ग्राहक राजा जागा हो मराठी निबंध | Grahak Raja Jaga Ho Essay In Marathi

 ग्राहक राजा जागा हो मराठी निबंध | Grahak Raja Jaga Ho Essay In Marathi


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण ग्राहक राजा जागा हो मराठी निबंध बघणार आहोत. जगातील प्रत्येक मनुष्य हा ग्राहक असतो. ग्राहक हा सगळ्यात मोठा वर्ग आहे. ग्राहकाच्या बऱ्याच अडचणी असतात. मालात भेसळ असते, वजनात गडबड असते, खोटी लेबले असतात. अशा पद्धतीने ग्राहकाची फसवणूक केली जाते. 


त्यासाठी त्याला काही हक्क देण्यात आले आहेत. त्यामुळे तो संघटित, संरक्षित बनू शकतो. म्हणनूच ग्राहकवर्गासाठी सर्वव्यापी व सर्वलक्षी ग्राहक संरक्षण कायदा' करण्यात आला आहे. हा कायदा ग्राहकांसाठी मोठे वरदान आहे. हा कायदा अगदी सुलभ आणि सोपा आहे. 


त्याचे कोणतेही कलम व त्याचा अर्थ लावण्यासाठी तज्ज्ञाची गरज नाही. सोपी मांडणी, मोठी व्याप्ती व ग्राहकांच्या हिताचे व त्यांचे हक्क व अधिकार यांची सर्वार्थाने जपणूक करणारा असा हा कायदा आहे. 


व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ लागली, अधिक नफा मिळविण्यासाठी लबाडी करण्यात येऊ लागली; म्हणून या कायद्याची निकड भासली.ग्राहक चळवळीची सुरुवात प्रथम अमेरिकेत १९६२ साली झाली. 


आपण कोणती वस्तू घेतोय, ती योग्य दरात घेतोय का, त्या वस्तूचा दर्जा कसा आहे, हे समजण्यासाठी न्यायालयीन स्तरावर न जाता ही माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी ही ग्राहक चळवळ सुरू झाली. 


'ग्राहक चळवळ' म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेस योग्य दिशा दाखविण्यासाठी ग्राहकांची, ग्राहकांसाठी, ग्राहकांनी चालविलेली चळवळ. 'ग्राहक चळवळ' म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण आणि संवर्धन, तसेच विविध तक्रारींचे सुलभतेने व विनाविलंब आणि अत्यल्प खर्चात निवारण करणारी संस्था. ग्राहकांच्या या गरजेतूनच 'ग्राहक संरक्षण कायदा' करण्यात आला.


२६ डिसेंबर १९८६ रोजी ग्राहक संरक्षण कायदा लोकसभेने संमत केला; म्हणून हा दिवस 'राष्ट्रीय ग्राहकदिन' म्हणून साजरा केला जातो; तर १५ मार्च हा दिवस 'जागतिक ग्राहकदिन' म्हणून ओळखला जातो. ग्राहक कायदा समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचलेला नाही. 


त्यासाठी राज्य व केंद्र सरकारवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य व केंद्र पातळीवर 'ग्राहक संरक्षण मंडळे' स्थापन करण्यात आली व जिल्हा पातळीवर 'ग्राहक संरक्षण कक्ष' स्थापन करण्यात आला आहे.


ग्राहकांसाठी कायदा झाला खरा; पण तो समाजापर्यंत पोहोचला नसल्याने ग्राहक त्याचा फायदा करून घेत नाहीत. आज प्रचार-प्रसार माध्यमातून ग्राहक चळवळ सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे. नवरात्र महोत्सवाच्या वेळी वरईचेपीठ खाल्ल्याने अनेकांना विषबाधा झाली. 


कृत्रिम खव्यातूनही मोठ्या प्रमाणावर विषबाधा होते. अन्नातील भेसळ तर सर्रास होत असते. भाजीपाल्याबाबतही भेसळ होतेच. कृत्रिम रंग, रसायने यांचा उपयोग करून भेसळ केली जाते. व्यापारी मंडळी ग्राहकहिताचा विचार न करता केवळ स्वत:च्या फायद्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळत असतील, तर त्यांना धडा शिकविलाच पाहिजे.


समाजातील तरुण पिढीने ह्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी सतत अभ्यास करून समाजातील सर्व थरांत जाऊन, त्यांचे अनुभव गोळा करून त्यांना ग्राहकहिताची दिशा दिल्यास कायद्याचा विधायक प्रचार झाल्याशिवाय राहणार नाही. 


म्हणूनच कायदा ग्राहकांना जागृतीचा आवाज देत आहे आणि सांगत आहे, 'ग्राहकराजा जागा हो.' मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद