म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध | Mhatarya Bailache Manogat Essay In Marathi
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण म्हाताऱ्या बैलाचे मनोगत मराठी निबंध बघणार आहोत. माझ्या मानव मित्रांनो, नमस्कार! नाही ओळखलेत मला? मी शेतकऱ्यांचा सच्चा मित्र. अहो, त्यांच्या जीवनात मला अतिशय महत्त्व. शेतीची अनेक प्रकारची कामे करणारा मी. आता तरी ओळखलेत? हो,
अगदी बरोबर. मीच तो बैल. आज माझी कैफियत मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कृपा करून कानांवर हात ठेवू नका. माझी कैफियत तुमच्या आतल्या हृदयापर्यंत पोहोचू द्या.
'बलीवर्द' या संस्कृत शब्दापासून बैल शब्द बनला आहे. वृषभ असे माझे दुसरे नाव. मी ताकद, शक्ती, बल, पराक्रम याचे प्रतीक असल्याने मला वृषभ' नाव दिले आहे. बारा राशींमध्ये दुसरी रास म्हणजे माझे नाव असलेली रास. माझ्यात अनेक गुण आहेत; म्हणून मला मारू नये, असे महाभारतात, अथर्ववेदात सांगितले आहे.
अवध्य म्हणजे ज्याचा वध करू नये, असा मी म्हणजेच बैल. शिवाचे वाहन होण्याचा मानही मला मिळाला. त्याचे नाव 'नंदी!' अहो, म्हैसूर येथे बसवनगुडी इथे माझे मंदिर आहे. तिथे दरवर्षी जत्रा भरते. तेथील लोक मला 'बसव' असे म्हणतात.
सिंधू संस्कृतीतही मला महत्त्व होते. दहा गायींच्या कळपात चार बैल असावेत, असा संकेत होता. पावसाळ्यात शेतीची कामे करणारा मी एक अत्यंत प्रामाणिक आणि कष्टाळू प्राणी. मला विश्रांती मिळावी, अशी माझ्या मालकाची इच्छा असे.
माझ्यावर त्याचे अतोनात प्रेम. त्याला माझ्याविषयी कृतज्ञता वाटत असे; म्हणून दर बैलपोळ्याच्या दिवशी माझी पूजा केली जात असे. याला 'बेंदूर' असेही म्हणत.
या दिवशी माझ्याकडून कोणतेही काम करून घेतले जात नसे. मला तेल लावून आंघोळ घातली जायची. माझ्या शिंगांना सोनेरी रंग लावला जायचा. त्यावर पितळी टोपणे लावली जायची. माझ्यावर सुंदर, रंगीबेरंगी, नक्षीचे बाशिंग बांधले जायचे. माझ्या पाठीवर नक्षीची झूल घातली जायची.
माझी पूजा करून मला औक्षण केले जायचे. मला पुरणपोळी खायला दिली जायची. नंतर माझी मिरवणूक काढली जायची. एकदा तर बैलांच्या शर्यतीत मी पहिला आलो होतो. तेव्हा तर माझ्या मालकाची छाती अगदी गर्वाने फुलून आली होती.
तो अभिमानाने म्हणू लागला, "बघितलंत माझा सर्जा किती देखणा आहे आणि शक्तीमान." अजूनही मला तो दिवस आठवतोय. पण आता ....."सारे झाले जीर्ण-शीर्ण! सुन्न झाल्या दिशा आता काही बोलवेना. झाली मुकी माझी भाषा।"
मी आता म्हातारा झालो आहे. माझी सगळी शान गेली आहे. माझ्याच्याने आता पूर्वीसारखे काम होत नाही. नुसते झाडाला बांधून ठेवल्यामुळे मला सगळ्या दिशा बंद झाल्या आहेत. माझ्या स्वातंत्र्यावर घाला पडला आहे. मालक माझ्याकडे आता ढुंकूनही पाहत नाही.
माझ्या अंगावरून फिरणारा मायेचा हात, तो स्पर्श आता मला पारखा झालाय. आता उरलीय फक्त उपेक्षा. कधी कधी तर पोटभर खायलाही मिळत नाही. मुळात माझी भाषा मुकीच होती; पण तरीही ती माझ्या मालकाला समजत होती. पण आता कितीही हंबरडा फोडला, तरी कोणीही त्याची दखल घेत नाही.
दरवर्षी बैलपोळा येतो-जातो. माझे कौतुक संपुष्टात आलेय. माझ्याकडे फक्त गतकाळातल्या आठवणी उरलेल्या आहेत. त्या आठवणी मला सुखावत नाहीत. त्या आठवणी मला वेदना देतात. 'गेले ते दिन गेले' म्हणत दिवस कंठणे माझ्या समोर आले आहे. मनुष्य किती मतलबी आहे, याची साक्ष पटली आहे.
"जो तो वंदन करी उगवत्या जो तो पाठ फिरवी मावळत्या"
आता माझ्या आयुष्याची वाटचाल मावळतीकडे सुरू आहे. माझ्यातील ताकद संपली, माझा उपयोग संपला; आणि उपयोग संपला म्हणून माझा मानही संपला. आता मी प्रत्येक श्वास मोजतो आहे. माणसाला काम केल्यानंतर म्हातारपणी निवृत्तिवेतन तरी मिळते.
त्यांची मुले-बाळे त्यांचा सांभाळ तरी करतात. पण आमचे काय? काम नव्हे; काबाडकष्ट करून म्हातारपणी काय? आमची मुकी भाषा तुमच्यापर्यंत पोहोचेल का? आमची व्यथा कोणी ऐकेल का? ऐकली, तर त्याला वाचा फोडेल का?
या साऱ्या आशा-निराशेच्या, प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडलेले आयुष्य कधी सरणार? हे विधात्या! म्हातारपण दिलेसच का? निदान आमच्यासारख्या परावलंबी, मुक्या जनावरांना? मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद