कष्टाविना फळ नाही मराठी निबंध | Kashtavina Phal Nahi Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण कष्टाविना फळ नाही मराठी निबंध बघणार आहोत. एकदा एक आजोबा आब्यांचे झाड लावत होते. त्यांचे वय पाहिल्यावर लोकांना प्रश्न पडला, या वयात आंब्याचे झाड लावून ह्यांचा काय फायदा? झाडाला फळे येऊ लागतील, तेव्हा कदाचित हे आजोबा नसतीलही.
आजोबांकडे हा विचार मांडल्यावर त्यांनी उत्तर दिले; “बाबांनो, मला नाही मिळणार ह्याची फळे. पण माझी नातवंडे तर खातील." कष्ट करत राहावे, त्याचे फळ नक्की मिळते. कधी-कधी आपल्याला नाही; पण आपल्या पुढच्या पिढीला निश्चित मिळेल.
खरंय, 'कष्टाविना फळ नाही.' कष्ट केले, तरच खरे समाधान मिळते. "माणूस अभिमानाने सांगतो; तेव्हा कष्ट केले म्हणून हे दिवस पाहतोय."आज काळ आहे यंत्रयुगाचा, उपकरणवादाचा. त्यामुळे माणसाचे शारीरिक कष्ट कमी झाले आहेत.
'घंटों का काम मिनिटों में ही किमया साधू लागल्यामुळे आम्हाला आता कष्ट करणे नकोसे वाटू लागले आहे. आज आपण यंत्रावर विसंबून राहू लागलो आहोत. आपल्या हातांना काम करण्याची सवयच नाही राहिली, पायांना चालण्याचा सरावच नाही राहिला, तर हात-पाय निकामी तर नाही ना होणार?
जसे पूर्वी माणसाला शेपूट होती. पण तिचा वापरच केला गेला नाही; त्यामुळे ती झडून गेली. अशीच गोष्ट हात-पायांची झाली तर? खरे तर ही गोष्ट गांभीर्याने घेण्यासारखी आहे.आज कष्ट न करता सारे काही मिळविण्याची वृत्ती वाढत चालली आहे. कष्ट करण्याची आम्हाला लाज वाटत आहे.
ग्रामीण भागातील लोकांना शारीरिक कष्ट करावे लागतात. ते कष्ट करतात; म्हणून शेतात धान्य उगवते. पण शहरी लोकांना कष्ट करण्याची सवयच राहिलेली नाही. कष्टकरी वर्गाकडून मोले काम करून घेण्याची प्रवृत्ती घातक ठरणार आहे. कष्ट केले, तर आरोग्य उत्तम राहते.
दमल्यामुळे भूक लागते, झोपही छान लागते. कष्ट करणाराला असणाऱ्या चिंता तो कष्ट करताना विसरून जातो. त्याला चिंता करायला वेळच नसतो. कष्टातून, अर्थात स्वकष्टातून जे मिळते, तेच खरे सुख असते."कष्टाची बरी भाजी-भाकरी, तूप-साखरेची चोरी नको.”
दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेल्या जपान, जर्मनी ह्यांनी कष्टातून पुन्हा देशउभारणी केली. वाळवटांतून नंदनवन निर्माण करणारा इस्रायल. ह्या साऱ्यांनी कष्ट केले, परिश्रमाची कास धरली; म्हणूनच त्यांची प्रगती झाली. कष्ट कधीच वाया जात नाहीत. कष्टकरी वर्ग, बुद्धिजीवींपेक्षा काही बाबतींत नक्कीच सुखी आहे.
कष्टामुळे शरीरयष्टी सुदृढ बनरो, रोगांपासून रक्षण होते. कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद असतो. जे कष्ट करतात, त्यांना खरे समाधान व आनंद मिळतो.कष्ट म्हणजेच स्वावलंबन. स्वावलंबी माणूस कधी म्हणत नाही, 'असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी.' तो आधी कष्ट करून खाटले बनवेल, तरच हरी त्याला देईल.
“जेथे राबती हात, तेथे हरी" हेच तर खरे कष्टाचे फळ.कष्ट न करता काहीच मिळणार नाही. कष्ट केले, तर अशक्य काही नाही कष्टाविना फळ नाही.तेव्हा 'तू हे करू शकतोस' हा आत्मविश्वास, 'मी हे करीनच' ही जिद्द निर्माण करून आम्ही कोणतीही गोष्ट असाध्य असली, तरी अशक्य नाही, हे लक्षात ठेवू या.
पुन्हा-पुन्हा प्रत्येकजण आपल्या मनाला बजावेल, कष्टाविना फळ नाही', तर तो कष्ट करायला कधीच मागे-पुढे पाहणार नाही. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद