माणसाला लिहिता आले नसते तर मराठी निबंध | MANSALA LIHITA AALE NASTE TR ESSAY MARATHI

  माणसाला लिहिता आले नसते तर  मराठी निबंध | MANSALA  LIHITA AALE  NASTE TR  ESSAY MARATHI


नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माणसाला लिहिता आले नसते तर मराठी निबंध बघणार आहोत. अश्मयुगातल्या माणसाला भाषाच अवगत नव्हती. नित्य घडणाऱ्या गोष्टींचे अवलोकन करून त्यावरून तर्क बांधायचे. 


विविध प्रकारच्या भावना व्यक्त करण्यासाठी तोंडातून जे ध्वनी बाहेर पडायचे, त्यातूनच भाषेचा जन्म झाला. ध्वनी ऐकून-ऐकून शब्द जन्माला आले. शब्दांचा जन्म झाला नि संभाषण सुरू झाले. विचारांच्या आदान-प्रदानाचे साधन बनले, ते शब्द. नंतर आली लिपी. लिपी म्हणजे काय, तर शब्दांच्या उच्चाराप्रमाणे असणाऱ्या खुणा. मौखिक आविष्कारातून भावभावनांचे प्रकटीकरण सुरू झाले. 


श्रवण, भाषण, वाचन आणि लेखन ही चार प्रमुख कौशल्ये आत्मसात करून माणसाची शिकण्याची प्रक्रिया सुरू झाली. पूर्वी स्मरणशक्तीवर आधारित पाठांतराने शिक्षण सुरू झाले. त्याचमुळे ऋषि-मुनींच्या वेद, ऋचा पाठ होत्या. अवगत झालेले ज्ञान पुढील पिढीकडे संक्रमित करण्यासाठी लेखनकला उपयोगी पडली.


आता कल्पना करा की, माणसाला लिहिता आले नसते तर.... विकासाच्या साऱ्या संधी त्याच्यापासून दूर गेल्या असत्या. लिखित स्वरूपातील मजकूर म्हणजे पुरावा बनतो. हाच पुरावाच नाहीसा झाला, तर माणसे शब्द फिरवून खऱ्याचे खोटे करण्यात, इतरांना फसविण्यात तरबेज झाले असते. 


लेखन ही शिक्षणाची सर्वात वरची पायरी आहे. ती एक कला आहे. आपले विचार प्रभावीपणे मांडण्याचे ते एक साधन आहे. प्रत्येकाजवळ उपजत प्रतिभा असतेच, असे नाही. पण तरीही नित्याच्या व्यवहारासाठी लिहिता आलेच पाहिजे. 


ते आले नाही तर मनुष्य म्हणजे पशूच. फरक एवढाच, की पशूप्रमाणे त्याला शेपूट व शिंग नाही. लिखाणामुळे माणसाचे अनेक फायदे होतात. काहीही मजकूर लिहून त्यावर अडाणी माणसांचा अंगठा घेऊन त्यांना स्वत:चे आयुष्यभर गुलाम म्हणून राबवून घेणारे महाभाग पूर्वीच्या काळी असायचे. 


आता शिक्षणाच्या संधीमुळे मोफत शिक्षण सुरू झाले आहे. त्याचा फायदा घेतला नाही आणि लिहिता आले नाही, तर त्याच्यासारखा तोच करंटा ठरेल. दारातून गंगा वाहतीय, तरीही तहानेने तडफडणारा माणूस हतभागीच ना? २१ वे शतक संपून २२ वे शतक सुरू होईल. 


तरीही देशात निरक्षरता असेल, तर देशाचे दुर्भाग्यच ! माणसाला लिहिता-वाचता आले नसते, तर आज मानवाने जी प्रगती केली आहे, ती दिसलीच नसती. लिहिता न येणे म्हणजे अज्ञान आणि दारिद्र्य यात खितपत पडणे; आणि लिहिता येणे म्हणजे ज्ञानप्रकाशाकडे झेपावून समृद्धीकडे वाटचाल करणे होय. जर माणसाला लिहिता येत नसते,


 तर मुद्रणकला विकसित झाली नसती, ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या नसल्या, नवे शोध लागले नसते आणि अजूनही आपण जंगली अवस्थेतच खितपत पडलो असतो. मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद