मला पंख असते तर मराठी निबंध। Mala Pankh Aste Tar Marathi Nibandh.
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मला पंख असते तर मराठी निबंध बघणार आहोत. वेळ संध्याकाळची. त्या दिवशी रस्त्यात खूप गर्दी. चालणे म्हणजे जणू अडथळ्यांची शर्यत. त्यात वाहनांचे कर्कश आवाज. अगदी चालता-चालता नाकी-नऊ आले.
वाटू लागले, कुठून या गर्दीत आले. धड मागे फिरता येईना, की पुढे जाता येईना. गर्दीमुळे स्वत:ला चालावेच लागत नव्हते. आपोआप त्या माणसांच्या लोंढ्याबरोबर ढकलले जात होते. जीव नुसता कातावला होता. मनात विचार आला, हे अशा गर्दीतून चालण्यापेक्षा मस्त उडत जाता आले असते तर....!
मनुष्य म्हणजे कल्पनाशक्ती असलेला प्राणी. मनाने तो नेहमीच रंगीबेरंगी दुनियेत वावरत असतो. अशा दुनियेत जाण्यासाठी त्याला कोणतेच अडथळे येत नाहीत. अगदी सहज लीलया तो कुठेही, केव्हाही आणि कसाही पोहोचू शकतो.
आतादेखील मी उंच आकाशात भरारी मारण्यासाठी सिद्ध झाले. या धरतीच्या बंधनातून मुक्त झाले. क्षणभर गर्दीचादेखील विसर पडला. शरीराने नाही; पण मनाने मात्र उडू लागले. खरंच, मला उडता येतंय की! काय मस्त वाटतंय उडताना ! वाऱ्याची झुळूक किती सुखावह वाटतीय ! मुक्त, स्वच्छंद, सारेच कसे मनसोक्त ! अरेच्चा! समोरून ढग येताहेत.
आता हे ढग कुठे चाललेत लगबगीने? बापरे! हेसुद्धा गर्दीतून वाट काढताना एकमेकांना ढकलताहेत की ! किती छान वाटतंय ! मस्त कापसासारखे फुललेले, हलकेफुलके ! अरेरे! हे काळे ढग मात्र जरा धटिंगणच आहेत हं! एकमेकांना धक्का देताना कसे गुरकावतात बघा. हं! आपण भूतलावर गडगडाट ऐकतो ना, तसाच. चला जाऊ द्या. पुढेच गेलेलं बरं!
हे तर इंद्रधनुष्य. सातही रंग किती स्पष्ट दिसताहेत ! ही इंद्रधनुष्याची कमान अगदी खास माझ्या स्वागतासाठी उभारलीय बरं का! डोळ्यांचे अगदी पारणेच फिटले.आता आकाश निळेशार दिसतंय. सूर्याची किरणं लालसर व्हायला लागलीत. म्हणजे आता सूर्यास्त होणार वाटतं? मस्त! तो सूर्यास्त बघायला मिळतो का कधी?
सगळीकडे मोठमोठ्या इमारती. त्यातून कुठला दिसायला तो सूर्यास्त? चला, आता नामी संधी चालून आलीय. मग मात्र मी माझा उडण्याचा वेग कमी केला. हळूहळू संधिप्रकाश पडू लागला. सूर्य समुद्राच्या दिशेने खाली खाली सरकायला लागलाय. बापरे !
आता तो समुद्रात बुडणार. माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. सूर्यास्त आणि तोसुद्धा आकाशातून पाहण्याचे भाग्य ! मी अगदी खूप खुश झाले. 'कुठे बुडाला पलिकडील तो सोन्याचा गोळा?' ह्या ओळी आठवल्या.
थोड्याच वेळात अंधार पसरला. जरा डोळे चोळले, तो समोर चंद्र आपल्या सख्या चांदण्यांसमवेत उभा. काय ते तेज ! डोळे दिपून गेले. लुकलुकणाऱ्या तारकांबरोबर लपाछपीचा खेळ सुरू झाला. तो चंद्र कधी ढगांमध्ये लपत होता; तर कधी ढगांतून बाहेर येऊन चमचमत होता.
खूप खूप मजा वाटली. दुपारपासून संध्याकाळपर्यंत आकाशदर्शन सुरूच होते. जरा थकल्यासारखे वाटले. म्हटलं, जरा बसू या कुठेतरी. पण बसणार कुठे? वर आकाशात तर सगळीकडे पोकळीच. भानावर आले नि खाली लक्ष गेले. भूतलावर लुकलुकणारे दिवे दिसले. खडूएवढी माणसे; काडेपेटीएवढ्या गाड्या.
हे दृश्य पाहूनही मजा वाटली. मी हळूहळू खाली जमिनीच्या दिशेने येऊ लागले. काही क्षणांतच माझे पंख गळून पडले आणि माझे पाय जमिनीला लागले. तेवढ्यात एक धक्का बसला नि त्याबरोबर खेकसलेले शब्द ऐकू आले, “ए, नीट चाल ना ! आंधळी आहेस का?"
ओशाळून पुढे चालू लागले. वास्तवाचे भान आले. आतापर्यंत जी दृश्ये पाहिली, जी उडले. ते कल्पनेचे पंख लावून. कल्पना काही वाईट नाही. जर मला उडता आले तर....
"किंत बिना पंखों के विचार सबरीते हैं।
हाय, पक्षियों से भी मनुष्य गये बीते हैं।"
मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद