुरुष भूकंपामुळे जमिनीच्या उदरात गाडले जातात. त्यातून कोणी जिवंत राहिलेच, 


तर त्याने हा विध्वंस डोळ्यांनी पाहिल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडते आणि व्यंग निर्माण होते. प्रचंड उष्णता, धुराळा, मोठा मातीचा लोळ यातून मनुष्य वाचणे अशक्यच असते.भूकंपामुळे जीवितहानी, वित्तहानी होतेच; पण वाचलेले लोक अपंग, वेडे होतात. पुनर्वसन होईलही; पण गेलेले जीव परत कसे येणार? मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद