ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi

 ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध बघणार आहोत.

"ग्रंथ माझा कल्पतरू 

ज्ञानाचा महामेरू तरूनि नेई

भवसागरू सकल जीवनाचा आधारू

असा ग्रंथ माझा गुरू" 

'ग्रंथ' हा शब्द उच्चारताच नकळत माझ्या शब्दांची अशी गुंफण होते.आपल्या वाईट परिस्थितीत आपली सोबत न सोडणारा, आपल्याला जीवनाचा खरा मार्ग दाखविणारा ग्रंथ हा एकमेव सोबती आहे. ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामाची गाथा, भगवद्गीता हे ग्रंथ म्हणजे आपल्या जीवनाचे दीपस्तंभ आहेत. 


ग्रंथ आपल्याशी हितगुज करतात.ग्रंथ भेदभाव करत नाहीत.ग्रंथाना काळाची बंधने नाहीत. ग्रंथवाचनाने माणूस बहुश्रुत होतो. त्याचे व्यक्तिमत्त्व समृध्द होते.अडचणीवर मात करण्याची कला ग्रंथातून शिकायला मिळते. माणूस चिंतनशील बनतो. 


ठराविक चाकोरीबाहेरचे जग, वेगवेगळे अनुभव यांची जाणीव ग्रंथ करून देतात.मनोरंजनाबरोबर ज्ञान प्रदान करतात.टॉलस्टॉयच्या नाना प्रयोगांची ओळख बापूंनां ग्रंथातून झाली. मॅझिनीच्या चरित्रातून सावरकरांना देशभक्तीचे बाळकडू मिळाले.


“पुस्तकं नसलेलं घर खिडक्या नसलेल्या खोलीप्रमाणे असतं'' अस प्रसिद्ध विचारवंत जॉन रस्किन यांनी म्हटले आहेच.डॉ.आंबेडकरांचे ग्रंथप्रेम विश्वविख्यात होते. 'समाजाने बहिष्कृत केलेल्या माझ्यासारख्याला या थोर ग्रंथांनीच जवळ केले. 


मला जगात त्यांच्याइतका परमस्नेही दुसरा कोणीही नाही' या त्यांच्या शब्दातून त्यांचे ग्रंथप्रेम व्यक्त होते. त्यांच्या 'राजगृह' या ग्रंथालयात बावीस हजार ग्रंथ होते."जीवनाच्या अभ्यासातूनच ग्रंथ निर्माण होतात" असे साने गुरूजी म्हणत 'शारदा', 'इंदू काळे', 'सरला भोळे', तसेच 'एकच प्याला' यासारख्या समस्याप्रधान ग्रंथांनी सामाजिक समस्या मांडल्या त्यांची उकल करण्याची दृष्टी आपल्याला दिली. 


'अपूर्वाई', 'पूर्वरंग' हे पु.ल.देशपांडे यांचे ग्रंथ तसेच काकासाहेब कालेकर व गंगाधर ग्रंथाविषयी लिहितांना हैद्राबादच्या उदार ग्रंथदात्याचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. त्यांचं नाव 'शामराज बहादुर' त्यांचे ग्रंथप्रेम जगावेगळे होतं. अगदी पदरमोड करून अनेक ग्रंथाचा संग्रह त्यांनी केला होता. 


किती ग्रंथ विकत घ्यायचे, याला बंधन नव्हतं तसंच कोणत्या विषयांचे ग्रंथ घ्यायचे यालाही बंधन नव्हंत.शिसवी आलमाऱ्यासंह हा प्रंचड ग्रंथसंग्रह त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला दिला.आपल्या व्यक्तिगत संग्रहापेक्षा विद्यापीठासारख्या ज्ञानतीर्थात याचा अधिक उपयोग होईल हे जाणून 'असं ही एक दातृत्व त्यांनी समाजापुढे ठेवले.


ग्रंथ जीवन घडवितात, फुलवितात, सुगंधित करतात. हा कस्तुरी सुगंधाचा मधुघट जीवनात ज्ञान, संस्कार , खरी समृद्धी यांची गोडी निर्माण करतो हेच खरे! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . पुढील दुसरा निबंध वाचण्यास विसरू नका धन्‍यवाद


निबंध  2


ग्रंथ हेच गुरु मराठी निबंध | Granth hech guru Essay in Marathi


जो जो जयाचा घेतला गुण।

 तो तो गुरू म्यां केला जाण। 

गुरूसी आले आपरपण। 

जग संपूर्ण गुरू दिसे।"


 चराचरसृष्टीत गुरूतत्त्व ओतप्रोत भरलेले आहे असा संतांचा अनुभव. माता, पिता, शिक्षक, निसर्ग, जीवनातील चांगलेवाईट अनुभव, छोटेमोठे प्रसंग, सभोवताली वावरणाऱ्या व्यक्ती अगदी क्षुद्रातिशूद्र जीवजंतू या सर्वांपासून आम्ही सतत काही ना काही शिकत असतो. 


त्यामुळे ते आमचे गुरूच आहेत. आपापल्या परीने ते श्रेष्ठच आहेत. या समस्त गुरूंमध्ये मुकुटमणी, कंठमणी आणि मेरुमणी जर कोणता असेल तर तो म्हणजे ग्रंथ. श्री समर्थांनी 'आता सद्गुरू वर्णवना' अशा शब्दात गुरूस्तवनाला प्रारंभ केला आहे. ग्रंथांनाही हे वर्णन अगदी तंतोतंत लागू पडतं. 


विशेष म्हणजे ते एकाही गुणाची परीक्षा घेत नाहीत, एका बोटाची चापट मारत नाहीत की एका शब्दाने कोणाला दुखवीत नाहीत. आई, वडील, शिक्षक यांना. स्थलकालाच्या मर्यादा असतात. कार्यबाहुल्यामुळे त्यांचं मार्गदर्शक सदासर्वकाळ लाभ शकत नाही. शिवाय प्रत्येकाला प्रत्येक विषयाचं ज्ञान असलेच असेही नाही. ग्रंथगुरू मात्र सर्वज्ञ. ज्ञानामृताचे अक्षयकुंभ घेऊन दिवसरात्र आपली ज्ञानतृषा शमविणारे केवळ ग्रंथ आणि ग्रंथच आहेत. 


थकवा, कंटाळा, विश्रांती त्यांना माहीत नाही. कवडीचीही अपेक्षा न करता ज्ञानाची भूक भागविणाऱ्या ग्रंथांच्या दातृत्वाला तोड नाही. खरं पाहिलं तर देणे आणि घेणे हे हातांचं काम. परंतु ग्रंथांजवळ घेणारे हात नाहीतच. ते अनंत हस्ताने देत राहतात, देतच राहतात.


वाचनं ज्ञानदं बाल्ये तारुण्ये शीलरक्षकम्।

 वार्धक दुःखहरणं हितं सद्ग्रंथवाचनम्।।


असं सुभाषितकारांचं सांगणं आहे. बालपणी ग्रंथ ज्ञान देतात, तरूणपणी चारित्र्यसंवर्धन करतात तर वृद्धपणीच्या सर्व दुःखांवर रामबाण औषध म्हणजे ग्रंथवाचन. तेव्हा हे मानवा, ‘लाख दुखोंपे एक दवा है, गुन आजमा ले'. डॉ. आंबेडकर, '२४ तास अध्ययन करणारे प्रोफेसर' (अर्थात डॉ. राधाकृष्णन्) सदैव ग्रंथांच्या सहवासात राहायचे. 


थोरो म्हणतो, “जुना कोट घाला पण नवे पुस्तक विकत घ्या.” लोकमान्य टिळक तर नरकातही ग्रंथांचं आनंदाने स्वागत करण्यास तयार आहेत. (ग्रंथांच्या पवित्र सहवासात राहिल्यावर त्यांना नरकात पाठविण्याची चित्रगुप्ताची काय बिशाद आहे?) ग्रंथांचे उपासक कायम स्वर्गसुखाचा अनुभव घेत असतात, 'राजा जाय जया स्थला, तीच होते राजधानी' त्याप्रमाणे 'ग्रंथ राही जया स्थला, तोच खरा स्वर्ग जाणा.'


ग्रंथ स्वतः चिरंजीव असतात आणि ते ग्रंथकारालाही चिरंजीवित्व बहाल करतात. ग्रंथाच्या उपासकांना विषादाकडून प्रसादाकडे नेतात. ग्रंथांचा महिमा वर्णन करताना वाचाळही (शब्दप्रभूसुद्धा) मूक होतात. माया लज्जायमान होते. ग्रंथ हे अज्ञानाच्या तिमिरातील दीपस्तंभ आहेत. 


ज्याला भवसागरातून सुखेनैव तरून जायाचे असेल त्याने ग्रंथांची कास धरावी. ज्ञानरूपी दुग्ध देऊन सकल कामना तृप्त करणारे ग्रंथ म्हणजे भूतलावरील कामधेनूच! सर्व चिंता निवारण करण्याचं चिंतामणीचं सामर्थ्यही ग्रंथांमध्ये आहे. कल्पवृक्षाखाली बसल्यावर शुभ कल्पनांबरोबर अशुभ कल्पनाही फलद्रूप होतात. ग्रंथरूपी कल्पतरूच्या तळवटी बसलेल्या भाग्यवंताने तशी भीती बाळगण्याचे कारण नाही. त्याच्या जवळपास अशुभ कल्पना फिरकतही नाहीत.


ऋषिमुनींनी, महाकवींनी, संतसज्जनांनी भगीरथ प्रयत्नांनी पृथ्वितलावर आणलेली ही ज्ञानगंगा! तिच्या तीरावर बसून कोरडं राहण्याचा करंटेपणा करू नये. तिला मनोमन वंदन करून तिच्या कुशीत शिरावं. तिच्या निर्मळ विचारधारेत सचैल स्थान करून पावन होऊन जावं. ग्रंथांकडून मिळालेलं विचारधन जतन करावं.


त्यानुसार आचरण करावं, शक्य असल्यास इतरांनाही सन्मार्गाला लावावलं याहून उत्तम गुरूदक्षिणा कोणती असणार? आणि ग्रंथगुरूंनाही याहून दुसरे काय हवे आहे? त्या सर्वश्रेष्ठ गुरूवर्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणिपात!


नसे कोपणे, कठोर शिक्षा, नाही विश्रांती ज्ञानकुंभ हे अक्षय अविरत ज्ञानामृत देती नको दक्षिणा, नको वंदना, नको सुमनहार ग्रंथासम गुरू त्र्यैलोक्यी या कोठे मिळणार?  मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद