लोकशाही मराठी निबंध | Essay on Lokshai in Marathi.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोकशाही मराठी निबंध बघणार आहोत. (१) शासन चालविण्याच्या ज्या अनेक पध्दती आहेत, त्यात लोकशाही ही पध्दती सर्वोत्कृष्ट आहे. अब्राहम लिंकनच्या शब्दात सांगायचं तर लोकशाही म्हणजे लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी चालविलेले राज्य.
राजेशाहीमध्ये राजा आपल्या लहरीप्रमाणे राज्यकारभार करतो. हुकूमशाहीमध्ये हुकूमशहा लोकांना वेठीस धरून राज्यकारभार हाकतो, तर लष्करशाहीमध्ये लष्करशहा लष्करी दंडेली करून राष्ट्राचा गाडा हाकतो. यात लोकांची इच्छा, त्यांची मतं, त्यांची सुखदुःखं, सोई गैरसोई अशा गोष्टींना किंमत नसते.
त्यामुळे अशा राज्यपद्धतीमध्ये प्रजा जुलुमाखाली सतत भरडली जात असते. पण लोकशाहीमध्ये तसं नसतं. राजाला प्रजा असते; पण इथे प्रजाच राजा असते. प्रजेला राजा असतो पण इथे राजाच प्रजा असते.लोकशाहीमध्ये कारभार लोकच पहात असल्यामुळे ज्या गोष्टी इतर राज्यसरकारात कः पदार्थ मानल्या जातात, त्या गोष्टी लोकशाहीत बहुमोलाच्या, मौल्यवान मानल्या जातात.
प्रजासत्ताकाचं वैशिष्ट्य म्हणजे, विचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य, लेखनस्वातंत्र्य, मुद्रणस्वातंत्र्य, धर्मस्वातंत्र्य. अशातहेची स्वातंत्र्ये त्याला स्वयंभूपणेच प्राप्त झालेली असतात. त्यामुळे प्रत्येक नागरिक प्रजासत्ताकात अगदी स्वच्छंदपणे, निर्भयपणे, कोणत्याही प्रकारच्या दबावाविना वावरू शकतो.
राजेशाहीमध्ये, 'महाराज, आपण चुकताहात !' असं बोलणाऱ्या माणसाची जीभ छाटली जायची, आज, रस्त्यावरचा यः कश्चित माणूसही, पंतप्रधानांना निर्धास्तपणे म्हणू शकतो, 'महाराज, आपण चुकताहात ! प्रजासत्ताकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे निवडणूक. लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि ते निवडून दिलेले प्रतिनिधीच सरकार चालवतात.
आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत ही जाणीव सतत त्यांना टोचत असल्यामुळे राज्य करताना लोकांच्या इच्छा, लोकांच्या आशा आकांक्षा, त्याचं भलं - बुरं याचा त्यांना विचार करावाच लागतो. निवडून आलेल्या सरकारचं अस्तित्व (आयुष्य) साधारणपणे पांच वर्ष असतं.
तेव्हा आपण लोकांच्या इच्छेला मान दिला नाही तर लोक परत आपल्याला निवडून देणार नाहीत ही भीती सतत त्यांना टोचत असते. पाच वर्ष कशाला, एखादं सरकार सिंहासनस्थ राजाप्रमाणे जुलुमी बनलं, तर लोक त्याला त्याच्या सिंहासनावरून खाली खेचू शकतात.
इंदिराजींचा आणीबाणीचा इतिहास सर्वज्ञातच आहे. इंदिरा गांधी हुकूमशहाप्रमाणे वागू लागल्या तेव्हा लोकांनी त्यांना खाली खेचलं.आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विरोधी पक्ष. सरकारला विरोध करणारं कोणी नसेल तर लोकशाहींच रूपान्तर हुकूमशाहीत होऊ शकतं.
म्हणून विरोधी पक्षप्रमुखाला मुख्यमंत्र्याएवढंच महत्त्व असतं. तसच समानता - लोकशाहीमध्ये उच्च - नीच असं काही नसतं. स्त्री - पुरुष असा भेदाभेदही नसतो. अशा अनेक गोष्टी सांगता येतील. पण याचा अर्थ लोकशाहीत काही दोषच नसतात असं नाही. लोकशाहीची काही पथ्यं आहेत.
आजारी माणसाने जर पथ्यं पाळली नाहीत, काही कुपथ्य केलं, तर तो आजार त्याचा बळीही घेऊ शकतो. तीच गोष्ट लोकशाहीची. पथ्यं पाळली नाहीत तर लोकशाहीही मृत्यूपंथाला लागते. लोकशाहीमध्ये काम व्हायला वेळ लागतो.
अजाण नागरिकांनी स्वातंत्र्याचा अर्थ जर स्वैराचार आणि अत्याचार असा घेतला तरही लोकशाहीच्या नरड्याला नख लागू शकतं. तेव्हा एक इशारा नागरिकांना सतत द्यावा लागतो, 'सावधान ! तोल सांभाळा ! तोल जात नाही ना, याची काळजी घ्या !
अभ्यास : लोकशाहीचं पथ्य : सिनेटचा सभासद
एकदा एक सभासद अमेरिकेच्या सिनेटमध्ये बोलत होता. त्याचे विचार सिनेटमध्ये बसलेल्या कोणालाच आवडत नव्हते. पटत नव्हते. तेव्हा इतर सभासद आरडाओरडा करू लागले. बाकं वाजवू लागले, 'खाली बसा !' 'बस्स' असं म्हणून त्याच्या भाषणात व्यत्यय आणू लागले.
हे पहाताच अध्यक्ष उठले आणि म्हणाले, 'Stop it. I disagree with each and every word that he utters; but I uphold his right to say it' Let him speak (हे चाळे थांबवा. तो जे काही बोलत आहे, त्यातल्या प्रत्येक शब्दाशी मी असहमत आहे. पण त्याचा बोलण्याचा हक्क मी उचलून धरतो, अबाधित आहे असे मानतो. तेव्हा त्याला बोलू द्या !)
ज्या देशातले नागरिक इतके सुबुध्द आहेत, त्या देशातच लोकशाही नांदते. लोकशाहीमध्ये संसदेचे सभासद निर्भय असतात. त्यांना प्रत्यक्ष पंतप्रधानांवरही टीका करण्याचा हक्क असतो. संसदेचा सभासद संसदेत जे बोलतो, त्याच्यावर न्यायालयीन कारवाई करता येत नाही.
कै. इंदिरा गांधी जेव्हा पंतप्रधान होत्या, तेव्हाचा हा किस्सा. कै. जगन्नाथराव जोशी, विद्वान, उत्कृष्ट वक्ता, रा. स्व. संघाचा निष्ठावान स्वयंसेवक, खासदार असताना त्यांनी इंदिरा गांधीना विचारले, की 'नागा बंडखोरांशी काही वाटाघाटी करण्याचा आपला विचार आहे काय ?'
लोकशाही (२)
आज शासनाच्या जेवढ्या म्हणून पध्दती प्रचलित आहेत, त्यात लोकशाही ही पध्दत सर्वोत्कृष्ट आहे. लोकांचं, लोकांनी, लोकांसाठी चालविलेलं राज्य या संदर्भात एक वाक्य लक्षात ठेवायला हवं. The plant of democracy cannot be grown in any type of soil. (जमीन)लोकशाहीचं रोपटं कोठल्याही प्रकारच्या जमिनीत रुजत नाही.
याचाच अर्थ लोकशाहीसाठी राष्ट्रातलं वातावरण लोकशाहीला अनुकूल असायला हवं. युरोप खंडातल्या काही देशातच लोकशाही नीट नांदतेय. आशिया व आफ्रिका खंडात जी लोकशाही आहे, ती लोकशाहीची थट्टा आहे. कारण एकच, त्या राष्ट्रातलं वातावरण (त्या राष्ट्रातली भूमी) लोकशाहीला अनुकूल नाही.
एखाद्या राष्ट्रात लोकशाही राबवायची असेल, तर त्या राष्ट्रातले नागरिक नुसते सधन आणि सुशिक्षित असून भागत नाही, तर ते सुसंस्कृत हवेत. नागरिकांना स्वतःचे हक्क आणि स्वतःचं कर्तव्य यांची चांगली जाण असावी लागते.
नागरिकांना सामाजिक बांधिलकीचं भान असायला हंव. लोकशाहीमध्ये लोक स्वतःसाठीच जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगणारे हवेत. मला केवळ माझंच हित पहायचं नाहीये, तर इतरांचं हितही पहायचयं. त्यासाठी पुष्कळ वेळा आपल्या आवडी-निवडीला मुरड घालावी लागते.
दुसऱ्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागतो. अशी यादी करायची म्हटली, तर ती मारुतीच्या वाढत जाणाऱ्या शेपटाएवढी होईल.जे लोकांचे प्रतिनिधी म्हणून लोकांचं शासन चालवतात, त्यांनी तर अधिक जागरूक असायला हवं. ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्यांचं हित जर मी करणार नसेन तर निवडून यायला मी पात्र नाही.
मग मला कितीही मतं मिळोत, ही जाणीव सतत त्याच्या मनात असली पाहिजे. शिक्षण, शिस्त आणि शील ही त्रयी त्याच्या अंगी असली पाहिजे. 'मी साधा सातवीपर्यंत शिकलेला माणूस आहे. पण झालो की नाही मुख्यमंत्री' अशी शेखी मिरवणारी माणसं ज्या देशात आहेत, त्या देशात लोकशाही रुजणार नाही.
मी केलेले कायदे मी पाळलेच पाहिजेत. Law means law; even for brother - in - law - (मेव्हणा). मी लाल दिव्याच्या गाडीतून फिरतो, तेव्हा वाहतुकीचे नियम मी पाळले नाहीत तरी चालेल, अशी धारणा असलेले लोक ज्या देशात आहेत, त्या देशात लोकशाही राबणार नाही.
केवळ निवडणूक जिंकायच्या हेतूने चारित्र्यहीन माणसाला ज्या देशात निवडणुकीला उभं केलं जातं, त्या देशात लोकशाही टिकणार नाही.सत्ता मिळवून देणारी एक शिडी म्हणून जर लोकशाहीचा उपयोग केला तर Democracy ceases to be a democracy - it becomes a mobocracy - लोकशाहीचं रूपांतर झुंडशाहीत होतं.
म्हणून आजारी माणसाला जशी काही पथ्यं पाळावी लागतात, तशी लोकशाहीला सुद्धा कडक पथ्ये पाळावी लागतात. ती पथ्ये पाळली नाहीत तर लोकशाहीचं रोपटं एक विषवृक्ष बनेल आणि राष्ट्राची उन्नती, नागरिकांची समृद्धी तर राहोच, ही लोकशाही राष्ट्राच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल.
लोकशाही - पानपूरके अब्राहम लिंकन अमेरिकन यादवी युध्दात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना गटेनबर्ग येथे श्रध्दांजली वाहत होता. बोलता बोलता अगदी उत्स्फूर्तपणे, लोकशाहीची व्याख्या त्याच्या तोंडून बाहेर पडली. - A Government of the people, for the people and by the people will never perish - आणि ती जगन्मान्य झाली.
आपल्या भाषणाचा शेवट करताना अब्राहम लिंकन म्हणाला होता. What we say here will be forgotten; but what they did here will ever be remembered.' काय योगायोग पहा. अगदी उलट झालं. जे लिंकन बोलला ते सर्वांच्या लक्षात राहिलं, आणि धारातीर्थी पडलेल्या त्या शूर सैनिकांनी जे केलं ते खुद्द अमेरिकेत तरी कोणाला माहिती असेल की नाही, कोण जाणे.
by चा अर्थ जर buy the people असा घेतला, of the people याचा अर्थ जर off the people आणि far the people असा घेतला, तर लोकशाहीची झुंडशाही होते. ज्या लोकांना लोक निवडून देतात, त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे.
माझ्या कामगिरीबद्दल लोकसभेत (Parliament) प्रश्न विचारला जाणार आहे, असं कळल्यास त्या सभासदाच्या उरात धस्स झालं पाहिजे. तो घाबरला धास्तावला पाहिजे. इंग्लंडच्या इतिहासातला एक प्रसंग.
एकदा एके ठिकाणी पहारा देणाऱ्या पहारेकऱ्याने दाढी वाढवली. त्याच्या वरिष्ठाला ते आवडलं नाही. तो त्या पहारेकऱ्याला म्हणाला, 'तू दाढी काढ ! पहारेकऱ्याने उत्तर दिले, 'नाही. दाढी वाढवावी की वाढवू नये हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.
आज जर मला दाढी वाढवावी अस वाटलं तर ती वाढवणं माझा अधिकार आहे. हो, माझ्या कामात मी चुकारपणा केला तर तू सांगशील ते मी ऐकीन.' त्या पहारेकऱ्याचं हे उत्तर त्याच्या वरिष्ठाला आवडलं नाही. त्याने त्या पहारेकऱ्याला निलंबित केले.
त्या पहारेकऱ्याने एक पार्लमेंटचा सभासद गाठला आणि त्याला सांगितलं की 'तू एक प्रश्न पार्लमेंटमध्ये विचार, दाढी राखली म्हणून एखाद्याला निलंबित करता येते काय ?' माझ्या कारभारावर पार्लमेंटमध्ये प्रश्न विचारला जाणार आहे, हे कळल्याबरोबर तो वरिष्ठ घाबरला.
त्याने ताबडतोब पहारेकऱ्याचे निलंबन रहित केलं. आणि पहारेकऱ्याला त्याने सांगितले, 'उद्यापासून तू मागच्या बाजूला काम कर, दर्शनभागी नको.'लोकसभेचे सभासद जेव्हा असे घाबरतात, तेव्हाच लोकशाही टिकते.
संसदेचे सभासद जर प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेणार असतील, तर लोकशाहीची तिरडी बांधण्याची वेळ आलीय असे समजावे. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद