जाहिरातींच्या विळख्यात मराठी निबंध | Jahiratinchya vilkhyat essay in marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जाहिरातींच्या विळख्यात मराठी निबंध बघणार आहोत. सध्याचे युग हे जाहिरातींचे युग. जिकडे-तिकडे जाहिरातीच जाहिराती. रस्त्यात जाहिराती, वर्तमानपत्रांत जाहिराती, मासिकांत जाहिराती, एवढेच काय, हल्ली कोणत्याही तिकिटांवरपण जाहिराती. दूरदर्शन सुरू करा,
कोणत्याही वाहिनीवरील कोणताही कार्यक्रम बघा, मध्ये-मध्ये लुडबुडणाऱ्या जाहिराती. किती विविध प्रकारे जाहिरातींनी आपल्य आयुष्यावर कब्जा केलेला आहे ! सतत आपल्या डोळ्यांसमोर जाहिरातीच. कानांवर शब्द आदळतात, ते जाहिरातींचेच. 'जाहिरातीच जाहिराती चहकडे गं बाई, गेला कार्यक्रम कुणीकडे?'
जाहिरात म्हणजे आता आपल्या नित्याच्या जगण्याचा एक अविभाज्य भागच झालाय. ह्या जाहिरातींचेदेखील एक मानसशास्त्र आहे. सतत एखादी गोष्ट मनावर बिंबवली गेली, की नकळत आपल्या मनावर ती ठसते आणि खूप ओळखीची वाटू लागते. मानवी गरजा व मानवी स्वभाव हे ओळखून जाहिराती केल्या जातात. बऱ्याचदा जाहिराती फसव्याच असतात.
लहान मुलेदेखील जाहिराती पाहतात, ऐकतात. त्यामुळे ती वस्तू त्यांच्या परिचयाची होते. मग त्या वस्तूंची मागणी सुरू होते. बरे, मुले ही रस्त्यातून जाताना जाहिराती बघतच असतात. वाचता न येणारी मुले चित्रावरून बरोबर ओळखतात, ही कशाची जाहिरात आहे.
ती जाहिरात पाहून त्यांचा हट्ट सुरू होतो. हा अनुभव अगदी सगळ्यांचाच आहे. अगदी चित्रपटाला जा, तेथेही जाहिराती. मैदानावर जा, तिथेही जाहिराती. रस्त्यातून जा, मोठमोठ्या जाहिराती. रेल्वे स्टेशनवर जा, एस्टी स्थानकावर जा, बस स्टॉपवर जा,
अगदी सर्वव्यापी असलेल्या जाहिराती आपली पाठ काही सोडत नाहीत. अफाट विस्तारलेल्या या जाहिराती अनेक रूपांत अवतरतात. जाहिरात एक शास्त्र आहे, एक कला आहे. ही अवतरते, ती मानसशास्त्राचा हात हातात घेऊन. सतत जाहिरात मानवी पंचेंद्रियांवर आघात करत असते. त्यामुळे आपण कधी त्या जाहिरातींच्या जाळ्यात अडकतो,
तेच कळत नाही. मग मात्र त्यातून सुटका नाही. प्रश्न असा आहे की, माल उत्तम दर्जाचा असताना त्यासाठी प्रलोभने कशाला? काही काळापुरती सूट, एकावर एक फ्री, अशा कितीतरी मोहमयी गोष्टी भुरळ पाडतील नाहीतर काय? शिवाय, ही गोष्ट मनावर ठसविण्यासाठी मोठमोठे अभिनेते.
आज आबालवृद्ध कलाकार जाहिरातींच्या मायाजालात ग्राहकांना अडकविण्यासाठी सिद्ध आहेत. त्यासाठी त्यांना पैसे मिळालेले असतात ना? खरे तर या जाहिराती म्हणजे खरी माहिती, असे नसून तो एक बुद्धिभेद आहे, प्रेमाने दिलेल्या धमक्या आहेत आणि दिलेली प्रलोभने आहेत.आज या जाहिरातींसाठी लाखो रुपये खर्च केलेले असतात. संगीत, कॉपी-रायटर,
जिंगल्स लिहिणारे, छायाचित्रकार, मॉडेल्स या साऱ्यांचा खर्च, हा खर्च उत्पादन-खर्चापेक्षा जास्त असतो. म्हणजे जाहिरातींचा सगळा खर्च ग्राहकांकडूनच वसूल केला जातो. आज स्पर्धा वाढलेली आहे. रोज नवे उत्पादन येत आहे.
ते लोकांसमोर आणण्यासाठी जाहिरात हे प्रभावी माध्यम वापरले जाते. आज तर निवडणुका जवळ आल्या, की उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहिराती झळकू लागतात. आज ग्राहकदेखील चोखंदळ झाला आहे. जाहिराती पाहून, त्यावर चर्चा करून ठरवतात कोणता माल घ्यायचा ते. कित्येकदा अनुभव येतो की,
जाहिरातच मोठी, त्या मानाने मालाचा दर्जा नाही. याचाच अर्थ असा की, जाहिरातीतून दिली जाणारी माहिती खरी नसते. तो केवळ ग्राहकांचा केलेला बुद्धिभेद असतो. एवढी मोठी जाहिरात केलीय म्हणजे ....?
या पुढच्या काळात जाहिरातींना पर्याय नसेल. तुमची जाहिराती पाहण्याची इच्छा असो वा नसो, जाहिराती तुम्हाला पहाव्याच लागतील. कार्यक्रम जेवढा लोकप्रिय, तेवढे जाहिरातींचे प्रमाण जास्त. अर्थात् जाहिरातींचा दर ! आपल्या आकलनशक्ती पलीकडचे आहे!
दिनरात - जाहिरात - जाहिरात - जाहिरात !
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद