हत्तींची नदीतील जलक्रीडा मराठी निबंध | HATTICHI NADITIL JALKRIDA MARATHI NIBANDH
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण हत्तींची नदीतील जलक्रीडा मराठी निबंध बघणार आहोत. मला पर्यटनाचा छंदच आहे. अर्थात हा छंद मला माझ्या आई-बाबांमुळे लागला. त्यांना आपला सगळा देश पाहून झाल्यावर विदेश बघण्याची इच्छा आहे.
नुकतेच आम्ही दिवाळीच्या सुटीत श्रीलंका येथे गेलो होतो. श्रीलंकेतील कँडी या शहरात आम्ही गेलो. कँडी हे शहर महाओया नदीकाठी वसलेले. तेथे आम्हाला काय-काय बघायचे आहे, हे सांगितले गेले. हत्तींचे अनाथालय पहायचे, हे ऐकल्यावर मला आश्चर्यच वाटले. हत्तींसाठीसुद्धा अनाथालय असते?
हत्ती हा कळपाने राहणारा प्राणी. मुख्य म्हणजे हा शाकाहारी प्राणी आहे. प्रचंड देहयष्टी असल्याने त्याला खायलादेखील खूप लागते. प्राणी नैसर्गिक वातावरणात उत्तम वाढतात. त्यांना कोणीतरी सांभाळावे का लागते? माझ्यापुढे अनेक प्रश्न उभे राहिले.
बाबा म्हणाले, “तू आधी जे दाखवणार आहेत, ते नीट लक्षपूर्वक पहा म्हणजे काही प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील. काही प्रश्नांची उत्तरे तेथे गेल्यावर विचारू.” आम्ही सकाळी पिन्नेवाला हत्तीच्या अनाथालयाला भेट देण्यासाठी निघालो. खूप हत्ती तेथील नदीत जलक्रीडा करीत होते. त्यात अगदी छोटी-छोटी पिल्ले-देखील होती. काही हत्तिणी होत्या.
या साऱ्या हत्तींना जलक्रीडा करताना पाहून खूप गंमत वाटत होती. सोंडेत पाणी घेऊन, सोंड आकाशाच्या दिशेला उंचावून त्यातून ते पाण्याचे फवारे सोडत होते. काही हत्ती तर पाय वाकवून नदीत चक्क डुंबत होते. हत्तींची लहान पिल्ले पाण्याच्या पातळीपर्यंत आत बुडून जात होती;
पण तरीही ती सोंड उंचावून आणि पुढील पाय वर करून हुंदडत होती. सगळेच हत्ती एकमेकांच्या अंगावर सोंडेने पाणी उडवीत होते. ही क्रिया करताना ते पाण्यात स्वत:भोवती गोलाकार फिरत होते. हत्तींचा माहूत त्यांच्या अंगावर बादल्या भरभरून पाणी फेकत होता. त्याचाही ते हत्ती आनंद लुटत होते.
साधारणपणे दोन तास त्यांची जलक्रीडा सुरू होती. अगदी मुक्तपणे ते पाण्यात खेळत होते.माहुताने विशिष्ट आवाज काढून त्यांना सूचना दिली जशी घंटा झाल्यावर मुले असतील तेथून वर्गाकडे पळतात ना तशी ! हत्तींची पाण्यातून बाहेर पडण्याची लगबग सुरू झाली.
जलक्रीडा केल्यामुळे हत्ती खूपच उत्साही दिसत होते. सर्व एकापाठोपाठ एक असे अगदी शिस्तीत निघून त्यांच्या निवासस्थानाकडे परतले. हत्तींना जलक्रीडा आवडते, याची त्या दृश्यामुळे खात्री पटली. आत्ता हत्ती काय करताहेत, हे पाहण्यासाठी गेलो. तेथील हत्तींच्या पिल्लांना बाटलीतून दूध पाजले जाते.
हत्तीच्या एका पायात साखळदंड बांधतात. दुधाची बाटली सोंडेपर्यंत येईपर्यंत त्यांची सोंडेची आणि पायांची हालचाल म्हणजे लयबद्ध नृत्यच असते. एक लीटरच्या ४५ बाटल्या दूध एका हत्तीला लागते.प्राण्यांची दुनिया कशी असते, हे जवळून पाहता आले. पाण्याचे आकर्षण सर्वच प्राणिमात्रांना असते, हेच खरे ! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद