जुनी नाणी जमवण्याची हौस मराठी निबंध | Like To Collect Old Coins Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण जुनी नाणी जमवण्याची हौस मराठी निबंध बघणार आहोत. प्रत्येक माणसाला कसला ना कसला छंद असतोच. कुणाला पोस्टाची तिकिटे, जुन्या दुर्मिळ वस्तू, काडेपेटीचे छाप, फोटो, भातुकली, अशा कितीतरी वस्तू जमविण्याचा छंद असतो.
मलादेखील जुनी नाणी जमविण्याचा छंद आहे. मी एक अल्बम करून त्यात पुष्कळ देशांची, विविध प्रकारची नाणी जमविली आहेत. त्यामुळे माझा वेळ छान जातो. शिवाय, आनंदही मिळतो.
माझ्या घरी खूप प्रकारची माणसे येतात. त्यातील पुष्कळ माणसे अशी आहेत की, ती विदेशात जात असतात. मी त्या सगळ्यांशी खूप गप्पा मारतो, त्यांची मर्जी संपादन करतो आणि त्यांना माझ्या या छंदाविषयी माहिती सांगतो आणि माझ्या अल्बममधील नाणी त्यांना दाखवतो. ती पहिल्यावर ते 'छान ! मस्त !' असे उद्गार काढतात.
मग मी त्यांना मला माझ्या या छंदासाठी मदत कराल का, असे विचारतो. काहीजण लक्षात ठेवून काही नाणी मिळाली, तर मला कळवतात. मी देखील विनाविलंब त्यांच्यापर्यंत पोहोचतो. त्यांना धन्यवाद देतो.
माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ते त्यांच्या ओळखीच्या लोकांनादेखील जुनी नाणी देण्याविषयी सांगतात. अशा प्रकारे अनेक जणांचा हातभार लागतो. यावरून माझ्या असे लक्षात येते की, कोणत्याही छंदामध्ये अनेकांचे सहकार्य आवश्यक असते. त्यांच्या सहकार्याने छंद वाढण्यास मदत होते.
बऱ्याच वेळा माझ्याकडे एकाच प्रकारची नाणी असतात. तेव्हा मी माझ्यासारखाच छंद असलेल्या माझ्या मित्रांशी संपर्क साधतो आणि ती नाणी त्यांना देऊन त्यांच्याकडून दुसरी नाणी घेतो. अशा अदलाबदलीच्या व्यवहारातून नाण्यांची विविधता व संख्या वाढते. मग आम्ही एकमेकां साह्य करू' या उक्तीप्रमाणे खरोखरच सहकार्य करतो. त्यातून सर्वांचाच फायदा होतो.
ही नाणी मी जेव्हा बघतो, तेव्हा मला प्राचीन काळी कशी नाणी होती, हे समजते. शिवाय, त्या नाण्यांची किंमत काय असेल, ती कोणत्या धातूपासून बनवलेली आहेत, तेव्हा कोणते चलन अस्तित्वात होते, नेमकी नाणी केव्हापासून अस्तित्वात आली, याची माहिती मिळते.
माझ्याकडे शिवकालीन नाणीदेखील आहेत. पूर्वी ढब्बू पैसा असायचा. तो पैसा आज अस्तित्वात नाही; पण माझ्या तो संग्रही आहे. पूर्वी भारतातपण एक पैशापासून नाणी उपलब्ध होती व ती अस्तित्वात होती. पण आता मात्र ती नाणी चलनातून बाद केली गेली आहेत.
यावरून पैशाचे अवमूल्यन झाले आहे, हे लक्षात येते. प्रत्येक काळातील नाण्यावरील चित्रे व मजकूर यांचा मी अभ्यास करतो. तेव्हा कोणती चिन्हे होती व ती का छापली गेली असावीत, याचा मी अंदाज बांधतो. पूर्वी सोने, चांदी या मौल्यवान धातूपासून नाणी बनवली जात होती.
तेव्हा स्वस्ताई होती का महागाई? असा प्रश्न मला पडतो. कोणताही छंद मनापासून जोपासला तर त्यातून धडपड, जिज्ञासा, तर्क, अभ्यास ह्या गोष्टी साध्य होतात. म्हणून वाटते,
"छंद हवा जिवाला,
विरंगुळा मिळे मनाला."
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद