मी सफाई कर्मचारी बोलतोय मराठी निबंध | Mi Safai Karmachari Boltoy Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी सफाई कर्मचारी बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. मित्रांनो, मी एक साधा सफाई कामगार आज तुमच्याशी गप्पा मारणार आहे. अरे हो, तुम्हाला माझ्याशी नसेल बोलायचं, तर माझा आग्रह नाही. पण मला मात्र तुम्हाला काही सांगायचंय.
सफाई कामगार म्हटल्यावर तुम्ही नाक मुरडलंत ना? अहो, पण केरकचरा साठल्यावर त्यापासून येणाऱ्या दुर्गंधीमुळे नाक दाबून धरता ना? तेव्हा खरं तर तुम्हाला माझीच आठवण येत असणार. माझे काम म्हणजे चतुर्थश्रेणीचे काम समजले जाते; त्यामुळे समाजात मला मान मिळत नाही. ठीक आहे.
मी शिक्षण, ज्ञान सगळ्यात कमी दर्जाचा आहे; पण म्हणून तुम्ही माझा अपमान नाही करू शकत. कारण श्रमप्रतिष्ठा महत्त्वाची आहेच की! कोणतंही काम श्रेष्ठ अथवा कनिष्ठ नसतं. प्रत्येक काम आपापल्या जागी श्रेष्ठच असतं.
प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणे व मन लावून केलं, तर त्याचा समाजाला नक्कीच फायदा होईल. माझा आदर्श आहेत संत गाडगेबाबा. गाडगेबाबा स्वत: हातात खराटा घ्यायचे आणि सगळा गाव झाडून काढायचे.
गावसफाईबरोबरच ते लोकांच्या मनाची सफाई करायचे. कीर्तन, भजन या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करायचे. फुकट कधीच खायचे नाहीत. त्यांनी श्रमाला प्रतिष्ठा मिळवून दिली. कष्ट करून खा, अशी शिकवण दिली. आता मी सफाईकामगार आहे, याचं मला मुळीच वाईट वाटत नाही.
कामाची वर्गवारी काम चांगले व्हावे म्हणूनच, ती केवळ कामाच्या सोईसाठी केलेली व्यवस्था होती. सगळ्यांनीच मोठ्या प्रतिष्ठेची कामं करण्याचं ठरविलं, तर लहान-सहान कामं कोणी करायची? आज आम्ही साफसफाईची कामं करतो म्हणून वातावरण कसं प्रसन्न व आरोग्यसंपन्न बनतं! अशा वातावरणात काम करायलादेखील हुरूप येतो ना? खुल्या दिलाने कबूल करा.
सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलं, तर जंतूंचा प्रादुर्भाव होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात येईल, रोगराई पसरेल आणि मृत्यूचं प्रमाण वाढेल. आरोग्य उत्तम, तरच काम उत्तम. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं. शरीर व मन निरोगी असल्याशिवाय आनंदी जीवन जगता येणार नाही.
मित्रांनो, लक्षात घ्या, आमच्या कामाला हीन लेखू नका. आम्हीदेखील हाडा-मांसाची, मन असलेली माणसंच आहोत. आम्हाला भावना आहेत. त्या भावना कोणी दुखवू नयेत, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. स्वच्छेतेमुळं सौंदर्य वाढतं. स्वच्छता हाच परमेश्वर आहे. जिथं जिथं स्वच्छता असते तिथंच लक्ष्मी वसते.
हात फिरे, तिथे लक्ष्मी वसे' असे म्हणतात ना?
आम्ही प्रसन्न वातावरण निर्माण करतो. त्यामुळे तिथं काम करणाऱ्यांना काम करताना प्रसन्न वाटतं. हे स्वच्छतेचं काम करताना आमचे कपडे खराब होतात. त्यामुळे आम्ही बाबू लोकांसारखे टापटीप पोषाखात राहू शकत नाही. म्हणून आमच्या कपड्यांकडे पाहून आमची उपेक्षा करू नका.
कित्येक वेळा घाणीत काम केल्यानंतर त्याच हाताने तोंडात घास घालताना आम्हालासुद्धा कसंतरीच वाटते; पण त्याला इलाज नसतो. आम्ही ही असली कामं पोटासाठीच करतो ना? भीक मागून खाण्यापेक्षा आमच्या कष्टाची भाकरीच आम्हाला प्रिय आहे. आमच्या विश्वात आम्ही खूश आहोत. पण आम्हाला डिवचून दु:खी करू नका, अशी आमची अपेक्षा आहे.
मी ज्या कारखान्यात काम करतो, तिथं एकदा आमच्या मागण्यांसाठी आम्ही संप पुकारला. सफाई कामगार नाहीत म्हटल्यावर सगळ्यांची खूप कुचंबणा झाली. प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली. दोन-चार दिवसांतच संप मागे घेण्याची वेळ आली.
व्यवस्थापनाला आमचा संप परवडणारा नव्हता; कारण आमचं काम कोणीही करायला तयार नसतं. आमच्या आरोग्याचा, आमच्या औषध-पाण्याचा खर्च यासाठी तरतूद केली पाहिजे, यात गैर असं काय? मुळात आम्हाला मिळणारे वेतन हे जीवनावश्यक गरजा भागविण्याइतपतच मिळते.
त्यापेक्षा काही संकट आलं, तर त्यासाठी जादा पैसे कोठून आणणार? कर्ज घेतल्यानंतर ते फेडण्यासाठी नियमित हप्ते हे पगारातूनच द्यावे लागतात. मग अधिक ओढग्रस्त स्थिती होते. याचा समाजाने विचार करावा.
आम्हालाही वाटतं, आमची मुलं शिकून-सवरून मोठी व्हावीत. त्यांच्या वाट्याला आमच्यासारखंच काम करण्याची वेळ न येवो. पण बऱ्याच वेळा ते शक्य होत नाही, तेव्हा खूप वाईट वाटतं. खूप संघर्ष करावा लागतो.
या संघर्षात समाजाने आम्हाला साथ द्यावी, एवढीच इच्छा. असो, चला साहेबांच्या बंगल्याच्या परिसराची स्वच्छता करायची आहे. निघायला हवं. मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद