महागाईविरोधी आंदोलन मराठी निबंध | MAHAGAI VIRODHI AANDOLAN ESSAY IN MARATHI

   महागाईविरोधी आंदोलन मराठी निबंध | MAHAGAI VIRODHI AANDOLAN ESSAY IN MARATHI 

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण महागाईविरोधी आंदोलन मराठी निबंध बघणार आहोत. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा. यातली कोणती गोष्ट स्वस्त आहे, सांगा. घर घ्यायचेय? शक्यच नाही. दिवसातले चोवीस तास कष्ट केले तरी, अगदी आयुष्यभर कष्ट केले तरी घर घेणे शक्य नाही. 


मग आता अन्न ? तेही सोडायचे म्हणजे हे जगच सोडून जायचे. अंगभर वस्त्र हवे की नाही? लज्जा-रक्षणापुरते तरी? सर्वसामान्य जनता पेट्रन उठली. सर्वांनीच ठरवले, महागाईच्या विरोधात आंदोलन करायचंच! प्रत्येकाच्या मनात चीड उत्पन्न झाली. 


तोच दिल्ली येथे काही समाजसेवक महागाईविरोधी उपोषणाला बसले. महागाईचे मूळ भ्रष्टाचारातच आहे. भ्रष्टाचार थांबला, तरच व्यापारी लोक वठणीवर येतील. सामान्य जनता खडबडून जागी झाली. आता जनतेने आदोलकाची भूमिका घेतली.


ठिकठिकाणी मोर्चेबांधणी झाली. गॅसची टंचाई करून काळाबाजार करणाऱ्या गॅसवितरकांविरुद्ध आंदोलन सुरू झाले. घोषणा सुरू झाल्या. वृत्तपत्रांकडे लोकांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या. तक्रारींना वाचा फुटली. अन्न-धान्याचे भाव कडाडले. 


गरिबाला भाकरी मिळायची, तीदेखील महाग झाली. ४५ रु. किलो ज्वारी, डाळी महाग, साखर महाग, दूध महाग. ह्या आकाशाला भिडणाऱ्या किंमती आटोक्यात आल्याच पाहिजेत, म्हणून घंटानाद सुरू करून आंदोलन झाले. या घंटानादाने तरी शासन जागे झाले का? झोपेचे सोंग करणाऱ्या लोकांना कशी येणार जाग?


शेतकरी बिचारे कायमच उपेक्षित. दलालांमार्फत त्यांची होणारी पिळवणूक नित्याचीच. एका वर्षी कांदा कडाडतो; तर दुसऱ्या वर्षी मालाला उठाव नाही, भाव नाही म्हणून रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. कोथिंबिरीच्या जुड्या रस्त्यात फेकाव्या लागतात. फुले तोडणीसाठी मजुरी द्यावी लागते. कित्येकदा तेवढी रक्कम सुद्धा सुटत नाही. 


जगायचे कसे? शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. दाद न मिळाल्यामुळे रास्ता रोको आंदोलन' सुरू झाले; एकीकडे शेतमालाला भाव नाही. दुसरीकडे धान्य महाग.पाण्यासाठी आंदोलन पेटले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. सर्व देशभर त्याचे पडसाद उमटले. 


प्रत्येक वेळी आंदोलन दहशत निर्माण करून संपुष्टात आणले जाते. अशा सर्वच गोष्टींनी आज सारा भारत त्रस्त आहे. आम्ही जगायचे कसे? हा एकच प्रश्न सर्व जनतेला भेडसावतो आहे. प्रत्येक लहान मूलदेखील महागाई विरोधी आंदोलनात सहभागी झाले. 


प्रत्येक जण आंदोलक बनला. ठिकाठिकाणी मार्चे निघाले. महिलांनी लाटणे, थाळ्या हातात घेऊन आंदोलन केले. 'नहीं चलेगी, नहीं चलेगी, आपकी मर्जी नहीं चलेगी।' या व अशा इतर घोषणांनी जोर धरला.


रस्त्यावर आले तरच गरिबांचे प्रश्न सुटतील. हळूहळू आंदोलन तीव्र होईल, सगळा समाज आंदोलनात सामील होईल नि मग बघू या, काय होतंय ते ! मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता . धन्‍यवाद