मी भ्रष्टाचार करणार नाही मराठी निबंध | ME BHARSHTACHAR KARNAR NAHI ESSAY IN MARATHI
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी भ्रष्टाचार करणार नाही मराठी निबंध बघणार आहोत. भ्रष्टाचार याचाच अर्थ भ्रष्ट असा आचार, जो आपल्या नीतिमत्तेत बसत नाही, आपल्या संस्कृतीत बसत नाही. मग या भ्रष्टाचाराची सुरुवात नेमकी होते कोठून ? तर ती होते घरापासून. लहानपणी आई मुलाला काम सांगते.
मुलगा काम करायला नाखुशी दर्शवतो. तेव्हा आई त्याला काहीतरी देण्याचे आमिष दाखवते. मग त्याला तशी सवयच लागते. दिसायला ह्या गोष्टी छोट्या-छोट्या वाटतात; पण ह्यातूनच भ्रष्टाचाराची सुरुवात होते. आज देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात जखडला आहे.
भ्रष्टाचाराशिवाय कोठेही, कोणतेही काम होत नाही. अगदी शिपायापासून उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपर्यंत, छोट्या विक्रेत्यापासून मोठ्या कारखानदारापर्यंत सगळीकडेच असे.देशातील काही व्यापारी कृत्रिम टंचाई निर्माण करतात आणि मालाच्या किंमती वाढवून काळा बाजार' करतात.
गरज असल्याने सामान्य नागरिक ह्या गोष्टीला साथ देतात. सर्वांना माहीत असते; पण त्यांचा नाइलाज होतो. औषधांतील भेसळ म्हणजे माणसांच्या जीवाशी खेळ. वैद्यकीय क्षेत्रातही काही डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळतात. एकदा रुग्ण डॉक्टरकडे गेला, की सर्व प्रकारच्या तपासण्यांच्या चक्रात अडकतोच.
भरमसाट फी, महागडी औषधे, विनाकारण शस्त्रक्रिया अशा दुष्ट चक्रात सामान्य माणूस होरपळतो.शाळेतील प्रवेशासाठीदेखील लाच, नोकरीसाठी लाच, प्रश्नपत्रिका फोडणे आणि त्याच्या बदल्यात पैसे उकळणे, परीक्षेतील गुणांच्यात फेरफार करणे व लाच घेऊन उत्तीर्ण करून घेणे,
देशाची संरक्षणविषयक गुपिते परकीय सत्तेला सांगणे, चोरटा व्यापार, अंमली पदार्थांची चोरटी विक्री, शस्त्रास्त्रे विनापरवाना विकणे, अशा गोष्टी सर्रास चालतात. यातूनच पैशाची हाव निर्माण होते. हे मी करतोय, ते योग्य आहे की अयोग्य? सारासारविचार करण्याची शक्तीच लोप पावत चाललीय.
भ्रष्टाचार हाच शिष्टाचार बनत चाललाय.नीतिमत्ताच ढासळतीय. जिकडे-तिकडे फसवेगिरी. बँका, पतपेढ्या, खाजगी वित्तसंस्था, बांधकाम क्षेत्रातील घोटाळा, किती नावे सांगू? प्रत्येक ठिकाणी लोकांनी भ्रष्टाचाराचे कुरणच सुरू केले आहे. कोणीही यावे आणि त्यात चरून जावे.
आज जीवनातील कोणतेही क्षेत्र असे नाही की, तेथे भ्रष्टाचार नाही. एखाद्या कार्यालयात जा, टेबलाखालून पैसे घेतल्याशिवाय फाइल पुढेच सरकणार नाही. एखादी सही, एखादा शिक्का यासाठी रेट ठरलेला.
एखाद्याने ठरविले की, लाच द्यायची नाही; तर त्याला एवढे हेलपाटे मारायला लागतात की, त्याची स्थिती 'शिंगरू मेलं हेलपाट्यान' सारखी होते. जाण्या-येण्याचा वाहतूक खर्च, वेळ याचा हिशेब करून माणूस शेवटी कंटाळून लाच देण्यास तयार होतो. लाच देणे, ही सामान्य माणसाची मजबूरी आहे.
'अडला हरी गाढवाचे पाय धरी,' अशी स्थिती. भ्रष्टाचाराचा भस्मासुर उग्र रूप धारण करीत आहे. याला आळा न बसल्यास देश रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. याचसाठी प्रत्येकाने स्वत:चे परीक्षण करण्याची गरज आहे.
विशेषत: आजच्या तरुण पिढीच्या खांद्यावर ही जबाबदारी आहे. हा भ्रष्टाचाररूपी राक्षस वेळीच जाळला नाही, तर तो ह्यापेक्षा अधिक विराट रूप धारण करून संपूर्ण देशालाच गिळंकृत करेल.तेव्हा आज प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे, प्रतिज्ञा केली पाहिजे की,
'मी भ्रष्टाचार करणार नाही.' चला तर, या कार्याचा शुभआरंभ स्वत:पासूनच करू या. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद