लोभामुळेच फसवणूक होते मराठी निबंध | LOBHAMULECH PHASVANOOK HOTE MARATHI NIBANDH

 लोभामुळेच फसवणूक होते मराठी निबंध | LOBHAMULECH PHASVANOOK HOTE MARATHI NIBANDH

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण लोभामुळेच फसवणूक होते मराठी निबंध बघणार आहोत. आज आधुनिकतेच्या नावाखाली माणूस स्वत्वच विसरत चालला आहे. साधेपणाची जागा फॅशनने घेतली आहे. मानवी गरजा वाढत चालल्या आहेत. या गरजांमुळे लोभी वृत्ती वाढत चालली आहे. 


जे काही मिळते, त्यात समाधान न मानता अधिक काही मिळविण्याचा अट्टाहास केला जातो. कमी कष्टांत अधिक फळ मिळवण्यासाठी धोका पत्कारायलाही माणसे सिद्ध होतात. यातूनच फसवेगिरी करणाऱ्या माणसांचे फावते. अशी माणसे लोभी माणसांच्या शोधातच असतात.


एक का अनेक फसवणुकीच्या गोष्टी नेहमीच कानांवर पडतात. तुम्हाला सोडतीत मोठे बक्षीस मिळालेले आहे, असा फोन येतो. लोभामुळे त्यात रस दाखविला जातो. मग पुढच्या क्षणी अमुक-अमुक खात्यात त्यासाठी पैसे भरा, नंतर ती वस्तू पोस्टाने तुम्हाला मिळेल, असाही निरोप येतो. 


माणूस पैसे भरतो. पोस्टात पार्सल येते, सोडवून घेतले जाते आणि ते पार्सल फोडल्यावर त्यात दगड, चिंध्या ! पैसे दुप्पट करून देतो, असे सांगून पैसे लुबाडण्याच्या अनेक घटना घडतात. यामागे कारण असते लोभ. जिथे लोभ, तिथे फसवणूक, हे समीकरणच आहे.


भरपूर व्याज मिळेल, या मिषाने विश्वासाने पैसे गुंतविणारे अखेर फसले जातात. अशा वेळी फक्त लोभी विचारच विजयी ठरतो. पर्यायी फसवणूकच पदरी पडते. मला टॉलस्टॉयच्या गोष्टीची आठवण येते. खूप जमीन मिळविण्यासाठी वेड्यासारखा धावणारा माणूस अखेर उरी फुटून मरतो. 


शेवटी माणसाला जमीन लागते तरी किती? फक्त साडेतीन हात. अशा अनेक गोष्टी आपण लहानपणी ऐकलेल्या असतात. झोळी फाटल्यामळे. भिकाऱ्याच्या लोभामुळे झोळीतील मोहरा मातीमय झाल्या, सोन्याचे अंडे देणारी कोंबडी लोभाने मारणारा माणूस, अशा गोष्टी ऐकूनही आम्ही शहाणे होत नाही.


मुळात माणसाला जगण्यासाठी खूप कमी लागते. गरजा वाढवाल, तेवढ्या वाढतात. मग त्या भागविण्यासाठी भल्या-बुऱ्या मार्गांचा अवलंब केला जातो. लोभामुळे माणसाची मती भ्रष्ट होते, विवेक नाहीसा होतो आणि मग त्याच्या हातून विपरीत गोष्टी घडतात; स्वत:चीच फसवणूक होते. 


शाळेतील काही विद्यार्थी अभ्यास न करता जास्त गुण मिळविण्याचा लोभ करतात. या लोभामुळे कॉपी, आधी पेपर मिळविणे, अशा गोष्टी ते करतात. गुणही मिळवितात, सर्वांना फसवतात; पण स्वत:ला? लोभामुळे लोक फसवतातच; पण स्वत:ही स्वत:ची फसवणूक करून घेतात. 


गुण फक्त कागदावर असतात, ज्ञानाचे काय?खाण्या-पिण्याची गोष्ट तर नित्याचीच. तरीही आवडत्या पदार्थांवर ताव मारून खाण्याच्या हव्यासापायी स्वत:ची तब्येत मात्र लोक स्वत:च बिघडवून घेतात व स्वत:च स्वत:ची फसवणूक करून घेतात. 


तेव्हा कोणत्याही गोष्टीचा लोभ वाईटच -मग तो लोभ अगदी कोणत्याही बाबतीत असो, फसवणूक ठरलेलीच. तेव्हा लोभापासून दूर रहा अन् फसवणूक टाळा. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद