आरोग्य हीच संपत्ती मराठी निबंध | Health is wealth Essay In Marath
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आरोग्य हीच संपत्ती मराठी निबंध बघणार आहोत. 'शरीरमाद्य खलु धर्मसाधनम्।” आपले शरीर धर्मकारणासाठी वापरणारी आमची संस्कृती आहे. धर्म म्हणजे अर्थात् विद्यार्थी-धर्म. विद्यार्थी-धर्म साध्य करण्यासाठी शरीराचा साधन म्हणून वापर केला पाहिजे.
भारतीय संस्कृतीने 'धृ धारयते इति धर्मः।' अशी धर्माची व्याख्या केली आहे. पाश्चात्य संस्कृती सांगते Health is Wealth.' म्हणजे निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. मग या संपत्तीचा उपयोग उत्तम माणूस घडविण्यसाठी झाला पाहिजे.
शरीर सुदृढ, उत्तम असेल, तरच कार्यकुशलता वाढेल. कोणतेही काम करण्यासाठी शरीर हे साधन आहे. साधन सुदृढ असेल, तरच कार्य उत्तम घडणार. कार्य उत्तम घडेल, तर आनंद मिळणार.
माणूस आनंदी असेल, तरच त्याचा खेळकरपणा वाढीस लागेल आणि काम करण्यातला उत्साह वाढेल.खेळकर, उत्साही व्यक्ती नेहमीच इतरांना आकर्षित करते. म्हणजेच व्यक्तिमत्त्व आकर्षक बनवायचे असेल, तर शरीर सुदृढ हवे.
बऱ्याच वेळा आपल्याला आयुष्यात खूप काही करण्याची इच्छा असते; पण शरीर साथ देत नाही. आजारी किंवा रोगी, अशक्त माणूस काहीच करू शकत नाही. त्यातूनच त्याच्यात नकारात्मक भावना जन्म घेते. सेवाभाव व मदत करण्याची वृत्ती निर्माण केव्हा होईल? अर्थातच शरीरसंपदा उत्तम असेल, तरच. मी हे करू शकतो, हा आत्मविश्वास तेव्हाच निर्माण होईल.
जर यशाची सर्व दालने तुमच्यासाठी खुली व्हावीत असे वाटत असेल, जर आरोग्यसंपन्न व्हायचे असेल, तर शरीरसंपदा व्यवस्थित सांभाळली पाहिजे.सुदृढ शरीर ही संपदा केव्हा ठरेल? तर त्या शरीराच्या सुदृढतेसाठी सकाळी लवकर उठले पाहिजे आणि मोकळ्या स्वच्छ हवेत फिरले पाहिजे.
'लवकर निजे लवकर उठे, त्याला आरोग्य भेटे.' रात्री लवकर झोपलात, तर पहाटे लवकर जाग येईल. लवकर उठल्याशिवाय संपूर्ण वेळेचे नियोजन उत्तम प्रकारे करता येणार नाही. लवकर उठून खालील श्लोक म्हणून सूर्यनमस्कार घातले पाहिजेत
“आदित्यस्य नमस्कारान् । ये कुर्वति दिने दिने।
जन्मांतर शतायुष्यम्।
दारिद्र्यं नोपजायते।
योगासने केल्याने शरीराला व्यायाम होईल. खेळले पाहिजे, वेळेवर अभ्यास केला पाहिजे; तसेच खाण्या-पिण्याच्या सवयीदेखील चांगल्या असल्या पाहिजेत. चौरस आहार, फळे, पालेभाज्या यांचा आहारात समावेश हवा. व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
कोणतीही जबाबदारी पेलण्यासाठी आजची युवापिढी सुदृढ असली पाहिजे. सुदृढ शरीरातच सुदृढ मन वास करते; म्हणून व्यायाम, आहार यांबाबत नियमितता राखा. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद