माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi

  माझा देश मराठी निबंध. Maza Desh nibandh in Marathi 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण माझा देश मराठी निबंध बघणार आहोत. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गारियसी' जननी आणि जन्मभूमी या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत.देशाची पूजा हीच खरी देवाची पूजा होय. 


"दिलसे निकलेगी न मरकर भी वतन की उल्फत मेरी मिट्टी से भी खुशबू-ए-वतन आएगी" असं म्हणत देशासाठी हसत हसत शहीद होणारा भगतसिंग - भारतमातेचा थोर पुत्र-देशासाठी जगला व देशासाठी प्राण देऊन निघून गेला.त्याचे देशप्रेम सर्वपरिचित आहे.


सुखदेव, राजगुरू,नंदुरबारचा छोटा शिरिष असे अनेक भारतमातेचे लाल आपल्या भारतभूसाठी शहीद झाले. थॉमस कॅम्पबेल यांनी म्हटले आहे की " देशभक्ताचं रक्त म्हणजे स्वातंत्र्यवृक्षाचे बीजच होय." "देशभक्तांनी रक्त सांडून स्वातंत्र्य मिळविले, ते आमच्या हाती दिले, 


सुराज्य करण्यासाठी पण आजची परिस्थिती चिंताकारक आहे.स्वार्थ, भ्रष्टाचार, लुटालूट, महागाई,दारिद्र्य यात आमचा देश जखडून पडला आहे. भारतमाता कासावीस झाली आहे. तिचा देव्हारा डळमळत आहे.समस्या आ वासून गिळू पाहत आहेत.खऱ्या एकीची गरज आहे.


समाजकंटक देशाला खिळखिळे करीत आहेत.त्यांना योग्य शासन व्हायला हवे.देशाची प्रतिमा खराब होईल असे काहीच घडू नये. आंतरराष्ट्रीय वर्तुळातही भारताची शान वृध्दिगंत झाली पाहिजे. निर्यात मालातील भेसळ थांबली गेली पाहिजे. 


भारतीयांनी परदेशी मालापेक्षा स्वदेशी मालच वापरला पाहिजे. हुशार लोक परदेशी नोकरीसाठी न जाता त्यांनी भारतातच काम केले पाहिजे तर भारतमातेचे ऋण ते फेडू शकतील.देशाचे हित, संरक्षण गपिते प्रत्येकाने जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. . 


प्रत्येकाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागल्या गेल्या पाहिजे अज्ञानाचा अंधःकार मिटवून लोकांना साक्षर केले गेले पाहिजे. अंधश्रध्दा झुगारल्या गेल्या पाहिजेत.आर्थिक विषमता कमी झाली पाहिजे.हे सर्व करणे म्हणजेच देशाची पूजा करणे आहे, वंदन करणे आहे. 


नुसती प्रतिज्ञा-'भारत माझा देश आहे... वगैरे' म्हणून काम होणार नाही.प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. राष्ट्रीय एकात्मतेची भावना हृदयात घेऊन देशसेवेचे संकल्प कृतीत आणायचे आहेत. आपसातील मतभेद विसरून हिंसेपासून दूर सहकाराचा मार्ग अंगीकारायचा आहे.


समाजप्रबोधन,राष्ट्रीय भावनेची मशाल यामुळे सारा देश उजळून निघायला हवा. प्रभावी व राष्ट्रहितास पोषक असे नेतृत्व हवे तरच 'देश हाच देव' समजून माणूस देशासाठी जगेल.जातीय, धार्मिक, भाषिक दंगे सोडून दिले नाही तर देशाचे वैभव तर नष्ट होईलच पण देश रसातळालाही जाईल. नैसर्गिक संकट असो, परकियांपा धोका असो वा सामाजिक आपत्ती असो, एकजुटीने लढा दिल्यास देशसेवा घडेल.


" कोटी कोटी असतील शरीरे

मनगट आमुचे एक असे" 


असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी सांगितलय.पारतंत्र्यातले हाल आठवून आज स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपण जपला पाहिजे. “ स्वातंत्र्याच्या त्या मशाली धगधगल्या ज्या क्रांतीहृदयात देशासाठी, स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या तन-मनात हाक अजूनि कानी घुमते करते प्रश्न जणू आम्हा


जे स्वातंत्र्य तुम्हा सोपिले,

त्याचे तुम्ही काय बरे केले? 


आपण सारे भारतीय आहोत याचा सार्थ अभिमान प्रत्येकाने बाळगला पाहिजे. एकीचा मार्ग स्वीकारून परकियांकडून होणारे त्रास, वाढती लोकसंख्या ,भ्रष्टाचार, सत्तांध लोक, वाढते प्रदूषण, अज्ञान , निरक्षरता , अंधश्रद्धा, रूढी व नैसर्गिक आपत्ती


या सर्वांशी लढा दिला पाहिजे.देशाला अधिक मंगल ,पवित्र, कणखर,बळकट करू या मला म्हणावेसे वाटते "माते भारत भू जननी नतमस्तक मी तुझ्या वंदनी" मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद