मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध | Mi Sahyadri Boltoy Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण मी सह्याद्री बोलतोय मराठी निबंध बघणार आहोत. भव्य हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा या मातीचे कण लोहाचे तृणपात्यांना खड्ग कळा कृष्णेच्या पाण्यातुनी अजुनी वाहतसे लाव्हा सगळा कवी वसंत बापट यांनी माझ्यावर लिहिलेली ही कविता ऐकली आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला.
खरेय. मी सह्य पर्वत कोटीकोटी छात्यांचा कोट करून कणखरपणे उभा आहे. कोणताही झंझावात परतविण्याचे सामर्थ्य माझ्या ठायी आहे. तुम्ही महाराष्ट्रीयन मला विसरूच शकत नाही. मी म्हणजे भारतमातेचा पश्चिम कणा आहे. गुजरातच्या खंभातच्या आखातापासून ते कन्याकुमारीपर्यंत माझा विस्तार आहे.
पश्चिमी अरबी समुद्र आपल्या खाऱ्या पाण्याचे रूपांतर गोड ढगांमध्ये करतो आणि उन्हाळ्याच्या तप्त ऋतूत माझ्यावर अभिषेक करतो. युगानुयुगे हा अभिषेक सुरू आहे. त्यात खंड नाही.
इंद्रायणी, भीमा, कृष्णा, तुंगभ्रदा आणि कावेरी या माझ्या सुकन्या आहेत. या साऱ्या सुकन्यांचा मला अभिमान आहे. आपल्या पित्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या ह्या माझ्या सुकन्या अत्यंत अभिमानास्पद कार्य करत आहेत. लाखो लोकांना जीवन प्रदान करण्याचे कार्य किती मोलाचे आहे, हे काय सांगायला हवे?
मी महाराष्ट्राचे दोन भाग केले आहेत. एक कोकण आणि दुसरा देश. हे दोन भाग असले, तरी माझेच अंश आहेत. दोघांचेही जीवन भिन्न. त्यांच्यातील वातावरण, खाणेपिणे यात फरक आहे; त्यामुळे अर्थातच दोघांचे स्वभावदेखील भिन्न आहेत. पण दोघांची प्रेमाची भाषा मात्र एकच !
माझ्या तळाशी राहणारे माझे पुत्र म्हणजे 'गरुड पुत्र' युद्धकलेत निपुण असल्याने मला त्यांचा अभिमान वाटतो. वसंत बापट यांच्या शब्दांत सांगतो.
रामायण तर तुमचे माझे भारत भारत वर्षाचे छत्रपतींची वीरकहाणी निधान माझ्या हर्षाचे रजपूतांची विक्रमगाथा, तुमच्यापरि मजला रुचते हृदयाच्या हृदयात परंतु बाजी बाजीची सुचते अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी दत्ताजीचे शेवटचे ते शब्द अजुनि हृदयामाजी
अशी ही वीराची भूमी ! वीरांची परंपरा ! ह्या साऱ्या वीरांनी माझी शान वाढवली आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी शाहिरांनी डफावर मारलेली थाप, त्यांचे ते खडे बोल रोमांच उभे करतात. त्यांचे खडे बोल माझ्या दऱ्या-खोऱ्यांतून घुमतात. पोवाडे दुमदुमतात, तेव्हा माझी हृदयकवाडे उघडतात, पुन्हा तो रक्त सळसळायला लावणारा इतिहास जागा होतो आणि इतिहासाशी असणारे नाते अधिक दृढ होते.
शिवरायांनी बांधलेले दुर्ग म्हणजे माझी शान !
माझ्या शिखरांवर चढाई करण्यातला आनंद अवर्णनीय असाच आहे. अनेक गिर्यारोहक आपले साहस दाखवतात, तेव्हा माझा ऊर अभिमानाने फुलून येतो. माझ्यातील लेणी म्हणजे कधीही न विसरणारी प्राचीन यादगार. सोपारा, घारापुरी, जोगेश्वरी, कान्हेरी, कारला, भाजा, नासिक, लेण्याद्री, अजंठा, वेरूळ यासारख्या लेण्यांमुळे माझे सौंदर्य अधिकच खुलले आहे.
माझ्या अंगा-खांद्यावर वाढलेल्या औषधी वनस्पती, महावृक्ष, म्हणजे माझी संपत्ती. आयुर्वेदाने माझ्या या वनस्पतींवर केलेले संशोधन मानवी जीवन निरामय करण्यासाठी किती उपकारक आहे, हे सांगायलाच नको. अनेक ग्रंथांमध्ये याबाबत विस्तृत चर्चा आहे. 'मलय पर्वत माझाच एक हिस्सा.
या पर्वतावर चंदनाचे वृक्ष वाढतात. माझ्या या कणखर देहातून निरनिराळी सुंदर, सुगंधी, नाजूक फुलेदेखील जन्म घेतात. ही सारी त्या निसर्गदेवतेचीच कृपा! कन्नड, तुलू आणि मराठी या तिन्ही भाषांनी माझा इतिहास लिहिला, घडविला.
या भाषांमधून साहित्याची निर्मिती करणारे साहित्यिक कसे विसरणार? त्यांनी तर मला नटवले आणि माझा गौरव केला. अनेक साधु-संतांचा मला सहवास लाभला.
'कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परि माझाच जयदेवाचा जय बोला परि माझा नाम्याचा नाच जनी जनार्दन बघणारा तो 'एका हृदयी एकवटे जनाबाईच्या ओवीमध्ये माझी मजला खूण पटे इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली
ती माझी मी तिचाच ऐशी जवळीक कायमची झाली. अशा त-हेने माझ्यासाठी भीमाकाठी भावभक्तीची पेठ खुली झाली आहे.खरोखरच मी धन्य आहे, भाग्यवान आहे. मला अनेक साधु-संतांचा सहवास लाभला. सर्वजण माझा ‘परमपिता' म्हणून सन्मान करतात.
मी माझा भाऊ अर्थात, उत्तुंग हिमालय याच्याच पावलावर पाऊल टाकत माझी वाटचाल करत आलो आहे आणि यापुढेही तशीच करेन. तुमच्याशी बोलून खूप छान वाटले. धन्यवाद! मित्रांनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगु शकता . धन्यवाद