हिमालय नसता तर मराठी निबंध | HIMALAY NASTA TAR ESSAY IN MARATHI

 हिमालय नसता तर  मराठी निबंध | HIMALAY NASTA TAR ESSAY IN MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण  हिमालय नसता तर मराठी निबंध बघणार आहोत. आपल्याकडे जेव्हा एखादी गोष्ट असते ना, तेव्हा आपल्याला त्याची किंमत नसते. थोडक्यात सांगायचे झाले तर ‘अतिपरिचयात अवज्ञा? अशी गत. आपला भारत देश फार समृद्ध आहे. 


निसर्गाचा वरदहस्त लाभलेला, विविधतेने नटलेला असा हा भारत. भारतमातेच्या मुकुटाची उपमा ज्याला दिली जाते, तो हिमालय. जगात उंच पर्वत म्हणून ज्याची गणना होते, तो हिमालय. ऋषितुल्य मंडळी, देवदेवतांची वस्ती ज्याच्यावर आहे, असा तो पर्वत. 


हा पर्वत म्हणजे भारतीय संस्कृतीचा जन्मदाता ! भारताचा मानदंड ! युगानुयुगे अविचल उभा असलेला हा पर्वत एखाद्या योग्यासारखा आहे. डोक्यावर थंड बर्फ ठेवून तसाच शांत, निश्चल उभा असलेला हा हिमालय. एवरेस्ट, कांचनगंगा, नंदादेवी अशी अत्युच्च शिखरे असलेला हा पर्वत. 


ही शिखरे सर करण्यासाठी केवळ धाडसच हवे. हे धाडस दाखविणारे शेर्पा तेनसिंग व एडमंड हिलरी आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो. हिमालयाची पौरोणिक ख्याती फार महान आहे. आर्यांचे आद्य स्थान. प्राचीन ऋषि-मुनींनी याच्याच कुशीत बसून तपश्चर्या केली होती. 


रघुवंशातील अनेक राजांनी याच पर्वतावर वास केला होता. वेदव्यासांनी याच्याच साक्षीने महाभारताची रचना केली. चंद्रगुप्ताने राष्ट्रोद्धाराचा विचार केला, तो याच हिमालयावर. पांडवांचे स्वर्गारोहण, १८५७ उठावातील क्रांतिकाकांचे आश्रयस्थान म्हणजेच हिमालय. अनेक महान नद्याचा उगम ह्याच पर्वतातून झाला आहे. 


भगीरथाने अथक परिश्रम करून गंगा मस्तकावर झेलली, ती याच्याच साक्षीने. अनेक औषधी वनस्पती, वृक्ष यांचा जन्मदाता. सिमला, मसूरी, नैनिताल, दार्जिलिंग अशी थंड हवेची ठिकाणे याच्याच कुशीत विसावलेली.


अशा हा महान हिमालय पर्वतच नसता तर... खरंच विचार करून बघा. हा पर्वत नसता, तर आम्हा भारतीयांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवलाच गेला नसता. थंड वारे अडवून साऱ्या देशाचे रक्षण करणारा हा रक्षणकर्ताच नसता, तर आज जी भौगोलिक रचना आहे, जे भौगोलिक वातावरण आहे, ते अस्तित्वातच नसते. 


हा हिमालय एखाद्या बलशाली योध्याप्रमाणे भारताच्या उत्तर सीमेचे रक्षण करतोय. अशी ही निसर्गदत्त उत्तरसीमा नसती, तर शत्रूनी धुमाकूळ घातला असता. अशी ही उत्तुंग आमुची उत्तर सीमा नसती तर... भारतावर आधीच अनेक आक्रमणे झाली. 


अनेकांनी देशात लूटमार केली, धुमाकूळ घातला. हिमालयामुळे त्याला आळा बसला; अन्यथा आजच्या समृद्ध भारताचे चित्रच भेसूर दिसले असते. चीन, पाकिस्तान हे आपले शेजारी देश. त्यांनीदेखील आपल्या देशावर आक्रमण केलेच. पण आमच्या ह्या हिमालयातील शूर पुत्रांनी त्यांना बिनतोड उत्तर दिले. 


पर्वतकुशीत राहणारे नेहमीच शूर व काटक असतात. त्यांच्या शौर्याचा फायदा देशाला नेहमीच होतो. हिमालय नसता, तर देशाचे संरक्षण कसे झाले असते? प्राचीन समृद्धी, प्राचीन संस्कृती, प्राचीन परंपरा या देशाच्या वाट्याला आल्याच नसत्या. बारमाही वाहणाऱ्या नद्या ही हिमालयाचीच देणगी. त्यामुळे भारताचा उत्तरी भाग सुजलाम्-सुफलाम्, सश्य शामल झालाच नसता. 


गंगेसारखी पवित्र नदी म्हणजेच लोकमाता आम्हाला मिळाली नसती. भीष्मासारखे, भगीरथासारखे पुत्र निपजले नसते. पवित्र तीर्थक्षेत्रे अस्तित्वात आली नसती. तपश्चर्येचे पुण्य भाग्यात आले नसते. बर्फाच्या शीतलतेत साऱ्या चिंता शमून जाण्याचे सामर्थ्य आहे.


एवढा संपन्न, समृद्ध असा हिमालय, की ज्यापुढे कुबेराचे वैभवदेखील फिके पडेल. कोणालाही आश्रय देण्यास सिद्ध असलेला हा हिमालय सदैव सर्वांची सेवा करतो; सहायता करतो. हिमालय आमचा आहे. 



आमचाच राहील नि तो सदैव त्याच्याकडील ऐश्वर्य, वैभव सतत वितरित करील. तेव्हा मनात शंका नको की विकल्प नको- हिमालय नसता तरचा! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद